गस्तीवर असलेल्या सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर संध्याकाळच्या सुमारास दहशतवाद्यांनी काझियाबादमध्ये गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले. तर एका दहशतवाद्याला ठार करण्यात जवानांना यश आलं.
दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच करालगुंड, काझियाबाद आणि नौगाम भागात लष्कराने मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम हाती घेतली आहे. लष्करातील राष्ट्रीय रायफल्सचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील जवान यांनी ही संयुक्त मोहीम राबवली आहे. दहशतवादी हल्ल्याच्या दोन मोठ्या घटनानंतर लष्कराच्या विशेष दलातील तुकड्या आणि राष्ट्रीय रायफल्समधील जवानांच्या अनेक टीमद्वारे कुपवाडामध्ये दहशतवाद्यांचा शोध घेतला जातोय.
काझियाबादमधील या हल्ल्यापूर्वी हंदवाडामध्ये दहशतवाद्यांनी ओलीस धरलेल्या काश्मिरी नागरिकांच्या सुटकेसाठी गेलेल्या लष्कर आणि पोलीसांचे संयुक्त पथकावर हल्ला झाला होता. यात कर्नल आशुतोष शर्मा आणि मेजर अनुज सूद सह चार जवान आणि एक पोलीस उपनिरीक्षक असे पाच जण शहीद झाले होते.
हंदवाडा चकमकीत लष्कर ए तोयबाच्या ‘हैदर’ला कंठस्नान
हंदवाडा चकमक; देश जवानांचे बलिदान विसरणार नाहीः PM मोदी
काश्मीर उत्तरेत कुपवाडा हा जिल्हा येतो. हा जिल्हा नियंत्रण रेषेला (LoC) लागून आहे. या रेषेपलिकडे पाकव्याप्त काश्मीर आहे. कुपवाडा जिल्ह्याच्या पूर्वेला केरन आणि नौगाम सेक्टर आहे. या भागातून दहशतवादी काश्मीरमध्ये सतत घुसखोरीच्या प्रयत्नात असतात.