डॉ. गंगाखेडकर लोकाभिमुख शास्त्रज्ञ आहेत. वैद्यकीय ज्ञानाबरोबरच अवघड विषय सोपा करून सांगण्याचे कौशल्य त्यांच्याकडे असून, त्याची चुणूक त्यांनी दैनंदिन वार्तालापात दाखवून दिली आहे. या आधी त्यांचे नाव एचआयव्ही व एड्सच्या संशोधनाशी जोडले गेले होते. प्रामुख्याने लैंगिक संबंधांतून होणाऱ्या एचआयव्हीबद्दल नव्वदच्या दशकात मोठी भीती होती. रुग्णांकडेही उपेक्षेने पाहिले जात होते. या दोहोंचे प्रमाण कमी करण्यात डॉ. गंगाखेडकर आणि पुण्यातील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेतील (नारी) त्यांच्या सहकाऱ्यांचा मोठा वाटा आहे.
एचआयव्हीची बाधा विवाहित महिलांना होण्याबाबत डॉ. गंगाखेडकर यांनी केलेले संशोधन वाखाणले गेले. केवळ संशोधनावर भर न देता, बाधित रुग्णांमध्ये जाऊन काम करण्यावरही त्यांनी भर दिला. देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या वस्तीत केंद्रे स्थापन करून एड्स नियंत्रणासाठी त्यांनी प्रयत्न केले. बाधित मातेपासून बाळाला एचआयव्ही संसर्ग होण्याबाबतचे त्यांचे संशोधनही एड्स नियंत्रणासाठी महत्त्वाचे ठरले. या कार्याबद्दल त्यांना यंदाच ‘पद्मश्री’ने गौरविण्यात आले आहे. निवृत्तीनंतर ते आता पुण्यात ‘आयसीएमआर’च्या डॉ. सी. जी. पंडित अध्यासनाचे प्रमुख म्हणून परतणार आहेत. त्यांना शुभेच्छा!