शहराच्या वेगवेगळ्या भागात करोनाचा शिरकाव वाढत चालला असून ५० पेक्षा अधिक भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. कंधार तालुक्यातील चिखलभोसी येथी नव्या तीन रुग्णांची भर पडली असून किनवटमध्ये राहणारे एक दाम्पत्य तेलंगणमधील आदिलाबाद येथे पॉझिटिव्ह आढळले आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. उपचार सुरू असलेल्या सगळ्यांची प्रकृती स्थिर असून १३४ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
अशोक चव्हाण नांदेडमध्ये
माजी मुख्यमंत्री व विद्यमान पाटबंधारे मंत्री अशोक चव्हाण यांनी करोनावर मात केल्यानंतर, त्यांचे शुक्रवारी विशेष विमानाने नांदेडमध्ये सहकुटुंब आगमन झाले. त्यांना ३२ दिवसांपूर्वी करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उपचारासाठी मुंबईच्या ब्रीचकॅन्डी रुग्णालयात हलवण्यात आले होते. विशेष विमानाने त्यांचे शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता सहकुटुंब आगमन झाल्यानंतर सुरक्षित वावराचे पालन करीत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार अमर राजूरकर, महापौर दीक्षा धबाले, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, प्रवक्ते संतोष पांडागळे उपस्थिती होते.