Home संपादकीय Atma nirbhar bharat abhiyan: आत्मनिर्भर भारत : राष्ट्रीय स्वावलंबनाची हाक - atmanirbhar...

Atma nirbhar bharat abhiyan: आत्मनिर्भर भारत : राष्ट्रीय स्वावलंबनाची हाक – atmanirbhar bharat abhiyan


विनय सहस्रबुद्धे

गेल्या १२ मेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाची हाक दिली, तेव्हापासून विविध प्रसार माध्यमातून त्याबाबतची चर्चा सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी केंद्रात सत्तेची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी व त्यानंतरही वेळोवेळी केलेली वक्तव्ये, त्यांनी आणलेल्या योजनांची नामामिधाने व त्यामागच्या भूमिका, भारतीय जनसंघ व भाजपाने आर्थिक विषयात वेळोवेळी केलेली मांडणी आणि ‘उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्’ ही भगवद्गीतेतील मांडणी किंवा ‘अप्प दीप भव’ हा महात्मा गौतम बुद्धांचा संदेश, या सर्वातील समान दृष्टी लक्षात घेतली, तर ‘आत्मनिर्भर भारता’ची कल्पना नवीन, म्हणजे अ-परिचित वाटण्याचे कारण नाही. ‘जोडोनिया धन, उत्तम वेव्हारे : उदास विचारे वेच करी’ ही समर्थ रामदासांची शिकवण ज्या प्रमाणे आपल्या सामर्थ्याचे, समृद्धीचे अंतिम लक्ष्य विश्वकल्याणाचे आहे हे अधोरेखित करते, तोच आशय पंतप्रधानांच्या मांडणीतील आत्मनिर्भरतेचा आहे. यात एक सनातन दृष्टी आहे; निदान संकटकाळात तरी जी नीट अंगीकारायला हवी. ती व्यक्तिगत आणि सामूहिक जबाबदारीची तीव्र जाणीव विकसित करण्याचा प्रयत्न आहे, जगात काय घडते आहे आणि भविष्यात काय घडू शकते त्याबद्दलचे भान निर्माण करण्याचा खटाटोप आहे आणि बदलल्या वैश्विक वास्तविकतेची चाहूलही आहे.

‘उद्धरावा स्वये आत्मा!’ ही सनातन भारतीय दृष्टी आहे. आपल्या उद्धारासाठी आणखी कोणीतरी कोठून तरी येतील ही, ‘असेल माझा हरी…’ पद्धतीची विचारसरणी नाकारून, ज्याचा तोच किंवा ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ ही शिकवण आपल्या देशात अनेकांनी जनमानसात रुजविण्याचे प्रयत्न केले आहेत. ‘आत्मनिर्भर भारता’ची हाक ही त्याच परंपरेतले पुढचे पाऊल आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यात बिचकून जाण्यासारखे तर अजिबातच काहीही नाही. पंतप्रधान मोदी व त्यांच्या धोरणांबाबत सर्वांनी गौरवोद्गारच काढले पाहिजेत, अशी अपेक्षा अव्यवहार्य आहे आणि अनावश्यकही! पण म्हणून मोदी आणि अमित शाह यांच्याबद्दलचे पूर्वग्रह कुरवाळत, काविळग्रस्त दृष्टीने त्यांच्या प्रत्येक घोषणेची ‘जुमला’ म्हणून वासलात लावून पुन्हा आपल्या जुन्या गृहीतकांच्या आड लपून हेटाळणीचे विषारी बाण सतत सोडणेही समर्थनीय ठरत नाही!

सत्तेवर आल्यानंतरच्या गेल्या सहा वर्षांत, मोदींनी केलेल्या मांडणीत एक स्वाभाविक सुसंगती आहे. त्यांच्या प्रचाराचा प्रारंभ ‘सबका साथ, सबका विकास!’ या घोषणेने झाला. समानता आणि सामाजिक/आर्थिक न्याय या दोन्ही संकल्पना त्यात अनुस्युत होत्या; आहेत! सगळ्यांनीच एकमेकांची साथसंगत केली/घेतली, तरच सर्वांचा विकास शक्य आहे, या मांडणीतही सामाजिक व राष्ट्रीय स्वावलंबनाचा संदेश आहेच. जवळ जवळ हीच भूमिका ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ या मांडणीत आहे. भारताचे ऐक्य ही त्याच्या श्रेष्ठत्वाची पूर्व अट आहे, हे कोणीच नाकारू शकणार नाही. या एकत्वात पारस्परिकता आहे आणि अशा देशांतर्गत परस्पर सहकार्यातून साधण्याच्या स्वावलंबनाचे एक अप्रत्यक्ष सूचनाही आहे.

मधल्या काळात मोदी सरकारने ‘स्टार्ट अप इंडिया’, ‘स्टँड अप इंडिया’सारख्या कार्यक्रमांना पुरेसे पाठबळ देण्याचा प्रयत्न करून उद्योजकता विकासावर भर दिला. रोजगाराचा मुख्य स्रोत आता, पारंपरिक चौकटीतील ठरावीक वेळेच्या व ठरावीक वेतनाच्या नोकऱ्या हा राहू शकणार नाही आणि त्यामुळे उद्योजकतेच्या विकासाकडे वळणे भाग आहे हे ओळखून सुरू केलेली ‘मुद्रा’ कर्ज योजना हे याच भूमिकेचे फलित होते.

२०१८ मध्ये भारतीय जनता पार्टीने ‘ग्राम स्वराज अभियान’ हाती घेतले होते. प्रत्यक्ष खेड्यांमध्ये काही दिवस राहून शेतकरी व ग्रामीण कारागिरांच्या विकास योजना तळापर्यंत पोहोचिवण्याचा प्रयत्न हा या अभियानाचा केंद्रबिंदू होता. शेतमालाला योग्य भाव मिळविण्याच्या संधी शेतकऱ्याला उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कृषि-उत्पन्न बाजार व्यवस्थेत केलेल्या सुधारणा, अन्न प्रक्रिया उद्योगांवर दिलेला भर आणि कृषि-पर्यटनासारख्या कृषि-आधारित नव उद्यमांना चालना देण्याचे धोरण, ही सर्व ग्राम स्वराजाच्या दिशेने उचललेलीच पावले होती. ‘ग्राम-स्वराज्य’ ही मूलतः महात्मा गांधींनी मांडलेली संकल्पना; आज पंतप्रधान ज्या ‘आत्मनिर्भर’तेची हाक देत आहेत, ती तिचेच एक रूप आहे, हे या संकल्पनेविषयी प्रश्नचिन्हे निर्माण करणाऱ्या शंकासुरांना मान्य होण्यास हरकत नसावी!
पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी, म. गांधी व इतर अनेकांप्रमाणेच स्वदेशी आणि विकेंद्रीकरण या दोन संकल्पनांवर भर दिला होता. ही दोन्ही सूत्रे आत्मनिर्भरतेकडे नेणारीच आहेत. पंतप्रधानांनी स्थानीय उत्पादने व उप्तादकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘लोकल’बाबत ‘व्होकल’ होण्यासंदर्भात केलेले आवाहनही, हीच दृष्टी अधोरेखित करणारे आहे. तेव्हा सारांशाने सांगायचे तर आत्मनिर्भरतेच्या संकल्पनेचा पंतप्रधानांनी उच्चारवाने केलेला पुरस्कार, ही आपल्या पूर्वसूरींनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेची नव्या संदर्भात केलेली मांडणी आहे, असे वर्णन केल्यास ते चुकीचे ठरू नये. ‘नित्य नूतन, चिर पुरातन’ हे भारतीय जीवनदृष्टीचे एक पायाभूत सूत्र आहे व त्याचेच प्रत्यंतर मोदींच्या मांडणीतून येते.

एक महत्त्वाचा प्रश्न उरतो, तो म्हणजे पंतप्रधानांनी आत्मनिर्भरतेच्या सूत्राची मांडणी नेमकी याच वेळेस का केली? त्याचे उत्तर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय अशा दोन्ही परिस्थितीसंदर्भात देता येऊ शकते व दिले पाहिजे. यातला आंतरराष्ट्रीय संदर्भ पी.पी.ई. किट्स, चांगली यंत्रे, मुखावरणे आणि औषधांच्या संदर्भातील आहे. हायड्रोक्लोरोक्विनच्या गोळ्या आपण मोठ्या संख्येने इतर देशांनाही पुरविल्या, पण इतर सामग्रीसाठी सुरुवातीस आपण परावलंबी होतो. शिवाय ही सामग्री चीनमधून आयात करावी लागण्याची वेळ येणे, म्हणजे विषाणूजन्य रोगाच्या संसर्गबाधेला निमंत्रण देण्यासारखेच. संगणकापासून संरक्षण उत्पादनांपर्यंत आपण आत्मनिर्भर झालो, ‘मेक इन इंडिया’चा आग्रही पुरस्कार करीत स्वतःच्या पायावर उभे राहिलो, तर भविष्यात उद्भवू शकणाऱ्या सर्व पेचप्रसंगांना आपण यशस्वीपणे तोंड देऊ शकू. सध्याच्या कठीण काळातही नेपाळला पुढे करून व अन्य खोडसाळ पद्धतीने चीन करीत असलेले राजकारण, चीन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात निर्माण झालेला तणाव, अमेरिकेचे गोंधळलेले नेतृत्व, युरोपची झालेली गलितगात्र अवस्था आणि या सर्व परिस्थितीतून जगाने जाणलेले अति संहारक विषाणू-युद्धाचे धोके, हे सर्व पाहता ‘आत्मनिर्भरता अभियान’ जाहीर करण्याचा मुहूर्त किती अचूकपणे साधला गेला, हे सहजगत्या लक्षात यावे.
अर्थात, आत्मनिर्भरतेच्या अभियानाचा संबंध केवळ आंतरराष्ट्रीय राजकारणाशी नाही. देशांतर्गत विषयांमध्येही आत्मनिर्भरता आवश्यक आहे. ग्रामस्वराज्य हा या अभियानाचा प्रारंभ बिंदू आहे. उत्तर प्रदेशासारख्या राज्याने ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ हे सूत्र समोर ठेवून स्थानिक कारगिरीला प्रोत्साहन देण्याचा जो उपक्रम सुरू केला आहे, तो ही या आत्मनिर्भरतेच्या दिशेने घेऊन जाणारा आहे. अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत आपण पूर्वीच आत्मनिर्भर झालो आहोत, पण ऊर्जा, पाणी, संरक्षण उत्पादन, तंत्रज्ञान, औषधनिर्माण… अशा अनेक क्षेत्रांत आपण आणखी आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. त्यासाठी स-कुशल मनुष्यबळ निर्माण करावे लागेल. उदाहरणार्थ- महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत आज सुतारकाम, इलेक्ट्रिशियन, गवंडीकाम, इमारतनिर्माण, अशा अनेक क्षेत्रांत परप्रांतीय मनुष्यबळ आहे. सध्या हे श्रमिक आपल्या मूळ गावी परत गेले आहेत व त्यांची जागा भूमिपुत्रांनी म्हणजे स्थानिकांनी घ्यावी अशी राज्य प्रशासनाची इच्छा आहे. पण हे घडून येण्यासाठी स्थानिक मनुष्यबळाची मानसिकता बदलावी लागेल व त्यांनी नवी कौशल्ये आत्मसात करावी लागतील आणि या दिशेने प्रयत्न करणे हा आत्मनिर्भर होण्यासाठीच्या धडपडीचाच भाग ठरेल. महाराष्ट्रात केळी, द्राक्षे, संत्री, आंब, स्ट्रॉबेरी अशी फळफळावळे मोठ्या प्रमाणात होतात, पण फळ प्रक्रियांची मोठी केंद्रे तयार झाली, तर शेतकऱ्यांना अधिक चांगले उत्पन्न मिळू शकेल. कापूस, भात अशा पिकांच्या बाबतीतही हेच आहे. महाराष्ट्रात पुण्याजवळ स्वयंचलित वाहनांचे कारखाने निघाले आणि सुट्या भागांच्या निर्मितीला चालना मिळाली. त्यातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला. उद्या चीनमधून बाहेर पडणाऱ्या उद्योगांना आकर्षून घ्यायचे असेल, तर तशा सोयी-सुविधा व तशीच धोरणेही असावी लागतील.

सध्याच्या वैश्विकरणाच्या जमान्यात अर्थातच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय अशी कप्पेबंदी करता येणार नाही. वाणिज्य मंत्रालयाने जागतिक पुरवठा साखळीत आपल्याला महत्त्वाची भूमिका निभावता येईल, अशा बारा क्षेत्रांना चिन्हीत केले आहे. अन्न प्रक्रिया, सेंद्रिय शेती, लोह, ऍल्युमिनियम व तांबे, कृषि-रसायने, इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक यंत्रसामग्री, फर्निचर, चर्मोद्योग व विशेषतः पादत्राणे, ऑटोमोबाइल पार्ट्स, वस्त्रोद्योग व मुखावरणे, सॅनिटायझेन आणि वेंटिलेटर्स ही ती क्षेत्रे आहेत.
१९९१ नंतर आपल्या देशाने एक प्रकारची अपरिहार्यता म्हणून का होईना, वैश्विकरण स्वीकारले. आता ‘आत्मनिर्भर भारता’ची हाक, त्या वैश्विकरणाला पूर्णतः नाकारतो असे समजणे अतिशयोक्ती होईल. वैश्विकरणाच्या घड्याळाचे काटे आता उलटे फिरविता येणार नाहीत. त्याची गरजही नाही! पण वैश्विकरणाच्या आधीच आत्मनिर्भरतेवर भर दिला गेला असता, तर वैश्विकरण कदाचित आपल्याला अधिक भारतानुकूल करता आले असते. हतबलतेचा वा निरुपायाचा भाग अशा स्थितीत कमी झाला असता. मोदींच्या संकल्पनेतील ‘आत्मनिर्भरता’ ही स्वार्थी कूपमंडुक वृत्तीला खतपाणी घालणारी नसून, विश्वसमुदायाला अधिक चांगल्या पद्धतीने मदतरूप होण्यासाठीचे हे स्वावलंबन आहे, हे विसरता कामा नये.

उल्लेखनीय म्हणजे पं. दीनदयाळ उपाध्याय व महात्मा गांधी, या दोघांनीही हीच भूमिका मांडली होती. विदेशीला दिशानुकूल आणि स्वदेशीला समयानुकूल बनवण्याची गरज दीनदयाळ उपाध्यायांनी वारंवार प्रतिपादन केली होती.

महात्मा गांधींनी २६ जून १९२४ च्या ‘यंग इंडिया’च्या अंकात जे म्हटले होते, ते एकप्रकारे आत्मनिर्भरतेच्या धोरणाचे मर्म आहे. गांधीजी म्हणाले होते- ‘भारतीय संस्कृतीची प्रतिभाशक्ती अबाधित राखणे, हीच माझी स्व-राज संकल्पना आहे. मला नवी मुळाक्षरे गिरवायची आहेत, पण ती (सर्व) भारतीय पाटीवर! मी पश्चिमेकडून उधारीवर अनेक बाबी घेण्यास तयार आहे, पण (हे) तेव्हाच (होईल) जेव्हा मी ही उधारी बऱ्यापैकी व्याजासह परत करण्याच्या स्थितीत येईन.’Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Tesla Motors Will Route Its India Investment Through Dutch Arm – टेस्ला भारतात; पण एलन मस्क यांनी टाकला हा मोठा डाव | Maharashtra Times

मुंबई : अमेरिकन ऑटोमोबाइल कंपनी टेस्लाने भारतात येण्यासाठी नेदरलँडचा कर सवलतीचा मार्ग शोधला आहे. टेस्ला अॅम्स्टरडॅम ही टेस्ला मोटर्स अँड एनर्जी इंडियाची मुख्य...

Sameer Khan: नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी – mumbai drug case minister nawab malik son in law sameer...

मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे जावई समीर खान (Sameer Khan) यांना ड्रग्ज प्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली...

इच्छूक उमेदवारांकडून भूखंडांचा गैरवापर

म. टा. वृत्तसेवा, निवडणुकीचे बिगूल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता असल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमदेवारांकडून मतदारांना खूश करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या...

पतसंस्थांच्या ठेवी होणार सुरक्षित

म. टा. खास प्रतिनिधी, नागरी सहकारी बँकांच्या ठेवींसाठी ज्याप्रमाणे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून (डीआयजीसी) विमा संरक्षण प्राप्त असते त्याचप्रमाणे आता पतसंस्थांतील...

Recent Comments