Home शहरं औरंगाबाद aurangabad News: चिमुरडीत प्राण फुंकून घडविला इतिहास - chronicles

aurangabad News: चिमुरडीत प्राण फुंकून घडविला इतिहास – chronicles


Nikhil.nirkhee@timesgroup.com

औरंगाबाद : कधी काळी रखडलेले… सुरू होऊनही बाल्यावस्थेतच…, अशा टीकेचे वर्षानुवर्षे धनी राहिलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाने इतिहास रचण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील पहिले स्वतंत्र ‘कोव्हिड १९ हॉस्पिटल’ अशी ओळख झालेल्या चिकलठाणा परिसरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाने कात टाक समस्त करोना संशयित-बाधित रुग्णांचे स्क्रिनिंग करणे, स्वॅब घेणे; तसेच निदान व उपचार सुरू असतानाच, मधुमेह, हायपोथायरॉईडिझमग्रस्त आणि करोबाधित गरोदर महिलेची अतिजोखमीची प्रसूती यशस्वी करून दाखवली.

करोनाबाधित महिलेची अतिजोखमीची यशस्वी प्रसूती ही महाराष्ट्रातील पहिली केस ठरली आहेच, शिवाय ती देशातील दुसरी व जगातील सातवी यशस्वी केस ठरली आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सर्व डॉक्टर-परिचारिका-कर्मचाऱ्यांच्या धीरोदास्त ‘टीम स्पिरिट’ने आणि सर्वांचे ‘टीम लिडर’ अर्थात जिल्हा शल्यचिकिस्तक, ‘नोडल ऑफिसर’ डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी हे दिवस-रात्र मेहनत घेऊन यश शब्दशः खेचून आणले आहे.

एकीकडे करोनाबाधितांचे व संशयितांचे आकडे वाढत असतानाच संपूर्ण जिल्हा सामान्य रुग्णालय हे करोनाबाधित व संशयित रुग्णांनी व्यापून गेले. रुग्णालयामध्ये करोना संशयित रुग्णांचे स्क्रिनिंग करणे, संशयितांचे स्वॅब घेणे, निदान करणे व रिपोर्टची प्रतीक्षा न करता उपचार सुरू केले जात असतानाच, १५ एप्रिल रोजी ३० वर्षांची गरोदर महिला ही करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आणि ती जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. रुग्णालयात दाखल होण्याच्या दिवशी तिला गरोदरपणाचे नऊ महिने चार दिवस पूर्ण झाले होते व प्रसववेदना सुरू झाल्या होत्या. त्याचवेळी तिला मधुमेह व हायपोथायरॉइडिझम असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संबंधित महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) रेफर करणे किंवा घाटीतील संबंधित विषयाच्या तज्ज्ञांची मदत घेऊन जिल्हा रुग्णालयात तिची प्रसूती करणे किंवा सर्व जबाबदारी जिल्हा रुग्णालयाच्या ‘टीम’ने घेऊन प्रसूती जिल्हा रुग्णालयातच करणे असे तीन पर्याय होते. ही आपलीच जबाबदारी आहे आणि ती आपण प्रयत्न व कौशल्य पणाला लावून पार पाडू, असा सूर जिल्हा रुग्णालयातील ‘टीम’मधून उमटला आणि संपूर्ण टीमचा उत्साह जिल्हा शल्यचिकित्सकांनीही ‘एसस्… वी विल गो फॉर्वर्ड,’ असा निर्णय घेऊन टाकला. त्यानंतर इतिहास रचला गेला तो टीमच्या यशोगाथेचा आणि तो त्यांच्याच शब्दांत…

वेळेत घेतलेला निर्णय ठरला महत्त्वाचा

संबंधित गरोदर महिला दाखल झाली तेव्हा कळा सुरू झाल्या होत्या व गर्भाशयाचे फक्त एक बोट तोंड उघडले होते व दहा बोटे तोंड उघडणे बाकी होते. त्यामुळे औषधे देऊन कळा वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. दोन दिवसानंतरही नैसर्गिक प्रसूती होणे शक्य नसल्याचे लक्षात आले व त्याचवेळी गर्भाशयाचे आवरण फुटले. त्यामुळे आणखी जास्त वेळ वाट पाहणे बाळासह मातेच्या जिवाला धोका होता. त्यामुळे ‘सिझेरियन’चा निर्णय घेण्यात आला, परंतु माता त्यासाठी तयार नव्हती. बाळाच्या जिवाला धोका असल्याचे पटवून देण्यात आल्यावर ती तयार झाली व शनिवारी सकाळी साडेअकराला ‘सिझर’ची तयारी सुरू करण्यात आली. त्यावेळी ‘ओटी’मध्ये असलेल्या प्रत्येकाने ‘पीपी गाऊन’, ‘एन ९५ मास्क’, ‘फेस शिल्ड’, ‘ग्लोव्ह्ज’, ‘गॉगल्स’ घातले होते. मातेलाही ‘पीपी गाऊन’ घालण्यात आला होता. कोणताही स्त्राव जन्मणाऱ्या बाळाच्या अंगावर जाणार नाही, याची काळजी घेतली. ही मोहीम फत्ते करायचीच, ही जिद्द प्रत्येकांत होती. त्यातून २० मिनिटांत प्रसूती यशस्वी करण्यात आली. महिलेस काही आजार आहेत. त्यामुळे रक्तस्त्राव होणे, बाळास श्वास घेण्यास त्रास होणे किंवा आणखी काही प्रश्न उभे राहण्याची भीती होती. सुदैवाने, कोणतीही समस्या निर्माण झाली नाही ती वेळेत निर्णय घेतल्यामुळेच. आणखी उशीर झाला असता तर बाळ हाती आले असते का नाही, हे सांगणे कठीण आहे.

– डॉ. कमलाकर मुदखेडकर, स्त्रीरोगशास्त्र विभागप्रमुख

परिचारिका देत आहेत आईचे प्रेम

‘पेशंट हिस्ट्री’मुळे जन्मणाऱ्या बाळाची श्वसनप्रणाली सुरू न होण्याचा मोठा धोका होता व त्यासाठी पुनर्जिविकरणाची (निओनॅटल रिससिटेशन) सगळी वैद्यकीय तयारी करण्यात आली होती आणि तशी वेळ आली असती तर आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्गाचा धोका होताच, मात्र तशी वेळ आली नाही व बाळ व्यवस्थित रडले; तसेच त्याचे वजन व सर्व निकष योग्य आहेत. जन्मल्यानंतर त्याचे लसीकरणही अपेक्षेप्रमाणे करण्यात आले, मात्र संसर्गाच्या भीतीमुळे ‘ब्रेस्ट पंप’द्वारे मातेचे दूध काढून बाळाला दिले जात आहे. प्रसूतीनंतर बाळाला नवजात शिशू दक्षता कक्षात ठेवण्यात आले असून, बाळाची आई त्याला घेऊ शकत नसली तरी आमच्या परिचारिका त्याला आईचे प्रेम देत आहेत व त्याची सर्वतोपरी काळजी घेत आहेत. आई ‘कोव्हिड निगेटिव्ह’ झाली की तिचे बाळ तिच्या कुशीत जाणार आहे.

– डॉ. भारती नागरे, बालरोगतज्ज्ञ

सिझरबाबत अजूनही अभ्यास नाही

करोनाबाधितांच्या सिझेरियन केसबाबत जागतिक पातळीवर अजूनपर्यंत कुठलाच अभ्यास ठोसपणे समोर आलेला नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी गरोदर महिलेला भुलेचा नेमका किती डोस द्यावा किंवा देऊ नये, याविषयी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे आजतरी नाहीत. त्यामुळे भुलशास्त्रानुसार हा डोस देण्यात आला व तेवढाच डोस पुरेसा ठरला. अपेक्षेप्रमाणे प्रसूती झाल्यामुळे कोणतेही प्रश्न उभे ठाकले नाहीत, मात्र प्रसुतीसाठी खूप तयारी व खबरदारीही घ्यावी लागली.

– डॉ. प्रदीप कुलकर्णी, भूलतज्ज्ञ

मातेला सुरू झाली औषधे

प्रसूती होण्यापूर्वीपासूनच मातेला ‘हायड्रॉक्सी क्लोरोक्लिन’ हे औषध सुरू करण्यात आले होती. आता प्रसूतीनंतर इतरही प्रतीजैविके देण्यात येत आहेत, मात्र अजूनही संबंधित बाळंतिणीला करोना विषाणूबाधेची कोणतीही लक्षणे नाहीत. ही त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे, मात्र ती पॉझिटिव्ह असल्याने मार्गदर्शक तत्त्वांनुसार संपूर्ण औषधोपचार केला जाणार आहे. एरवी कोणत्याही ‘सिझर’नंतर प्रतीजैविकांचा डोस दिला जातच असतो. अर्थात, बाळंतपण, मधुमेह व हायपोथायरॉइडिझम यामुळे प्रतिकारशक्ती कमी झालेली असते व तशा स्थितीत ती करोनाबाधित झाल्यामुळे जास्त काळजी घ्यावी लागणार आहे.

– डॉ. पद्मजा सराफ, फिजिशियन

वैद्यकीय अभ्यासाठी केस महत्त्वाची

खरे म्हणजे संपूर्ण ‘टीम’च्या मोठ्या प्रयत्नांमुळेच करोनाबाधित गरोदर महिलेची अतिजोखमीची सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकली आहे. ही महाराष्ट्रातील पहिली, देशातील दुसरी, तर जगातील सातवी यशस्वी केस आहे. बाळाचा ‘थ्रोट स्वॅब’; तसेच गर्भजल व योनी मार्गाच्या स्त्रावाचा रिपोर्टदेखील निगेटिव्ह आल्याने करोनाबाधित महिलेचा संसर्ग तिच्या जन्मणाऱ्या बाळाला होत नाही, हेही यानिमित्ताने पुरते सिद्ध झाले आहे. ही केस वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासासाठीही महत्त्वाचे ठरेल.

– डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

कमी ‘एक्स्पोजर’साठी मर्यादित टीम

आतापर्यंतच्या वैद्यकीय इतिहासामध्ये करोना विषाणूचा संसर्ग हा सर्वाधिक तीव्रतेने होऊ शकतो व तो तितकाच घातकही ठरू शकतो, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळेच ‘सोशल डिस्टन्सिंग’चे महत्त्व आहे आणि अशा परिस्थितीत करोनाबाधित रुग्णाच्या जवळ जाणे व प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करणे हे किती घातक ठरू शकते, याची कल्पना केली जाऊ शकते. या आव्हानाबरोबरच रुग्णाला भूल देणे, कमी वेळेत शस्त्रक्रिया पूर्ण करणे, बाळ-बाळंतीणीला जपणे हेदेखील तितकेच मोठे आव्हान होते; तसेच कमीत कमी एक्स्पोजरसाठी आमची ‘टीम’दखील मर्यादित होती. अर्थात, डॉ. मुदखेडकरांच्या खंबीर नेतृत्वामुळे हे शक्य झाले.

– डॉ. कविता जाधव, स्त्रीरोगतज्ज्ञ

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sudhir mungantiwar: ‘एकनाथ शिंदे, तुमच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता’ – eknath shinde has the potential to be chief minister says sudhir mungantiwar

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकाही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंद दाराआड झालेल्या चर्चेमुळे चर्चेत आलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी पुन्हा नवे वक्तव्य करून...

Chloe Zhao: आशियाचा सन्मान : क्लोई जाओ – chloe zhao is becoming the first asian woman to ever win the prize for best director

'करुणा सर्व बंधने पार करते आणि मग तुमची वेदना माझी वेदना बनते...' गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका क्लोई जाओ यांनी याच कार्यक्रमात व्यक्त...

Recent Comments