कमॉडिटी बाजारात बुधवारी सोन्यामध्ये तेजी दिसून आली. सकाळच्या सत्रात सोने वधारले होते. मात्र त्यानंतर झालेल्या नफावसुलीने सोन्यातील तेजीला ब्रेक लावला. दिवसअखेर सोने २६७ रुपयांनी स्वस्त झाले आणि ४८४९५ रुपयांवर बंद झाले. चांदीला देखील नफेखोरीची झळ बसली. बाजार बंद होताना चांदीचा भाव २१९ रुपयांनी घसरून ५०१४५ रुपयांवर बंद झाला. त्याआधी कालच्या दिवसभरात चांदीचा भाव ५०८९१ रुपयांच्या उच्चांकी स्तरावर गेला होता.
सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित असल्याच्या भावनेने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. त्यातच २०१९ आणि २०२० या वर्षात मे महिन्यापर्यंत सोन्याने चांगली कामगिरी केल्याने गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. सोन्याला २०११ नंतर प्रथमच अच्छे दिन प्राप्त झाल्याचे दिसून आले आहे. गोल्ड ईटीएफला मिळणाऱ्या पसंतीच्या पार्श्वभूमीवर एप्रिल२०२० अखेरीस या फंडांतील एकूण निधी ९,१९८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मार्च २०२०च्या अखेरीस या फंडांमध्ये एकूण ७,९४९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.
करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने बड्या देशांमधील केंद्रीय बँकांनी अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आर्थिक पॅकेजची तयारी सुरु केली आहे. परिणामी भांडवली बाजारातील संस्थात्मक गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांनी गुंतवणुकीची स्ट्रॅटेजी बदलली आहे. संस्थात्मक गुंतवणूकदार मौल्यवान धातूला गुंतवणुकीसाठी पसंत करत आहेत. महागाई आणि चलनातील अवमूल्यनाला हेजिंगचा भक्कम पर्याय म्हणूनदेखील सोने गुंतवणूकदारांना वरदान ठरत आहे.