Home संपादकीय dinu randive: परिवर्तनवादी चळवळीचं हिंडतं-फिरतं रूप - dinu randive the revolving form...

dinu randive: परिवर्तनवादी चळवळीचं हिंडतं-फिरतं रूप – dinu randive the revolving form of the revolutionary movement


वि. वि. करमरकर

दि. मा. र. म्हणजेच दिनू वामन रणदिवे. व्रतस्थ पत्रकार. सच्चा समाजवादी साथी, अन् स्नेहाचं मूल्य जोपासणारा दिलदार मित्र. मृदू पण मोहाला बळी न पडणारं, जीव लावणारं पण तडजोडी झिडकारणारं व्यक्तिमत्त्व. स्वप्नाळू म्हणून, स्वाभिमानी म्हणून, अतिसंवेदनशील म्हणून असं हे विलक्षण मिश्रण गुंफलं गेलं, ते एका अखंड चळवळीच्या प्रवाहात. दिनू होता त्या चळवळीचं, हिंडतं-फिरतं, जितं-जागतं रूप. तिची उंच उंचावलेली मशाल!

दिनू आदर्शवत बातमीदार-पत्रकार खराच, त्याला व्हायचं होतं पत्रकारच. पण त्याचबरोबर त्याचं स्वप्न होतं नगरसेवक बनण्याचं. काही अंशी आपलं छोटसं उर्दू दैनिक, सायकलवर टांग मारून खपवणाऱ्या समाजवादी नगरसेवक मोईन उद्दीन हॅरिस साहेबांसारखं आणि संधी मिळाली असती तर, अरुण शौरी वा हरीवंश वा अकबर यांसारख्या संपादक-खासदारांसारखं.

त्याची-माझी ओळख झाली १९६०च्या सुमारास. एस. एम. जोशी यांनी सहकारी तत्त्वावर, पण अति अल्प भांडवली पायावर, कामगारांचा रोजगार टिकवण्यासाठी सुरू केलेल्या दैनिक ‘लोकमित्रा’त. तेव्हा एम.ए.चा अभ्यास सांभाळून मी पार्ट टायमर, दिनू पूर्ण वेळावरचा श्रमिक पत्रकार. पाहता पाहता ओळखीचं रूपांतर आपुलकीत, अन् त्यातून मैत्रीत होत गेलं. दिनू माझ्याकडे मन मोकळं करू लागला. म्हणायचा की पत्रकारिता करता करता नगरसेवक व्हायची इच्छा आहे!

मी विचारायचो : मग गाडं अडलं कुठे? दिनूनं प्रभाकर कुंटे, अशोक पडबिद्री प्रभृतींसह ‘संयुक्त महाराष्ट्र पत्रिका’ हे साप्ताहिक सुरू केलं. समाजवादी युवक सभेच्या त्या उपक्रमाने मराठी माणसाच्या अस्मिता जागृत केल्या. त्याला प्रचंड प्रतिसाद दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू करण्याची प्रेरणा प्रजासमाजवादी नेतृत्वाला दिली. हे कर्तृत्व नगरसेवकाचं तिकीट मिळवण्यास पुरेसं का नसावं?

आमचे स्नेहसंबंध घट्ट होऊ लागले. मग मी हा विषय अधूनमधून काढत राहिलो. सहसा दिनू तो विषय उडवून लावायचा. पण अचानक एकदा बोलू लागला : ‘प्रजासमाजवादी पक्षात तेव्हा अशोक मेहतांचं नेतृत्व होतं. त्यांची धारणा अशी की, सत्ताधारी काँग्रेसच्या तुलनेत आपल्याकडे पैशाचं पाठबळ कमी. निवडणुकीतील लबाड्या आपल्या शुचितेत न बसणाऱ्या, अशा परिस्थितीत ज्यांना जनमानसात स्थान आहे अशांना तिकीटं द्यावीत. ‘इलेक्टिव मेरिट’ म्हणजे निवडून येण्याची क्षमता ज्यांच्यात आहे अशांना. म्हणजे डॉक्टर, वकील, प्राध्यापक अशा जनसंपर्कातील व्यावसायिकांना.’ हे सांगून झाल्यावर दिनूच्या चेहऱ्यावर क्षीण व खिन्न स्मितहास्य यायचं. ‘पण मी कोण? साधा पदवीधर!’

‘लोकमित्र’ दैनिकाच्या पत्रकारितेत स्थिरावू लागल्यावर दोन-तीनदा हाच विषय संभाषणात निघाला. ‘फरक बघ’ तो म्हणायचा. ‘डॉ. राममनोहर लोहियांच्या समाजवादी पक्षात कार्यकर्त्यांना प्राधान्य दिलं जातं. कम्युनिस्ट पक्षातही कामगार संघटनातील फूल टायमर्सना, पूर्ण वेळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट आवर्जून देतात. हे फूल टायमर्स पक्षनिष्ठ तावून-सुलाखून निघालेले असतात. पक्षाचा विशिष्ट दृष्टिकोन त्यांच्या अंगवळणी पडलेला असतो.’ मध्यमवर्गीय मानसिकतेच्या पगड्यातून प्रजासमाजवादी पक्ष बाहेर पडायला वेळ लागला तेव्हा, दिनूने पूर्ण वेळ पत्रकारिता व फक्त पत्रकारिता हा मार्ग अटळ म्हणून स्वीकारलेला होता. तरीही पत्रकारितेकडे, सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचं हत्यार म्हणूनच तो बघत राहिला. त्यासाठी संसदेचं, विधानसभेचं, महापालिकेचं व्यासपीठ भले नाकारलेलं असलं, तरी लेखणीचं प्रभावशाली व्यासपीठ वापरत राहिला!

‘दैनिक लोकमित्र’मुळे दिनू पत्रकारितेत स्थिरावला, पण लोकमित्र दैनिक आपल्या पायांवर भक्कम उभं राहत नव्हतं. स्वतःचा छापखाना काढण्याची दृष्टी नाही. खप म्हणावा तसा वाढत नव्हता. काही दैनिकांनी कॉम्रेड डांगे यांच्यामार्फत रशियातून रोटरी मशीन आणण्याची तडजोड केली आणि डांगे यांची लाइन कमीअधिक प्रमाणात चालवली. तसले काही ‘लोकमित्र’ करणे अशक्य होते. मग पगार निघण्यास उशीर व्हायचा. अशा प्रसंगी दिनू व राजा केळकर या बातमीदारांचं रात्रीचं जेवण काय असायचं? दोन आण्यात मिळणारा तोतापुरी आंबा व पावाच्या चार स्लाइस! अखेर ‘लोकमित्र’ बंद करण्याची वेळ आली. ‘आपण कमी पडलो! चल आपली आजची हार ‘साजरी’ करू या व नवं स्वप्न बघण्यास मोकळे होऊ या,’ दिनू म्हणाला व हॉटेलात घेऊन गेला. त्यानं ऑर्डर दिली : ‘हापूसचे दोन आंबे कापून आण!’

त्याच सुमारास ‘महाराष्ट्र टाइम्स’ दैनिक सुरू होत होतं. चंद्रकांत ताम्हाणे, मी त्यात निवडले गेलो. नारायण आठवले लोकसत्तेत गेले. दिनूला म.टा. बोलवत होतं. संपादक द्वा. भ. कर्णिक यांना दिनू खास करून हवा होता. ‘लोकमित्र’वरील निष्ठेतून अधिक किफायतशीर संस्थेत जाण्यास दिनूचं भाबडं मन तयार होत नव्हतं. अखेरीस अनेक चाहत्यांच्या मिनतवारीतून तो राजी झाला आणि क्षणार्धातच नव्या संपादकांशी त्याचं उत्तम जमलं.

कर्णिक हे तेव्हाच्या संपादकांप्रमाणे रॉयवादी म्हणजे कम्युनिझमकडून नवतावादाकडे वळलेले रॉयिस्ट. कर्णिक व गोविंद तळवलकर, तसेच ‘लोकसत्ते’चे ह. रा. महाजनी व र. ना. लाटे हे सारे बुजुर्ग रॉयिस्ट. त्यांना शिवसेना व प्रादेशिक या गोष्टी भावत नसत. उदारमतवादाशी, समाजवादाशी विसंगत वाटत. शिवसेना स्थापनेच्या मेळाव्याचा वृत्तांत देण्यासाठी दिनू शिवाजी पार्कवरून परतला, तो भारावलेल्या मनोवस्थेतच. ‘रणदिवे, तुम्हीही एवढे भारावून गेलात?,’ कर्णिकांनी विचारलं. ‘होय, मी १९६२ नंतर प्रथमच मराठी माणसांचा, समितीच्या काळासारखा जल्लोष बघतोय. बाळ ठाकरेंनी मराठी माणसाच्या काळजास हात घातलाय!’ हे दिनूचं उत्तर. सत्यास सामोरं जाणारं उत्तर! कर्णिकांनीही दिनूच्या निरीक्षणाची कदर केली. त्याचा वृत्तांत जसाच्या तसा छापला गेला.

कर्णिकांचे वारसदार गोविंद तळवलकर यांचाही विश्वास दिनूनं संपादन केला. तेव्हा म.टा.चा संपादकवर्ग समाजवादी, दि. वि. गोखले यांच्या नेतृत्वाखाली संघ व पक्ष यात समसमान विभागला गेला होता. गोविंदराव काँग्रेसवादी, पण उदारमतवादी. अडखळत्या सुरुवातीनंतर त्यांच्या अग्रलेखांनी पकड घेतली. तेव्हा अफगाणिस्तानमधील सरकार सोव्हिए रशियासह भारताला अनुकूल होतं. दिनूची इच्छा होती तिथे जाण्याची. एक दिवशी मी वाट चुकलो, अन् दुपारी तीनच्याऐवजी सकाळी साडेनऊला ऑफिसात पोचलो! ती गोविंदरावांची नेहमीची वेळ. मला त्यांनी केबिनमध्ये बोलावलं व एक कागद समोर ठेवला. तो होता दिनूच्या अफगाण दौऱ्यास कंपनीच्या मान्यतेचा! गोविंदराव म्हणाले, ‘आपला शिपाई हा अर्ज घेऊन व्यवस्थापनाकडे गेला व अक्षरशः उलट्या पावली सँक्शनसह, मंजुरीसह परतला! सांगा तुमच्या मित्राला, की आता वेळ घालवू नका!’

पण सांगणार काय, कप्पाळ! दिनूचा पाय मुंबईतून निघत नव्हता. मी त्याला थोडं झापलं. तोही भडकला : ‘करम्या (हे त्यानं मला ठेवलेलं आवडतं नाव) तू फक्त स्पोर्टस् करणारा आहेस का? मुंबई विद्यापीठात खूप गोंधळ माजलाय. प्रा. राजर्षी व कार्यकर्ता घोणे नवनवीन लबाड्या उघडकीस आणताहेत!’

मला लक्षणं ठीक दिसेनात. हा प्रकार मी गोविंदरावांच्या कानी घातला. त्यांनी आम्हा दोघांना केबिनमध्ये बोलावलं व दिनूला समजावलं : ‘रणदिवे, आपण सारे म.टा.मधून निवृत्त होऊ, पण मुंबई विद्यापीठातील भानगड अखंड चालू राहतील. अफगाण दौरा करून या. महिनाभरानंतर काढा विद्यापीठातील भरपूर लफडी!’

अफगाणिस्तान हा कडक थंडीचा प्रदेश. दिनूसाठी मी एका मित्राकडून ओव्हरकोट व लोकरी कानटोपी आणली होती. ऑफिसमध्ये येणारी ब्रिटिश-अमेरिकी वर्तमानपत्रं बाजूस ठेवली होती. पण ती परत करावी लागली.

बांगलादेशच्या मुक्ती संग्रामासाठीही गोविंदरावांनी दिनूचाच दौरा मंजूर करून घेतला. पुन्हा मी अमेरिकी-ब्रिटिश वर्तमानपत्रील वार्तापत्रांचा गठ्ठा दिनूला दिला. त्यांचे बातमीदार युद्ध-पत्रकारितेच्या अनुभवातून गेलेले असतात. भारतीय पत्रकारांना हा अनुभव नवा. दिनूनं पुन्हा निघायला विलंब लावला. मग त्याच्याशी ऑफिसचा संपर्क काही काळ तुटला! त्याचा ठावठिकाणा कळेना. अखेर त्याचा जिवलग मित्र चंदू मेढेकर (जो तेव्हा युएनआय वृत्तसंस्थेत मुंबई ब्युरोचा प्रमुख होता) यानं युएनआय यंत्रणेमार्फत (खोटा, पण नाईलाजास्तव) निरोप पोचवला. ‘तुझी पत्नी सविताची तब्येत बिघडलीय. लगेच परत ये!’

चंदु मेढेकरची मात्रा लागू पडली! चोवीस तासांत दिनू कोलकात्यात दाखल झाला. त्यावेळी मीही कोलकात्यात क्रिकेट कसोटीसाठी गेलेलो होतो. ‘महाराष्ट्र निवासा’त भेट झाली. मी त्याला सहज म्हटलं : ‘संदेश ही बंगाली मिठाई खायची?’ तो माझ्यावर रागावला : ‘करम्या, तिकडे सविताला बरं नाहीए, अन् इकडे मिठाई कसली खायची!’ मी म्हटलं : ‘चहा तरी घ्यायचा?’ त्यानं मान डोलावली. गरम चहाचे दोन घोट पोटात गेल्याची खात्री करून घेतल्यावर, मी वाह्यात निरीक्षण नोंदवलं : ‘चहातही दोन चमचे गोडधोड साखर आहे!’ क्षणभर दिनू अवाक् झाला. दोन्ही हातांच्या मुठी त्यानं आवळल्या व प्रक्षुब्ध नजरेनं माझ्याकडे एकटक बघत राहिला! माझं नशीब व मैत्रीची पुण्याई की, या मनस्वी माणसानं त्याला सोडण्यासाठी कोलकाता विमानतळावर येऊ दिलं!

बांगलादेश व अफगाण दौऱ्यांसाठी दिनूलाच कंपनीची मान्यता देण्यात तळवलकरांची गुणग्राहकता दिसतेच, तसंच दिनूबाबतचं कौतुक वा जिव्हाळा दिसून येत नाही का? लहानसहान व नित्य नैमित्तिक बातम्यांपासून मोठ्या बातम्या मिळवण्याची दिनूची क्षमता वादातीत होती. सिमेंटची टंचाई असताना, मुख्यमंत्री अंतुले यांचा सिमेंट-घोटाळा त्यानेच माहित करून दिला. स. का. पाटील यांचा ऐतिहासिक पाडाव करणारे जॉर्ज फर्नांडिस यांच्याविरुद्धच्या खटल्यात दिनूचीच साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरली होती. विखुरलेले समाजवादी व फाटाफूटग्रस्त रिपब्लिकन यांच्या ऐक्याच्या बातम्या, उत्साहाने तोच वर्षानुवर्षे देत राहिला. अशा दिनूची कदर गोविंदरावांना होती, मग त्यांच्यात बेबनाव कुठे, कसा व का आला?

प्रमुख वार्ताहरपदावरून सहसंपादक व्हावं, ही दिनूची इच्छा होती. पण त्यान तसे निवेदन ना गोविंदरावांना दिले, ना आपली इच्छा तेव्हा त्याने कधी माझ्याकडे बोलून दाखवली. त्यावेळी प्रकाश बाळ यांना तळवलकरांनी सहसंपादकपदी निवडलं. ही गोष्ट बहुधा एप्रिल १९८३ची. त्यावेळी दिनूनं मला व प्रकाश बाळ यांना सांगितलं असतं की, त्या जागेसाठी तोही इच्छुक आहे; सेवेतील त्यांची सव्वादोन-अडीच वर्षंच उरलेली आहेत- तर कदाचित बाळ यांनी त्यांच्यासाठी माघार घेतलीही असती. गोविंदरावांकडे मी दिनूच्या नावाचा आग्रह धरून पाहिला असता. पण त्याने ती इच्छा तेव्हा व काही वर्षं मनातल्या मनात ठेवली. आत्मक्लेष सहन करत राहिला. माझ्याशी काही वर्षं अबोला धरून राहिला. दीर्घकालीन मैत्रीवर अन्याय करत राहिला.

मी दिनुला म्हणालो : मला क्रीडा-संपादकपदी बढती मिळत नव्हती. त्या बारा वर्षांत मी गोविंदरावांना निदान दोनदा निवेदन दिलं होतं : मला बढती देणं तुम्हाला जमत नसेलच, तर माझी बदली क्रीडा विभागातून डेस्कवर करा. माझी कोणतीही तक्रार त्याबाबत नसेल! ती पत्रं मी दिनूला दाखवलेली होती. ऑफिसमधील साऱ्याच व पुष्कळदा वैयक्तिक जीवनातील बऱ्याच गोष्टी मी दिनूकडे बोलत असे. पण त्यानं ना गोविंदरावांना निवेदन दिलं, ना माझ्याशी बोलला.

दिनूवरचे काही अन्याय जरूर विदारक आहेत. विवाहित होण्याआधी दिनू भावाकडे राहायचा. फार फार थोड्या लोकांना त्याच्या दैनंदिन जेवण्याखाण्याच्या आबाळीची कल्पना असेल. दुपारी तीनच्या सुमारास ऑफिसात यायचा. प्रमुख वार्ताहर चंद्रकांत ताम्हाणे कामकाजाची रूपरेषा आखून घ्यायचा. मग मला खुणवायचा. आम्ही जवळच तांबेंच्या ‘आराम’ हॉटेलात जायचो. तिथं मिसळ व पुष्कळदा डबल पाव मागवायचो. हा प्रकार वारंवार व्हायचा. मला राहवेना. मी त्याला विचारलं : ‘तू घरी जेवलेला दिसत नाहीस! घरी दुपारचं जेवण मिळत नाही?’ रात्री तोच प्रकार. ऑफिसमधून निघायला अकरा तरी वाजत. मग जेवण प्लाझा सिनेमाजवळ ‘अमर सिंध पंजाब’ हॉटेलात किंवा ते बंद असल्यास माहीमला ‘नीलम’ हॉटेलात. म्हणजे घरी जेवण्याबाबत जिथे घरच्यांचाच आग्रह नसे, त्या घराचं घरपण दिनूसाठी गायबच!

तरुणपणी प्रजासमाजवादी पक्षात नगरसेवकाचं तिकीट नाकारलेलं. मग भावाकडे ही आबाळ. या व्यथा खऱ्याच. सहसंपादकपद मिळालं नाही यात त्याला न्याय मिळाला नाही, असं मानूया आणि त्यासाठी आपली बाजू आपणच मांडणं अनुचित वाटलं असंही मानू या. पण वयाच्या पासष्टीनंतर किमान बावीस वर्षे त्या अन्यायाला कुरवाळत निष्क्रीय बनणं, हे त्याच्या त्याआधीच्या पासष्ट-सत्तर वर्षांतील लढाऊ बाण्याशी वा उमेदीशी सुसंगत नव्हतं.

अबोल्याच्या त्या काही वर्षांतही त्याची जीवनसाथी सविता मला समजवायची. ‘दिना आहे भोळा शंकर. त्याच्या डोक्यावर बर्फाची लादी थापली, तर ती वितळून जाईल. पण शंकररावांचं डोकं शांत होणार नाही. तू समोर दिसलास की त्याचा अबोला सुरू. पण तू दिसेनासा झालास की माझ्याकडे तुझी चौकशी सुरू. ‘करम्या’ का येत नाहीए! त्याला तू मनोमन यायला हवा आहेस. येत चल.’ असं हे बाहेरनं काटेरी, पण आतून मुलायम मन.

दिनू व सविता आता आपल्यात नाहीत. गेल्या दोन दशकांत ललिता वाकणकर व डॉ. राहुल वाकणकर आणि दीपा कदम यांनी त्यांची जी सेवा केली, तिला सलाम.

दिनू व सविता आता आपल्यात नसले, तरी असंख्य आठवणींच्या रूपाने आपल्यात सदैव असतील. परिवर्तनाच्या चळवळीचा, अन् उंच उंच उंचावलेल्या मशालीचा त्यांचा ठेवा, त्यांच्या विशाल परिवाराला सदैव उमेद व प्रेरणा देत राहील!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

new parliament building: हा आमुचा मार्ग बिनभुयाराचा… – jata jata by chakor : new parliament building features underground tunnels in building for pm and...

अरेरे! काय हे आमचे नशीब! काय हा दैवदुर्विलास! (या शब्दाचा अर्थ काय ते आम्हाला अद्यापि कळलेले नाही. शाळेत शिकलेले मोजके शब्द स्मरणात राहिले....

raj thackeray: राज ठाकरे ‘नाणार’ प्रकल्पाच्या बाजूने; स्थानिक म्हणतात… – nanar refinery opposing leaders reaction after raj thackeray writes open letter to cm thackeray...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईनाणार रिफायनरीला स्थानिक दलाल, गुजराती-मारवाडी गुंतवणूकदार, मुंबई, बांद्रा-बीकेसीसारख्या डायमंड मार्केटमधील भाजपप्रणित व्यापारी यांचे समर्थन असून नाणार कंपनीचे अधिकारी या...

International Women’s Day 2021: घरखरेदीत पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर – 82 percent of women prefer to buy house for investment : anarock survey

म. टा. प्रतिनिधी, मुंबईविविध प्रकारच्या सवलतींच्या लाटेवर असलेल्या घरखरेदीचा आलेख मुंबईत सध्या चढता आहे. विशेष म्हणजे, घर खरेदीत पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर आहेत. जिथे...

Recent Comments