वाचा: ग्रेट! नगरमध्ये एकाच दिवशी रोखले ३ बालविवाह
गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर शहरासह तालुक्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा रेड झोनमधून गावाकडे येणाऱ्या नागरिकांमुळे ग्रामीण भागांमध्ये करोना जाऊन पोहोचला आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आता ग्रामीण स्तरावर राबविण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी गावपातळीवर ग्रामस्तरीय सुरक्षा समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
वाचा: ‘करोना’तून बचावला, अपघातात जीव गमावला; दुर्दैव म्हणतात ते हे…
परराज्यातून व जिल्ह्याबाहेरून गावात आलेल्या व्यक्तीस संस्थात्मक क्वारंटाइन करावे, अशा सक्त सूचना या समितीला दिल्या आहेत. मात्र, त्यानंतरही स्थानिक राजकारणामुळे गावामध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना क्वारंटाइन करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सातत्याने हे प्रकार समोर येत असल्याने आता प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. नगर तालुक्यात एखाद्या गावामध्ये बाहेरून आलेल्या व्यक्तीचे संस्थात्मक क्वारंटाइन केले नाही, तर थेट तेथील सरपंचावरच फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे आता स्थानिक राजकारण बाजूला ठेवून सरपंचाला आपली जबाबदारी पार पाडावी लागणार आहे
तीन सरपंचांना नोटीस
नगर तालुक्यात निंबळक, जखणगाव, भोयरेपठार या गावांच्या सरपंचांनी त्यांना दिलेल्या करोना व्यवस्थापनाच्या जबाबदारीमध्ये हलगर्जीपणा व दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांना प्रशासनाने, ‘तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये ,’ अशी नोटीस बजावली आहे.
वाचा: ‘दोन महिने लई मजा मारली’ म्हणत पोलिसाला मारहाण!