कोवीन अॅपवर नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणासंदर्भात मेसेज पाठवण्यात येणार होते. मात्र शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अॅप आणि मेसेज न मिळाल्यामुळे महापालिका प्रशासनावर ताण आला. शनिवारच्या लसीकरणाला प्रतिसाद कसा मिळेल, याबद्दलची साशंकता वैद्यकीय अधिकाऱ्यांना वाटत होती.
शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता वेळ न दवडता वॉर रूमला नोंदणीकृत याद्या पाठवल्या. यामध्ये पालिका प्रशासन, खासगी रुग्णालयांसह आरोग्यसेविका तसेच आरोग्य केंद्रातील वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर यांचे मोबाइल क्रमांकही होते. प्रभागनिहाय या सर्वांना फोनवरून संपर्क साधण्यात आला, ज्या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे ते केंद्र सांगण्यात आले. यात कोणताही आग्रह नव्हता केवळ माहिती देण्याच उद्देश होता. रात्री ज्यांनी फोन घेतले नाहीत त्यांना पहाटेपासून संपर्क साधण्यात आला. शुक्रवार रात्रभर पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी, प्रभाग कार्यालयांसह वॉर रुमही व्यग्र होत्या.
या लसीकरणाच्या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले होते. लसीकरणाच्या रंगीत तालमीच्यावेळी अॅपच्या जोडणीमध्ये कोणत्या अडचणी आल्या होत्या, त्याची चर्चा झाली होती.
‘समाधानकारक प्रतिसाद’
एन वॉर्डचे डॉ. महेंद्र खंदाडे यांनी स्वतः लस घेतल्यानंतर पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद समाधानकारक असल्याची भावना व्यक्त केली. कोविड केंद्रामध्ये वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. दीपक बैद यांनीही खासगी डॉक्टरांनाही फोन करून माहिती देण्यात आल्याचे सांगितले. ‘थांबा आणि पहा’ हा पवित्रा घेणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सकाळी लसीकरण झाल्यानंतर कोणालाही त्रास न झाल्याचे लक्षात येताच दुपारी लसीकरण केंद्रावर जाण्याचा निर्णय घेतला. काही वरिष्ठ आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या तरुण सहकाऱ्यांनीही समजूत घालून लसीकरण करून घेण्यासाठी प्रोत्साहन दिले होते.