देशात महाराष्ट्रामध्ये करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या कालच ३३ हजारच्या पुढे गेली आहे तर आतापर्यंत १ हजार १९८ जणांना करोनामुळे प्राणास मुकावे लागले आहे. राज्यात मुंबईत करोनाची स्थिती भीषण आहे. एकट्या मुंबईत करोना रुग्णांची संख्या २० हजारच्या पुढे गेली आहे तर जवळपास ७०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही स्थिती लक्षात घेऊन राज्यात आधीच ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असून त्यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
देशात चौथा लॉकडाऊन जाहीर करताना काही प्रमाणात नियम शिथिल करण्यात आले आहेत. रेडझोनमध्ये लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी कायम ठेवताना ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये बऱ्याच प्रमाणात शिथिलता देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवाय त्या त्या राज्यांनाही याबाबत काही अधिकार देण्यात आले आहेत. ते पाहता मुख्यमंत्र्यांचा आजचा संवाद अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.
राज्यात करोना साथ नियंत्रणात आणण्यासाठी सरकार कोणती पावले उचलत आहे? लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात कोणते नियम असणार आहेत? ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये कोणत्या नव्या सवलती मिळणार आहेत?, रेड झोनमध्ये कंटेनमेंट झोन वगळून बाकी भागात कोणत्या अधिकच्या सेवा सुरू होणार आहेत?, राज्यातील अर्थचक्राला गती देण्यासाठी आणखी कोणत्या सवलती दिल्या जाणार आहेत?, प्रवासी वाहतुकीबद्दल कोणता निर्णय सरकार घेणार आहे?, असे अनेक प्रश्न सामान्य जनतेच्या मनात आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या आजच्या संबोधनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लॉकडाऊन-४ जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज प्रथमच जनतेला संबोधित करत असून करोनाची साथ आणि आर्थिक कोंडी अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या महाराष्ट्राला ते कोणती नवी वाट दाखवतात हे पाहावे लागणार आहे.