Home संपादकीय Editorial News : ऐच्छिक परीक्षांचा सुवर्णमध्य - middle way of examination

Editorial News : ऐच्छिक परीक्षांचा सुवर्णमध्य – middle way of examination


करोना साथीच्या संकटामुळे पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करून याबाबत गेले महिनाभर राज्यात जो संभ्रम निर्माण झाला होता, तो दूर झाल्याचा दावा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी केला. त्यांचे संपूर्ण निवेदन ऐकल्यानंतर मात्र, संभ्रम दूर होण्याऐवजी वाढण्याचा धोका आहे; कारण सरकारने परीक्षा पूर्णपणे रद्द केल्या नसून, ऐच्छिक केल्या आहेत आणि परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांसाठी तो पर्याय खुला ठेवून याबाबतच्या वादात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, परीक्षा घ्यायच्याच असतील तर त्या सर्वांसाठी का नकोत, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे संभ्रमही वाढतो. परीक्षा पूर्णपणे रद्दबातल करण्यातील धोके, विद्यार्थ्यांचे होणारे संभाव्य नुकसान, त्यांच्या पुढील प्रवेशापासून नोकरी मिळविण्यापर्यंतच्या अडचणी आदी अनेक बाबींवर गेले काही दिवस चर्चा झाली असल्याने, सरकारने परीक्षा घेण्याचाही पर्याय निवडला आहे आणि तो योग्यही आहे. सरकारच्या निर्णयानुसार, कला, वाणिज्य आणि विज्ञान या बिगर व्यावसायिक विद्याशाखांचे जे विद्यार्थी आधीच्या दोन्ही वर्षांत उत्तीर्ण आहेत, त्यांना परीक्षा न देताही पदवी प्रमाणपत्र मिळविता येणार आहे. अभियांत्रिकी, विधी, शिक्षणशास्त्र आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनाही असे करता यावे, अशी सरकारची भूमिका आहे; परंतु त्या त्या विद्याशाखांच्या शिखर संस्थांची मान्यता मिळविणे आवश्यक असल्याने या संस्थांच्या मान्यतेनंतरच खरा निर्णय होऊ शकतो. बीए, बीकॉम, बीएस्सी या पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना, आधीच्या वर्षांच्या गुणांच्या आधारे अंतिम वर्षाचे गुण दिले जाणार आहेत. त्याबाबतचे सूत्र विद्यापीठ निश्चित करणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाची परीक्षा द्यायची आहे, त्यांना ती देता येऊ शकते. त्या त्या ठिकाणची करोनाची परिस्थिती पाहून, जिल्हाधिकाऱ्यांच्या सल्ल्याने विद्यापीठ या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेईल. या दोन्हींपैकी कोणता पर्याय निवडला आहे, हे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला लेखी कळवायचे आहे.

थोडक्यात, परीक्षा द्यायची की नाही, हा निर्णय आता विद्यार्थ्यांना घ्यावयाचा आहे. आपल्या भावी करिअरचा, अन्य शैक्षणिक पर्यायांचा विचार करून विद्यार्थी तो घेऊ शकतील. तथापि, परीक्षाच नको या मानसिकतेतून विद्यार्थ्यांनी बाहेर यायला हवे. आपल्या विद्यापीठांची विद्यमान परीक्षा पद्धत सदोष आहे, त्यातून विद्यार्थ्यांचे आकलन व्यवस्थित तपासले जात नाही, हे आक्षेप रास्त आहेत; मात्र तूर्तास तरी विद्यापीठांनी अन्य पर्यायी पद्धती विकसित केलेल्या नसल्याने, पदवीसाठीची आपली पात्रता परीक्षा देऊन सिद्ध करण्यातच विद्यार्थ्यांचे हित आहे. त्यासाठी करोनाची सबब त्यांनी देऊ नये. करोनाचे संकट आले नसते, तर त्यांना या परीक्षा द्याव्याच लागल्या असत्या. आधीच्या वर्षांतील काही विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या, म्हणजेच एटीकेटी मिळविलेल्या विद्यार्थ्यांबाबत नेमके काय करायचे, हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही. सर्व कुलगुरूंबरोबर बैठक घेऊन लवकरच निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. अनुत्तीर्ण असलेल्या विषयांच्या परीक्षा रद्द करून, याही विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रासाठी पात्र ठरविण्याची मागणी काही राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांकडून होत असली, तरी ती अशैक्षणिक आहे. अर्थात, साथरोगाच्या कायद्याखाली आपत्कालीन परिस्थितीत सरकार या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षाही रद्द करू शकते; परंतु तसा निर्णय अद्याप झालेला नाही. अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत जसा सुवर्णमध्य साधला गेला, तसा काही प्रयत्न याही बाबतीत होऊ शकतो; मात्र त्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत, याचा विचार करावा लागेल. व्यावसायिक शाखांच्या विद्यार्थ्यांबाबत संबंधित शिखर संस्थांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या संस्था परीक्षा घेण्यावर ठाम राहिल्यास विद्यार्थ्यांना त्या द्याव्याच लागतील.

या निमित्ताने गेले काही दिवस उच्च शिक्षणव्यवस्थेतील परीक्षा, वर्षभरातील शैक्षणिक मूल्यांकन आदींबाबत चर्चा झाल्या. आयआयटीसारख्या संस्था, केंद्रीय विद्यापीठे, तसेच परदेशांतील विद्यापीठांत मूल्यांकनाबाबत कोणकोणत्या पद्धती अवलंबल्या जातात, आदींची उदाहरणेही दिली गेली. आपल्याकडेही गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक वर्षातील निरंतर मूल्यांकनाबाबत मत मांडले जात आहे. अनेक विद्यापीठांत त्यासाठी विविध प्रयोगही राबविले गेले आहेत, राबविले जात आहेत. करोना संकटामुळे सर्वच क्षेत्रे नवीन साधारण स्थितीसाठी सज्ज होत आहेत. शिक्षणाचे क्षेत्र याला अपवाद ठरू शकत नाही. ऑनलाइन पद्धतीने वर्ग चालविणे ही नवसाधारण स्थितीच आहे; मात्र शिक्षणाचे नवसाधारण केवळ ऑनलाइन वर्गापुरते मर्यादित राहू नये. आपल्याकडे प्रामुख्याने बीए, बीकॉम, बीएस्सी या पदवी शाखांतील विद्यार्थी (आणि काही प्रमाणात प्राध्यापकही) नियमित वर्गांना महत्त्व देत नाहीत. परीक्षांच्या आधी काही दिवस अभ्यास करून, गुण पदरात पाडून घेण्यात धन्यता मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ही स्थिती आता बदलायला हवी. या शाखांमध्येही (आणि अर्थातच अन्य शाखांतही) नियमित वर्गांना महत्त्व दिले जावे, प्रत्येक आठवड्याला मूल्यांकन केले जावे, सत्रांतर्गत परीक्षाही गांभीर्याने घेतल्या जाव्यात, विद्यार्थ्यांना कृतिपर अभ्यास देऊनही मूल्यांकन केले जावे. याखेरीज आणखीही अनेक गोष्टी करता येऊ शकतात. या शैक्षणिक वर्षापासूनच हे झाल्यास, नवसाधारण स्थिती चटकन अनुसरली गेली, असे म्हणता येईल.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sitaram Kunte: अनुभवी आणि विश्वासार्ह : सीताराम कुंटे – sitaram kunte new chief secretary of maharashtra

अखेर सीताराम कुंटे राज्याचे मुख्य सचिव झाले. खरेतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच ते मुख्य सचिवपदी येणार असा अनेकांचा कयास होता.  Source...

Corona Rules Violation: करोनाबाधित नियमांचा भंग करून फिरत होता घराबाहेर; गुन्हा दाखल – police file fir against corona positive man for corona rules violation

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनास रोखण्यासाठी मुंबईत लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. गोवंडी पोलिस ठाण्यापाठोपाठ सोमवारी चेंबूर पोलिस ठाण्यात...

BJP: शिवसेना-भाजपमधील विसंवाद वाढला; ‘हा’ ठरला कळीचा मुद्दा – bjp has criticized shivsena over bmc development fund distribution

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबई पालिकेतील स्थायी समितीतील असमान विकास निधी वाटपावरून शिवसेना आणि भाजपमधील विसंवाद आणखी वाढत चालला आहे. विकास निधीतील दुजाभाव...

Recent Comments