गडचिरोली: भामरागड तालुक्यातील घनदाट जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सी ६० कमांडो पथकातील एका अधिकाऱ्यासह दोन पोलीस शहीद झाले. तर या हल्ल्यात एका अधिकाऱ्यासह तीन पोलीस जखमी झाले आहेत.
भामरागड तालुक्यातील घनदाट जंगल परिसरात नक्षलवाद्यांविरोधात मोहीम राबवण्यात येत आहे. त्यानुसार, या मोहिमेंतर्गत सी ६० कमांडो पथकातील पोलीस नक्षलवाद्यांचा शोध घेत होते. त्याचवेळी जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी सी ६० कमांडो पथकावर अचानक हल्ला केला. नक्षलवाद्यांच्या हल्ल्याला पथकातील पोलिसांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक धनाजी व्हनमाने आणि जवान किशोर आत्राम हे शहीद झाले. तर एका पोलीस अधिकाऱ्यासह तिघे जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या पोलिसांना हेलिकॉप्टरद्वारे नागपूरमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भामरागड तालुक्यातील कियरकोटीच्या जंगलात नक्षलवाद्यांविरोधात शोधमोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, सी ६० कमांडो पथक जंगलात गेले होते. मात्र, या जंगलात नक्षलवादी दबा धरून बसले होते. त्यांनी पोलिसांवर बेछुट गोळीबार सुरू केला. पथकातील जवानांनीही नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. नक्षलवादी आणि जवानांमध्ये बराच वेळ चकमक झडली. यात नक्षलवाद्यांशी लढताना पोलीस उपनिरीक्षक व्हनमाने आणि जवान आत्राम यांना वीरमरण आले. इतर तिघे जवान जखमी झाले आहेत. त्यात एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे, असं सांगण्यात येत आहे. घनदाट जंगल परिसर असल्यानं या जखमी जवानांना हेलिकॉप्टरद्वारे नागपूरमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे, अशी माहितीही समजते.