डॉ. निर्मल जयस्वाल,
क्रिटिकल केअर फिजिशियन, नागपूर
मधुमेहग्रस्त रुग्णांना ‘कोव्हिड-१९’च्या प्रादुर्भावाचा सर्वाधिक धोका आहे, हे आपल्या कानावर पडले असेलच, वाचनातही आले असेल? या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की, खरोखरच मधुमेहग्रस्तांना ‘कोव्हिड-१९’च्या प्रादुर्भावाचा धोका आहे का? असेल, तर मग काय काळजी घेतली पाहिजे?
मधुमेह हा मल्टिसिस्टिम इव्हॉलमेन्ट डिसिज म्हणजे एकाहून अधिक अवयवांवर प्रभाव पाडणारा विकार आहे. दीर्घकालापासून मधुमेहाने ग्रस्त असलेल्यांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यामुळे मधुमेहग्रस्त व्यक्तींनाही करोनाच नव्हे तर कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. अर्थात हा मधुमेहग्रस्तांसाठी फार धोकादायक आहे, असेही नव्हे. पण आपणास खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. मधुमेहींमध्ये काही कारणाने रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. मधुमेह अनियंत्रित असेल तर प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ‘कोव्हिड-१९’च्या या सगळ्या काळात आणि पुढेही मधुमेहग्रस्तांनी विशेषत्त्वाने काळजी घेणे आवश्यक आहे. आपणास माहिती आहे, की टाइप-१ आणि टाइप-२ या दोन प्रकारचे मधुमेह असतात. टाइप-१मध्ये शरीरात इन्सुलिन तयार होत नाही आणि टाइप-२मध्ये इन्सुलिन तयार होत असले तरी त्याचा वापर शरीरात होत नाही. दोन्ही प्रकारचे मधुमेह असलेल्या रुग्णांना आपला मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित डॉक्टरांचा सल्ला घेणे क्रमप्राप्त आहे. याशिवाय काही पथ्ये पाळणे व औषधोपचार करणे अथवा इन्सुलिन घेणे आवश्यक असते. जे मधुमेही डॉक्टरांनी सांगितलेली पथ्ये पाळत नाहीत त्यांचा एचबीए-१सी (मागील तीन महिन्यातील मधुमेहाचा स्तर मोजण्यासाठीची एक चाचणी) रिपोर्ट हा वाढलेला असतो. अशा मधुमेहींना ‘कोव्हिड-१९’चा प्रादुर्भाव होण्याचा आणि प्रादुर्भाव झाल्यावर गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका अधिक असतो. दोन महिन्यांपासून लॉकडाउनच होते. आणि ते पुढेही राहणार आहे. याशिवाय लॉकडाउननंतरही करोनाचा धोका कमी झालेला नसेल. अशा वेळी व्यायामावर निर्बंध आले आहेत. सगळ्यांच्या घरी जीम असतेच असे नाही. त्यामुळे बहुतांश रुग्ण व्यायाम करण्याचे टाळत असतील. मात्र, एक लक्षात ठेवले पाहिजे की, तुमचा मधुमेह लॉकडाउनपूर्वी नियंत्रणात असेल तर त्यामागे औषधोपचारांसह व्यायामाची भूमिका फार महत्त्वाची होती. त्यामुळे व्यायामास सुरुवात करणे आवश्यक आहे. अशा वेळी घरातल्या घरात शतपावली करावी. तुम्ही जर टायमर लाऊन घरातच ४५ मिनिटे चालण्याचा व्यायाम केला तर तुम्ही साडेतीन किलोमीटर अंतर चालू शकाल. त्यास ‘ब्रिस्क वॉक’ असे म्हणतात. सोबतच चालण्यापूर्वी १५ मिनिटे नियमित योगा केला पाहिजे. त्यामुळे व्यायामाचा लाभ होईल.
तुम्ही केलेल्या चाचणीलाही आता ५० दिवस उलटून गेले आहे. घरी अनेक पदार्थ होत असतील, ते सेवन करण्याचा मोह टाळता आलेला नसेल. आता तर आंब्याच्या रसाचा महिना आहे. आमरसाच्या सेवनानेही रक्तशर्करा अनियंत्रित होते. अनियंत्रित रक्तशर्करा म्हणजे करोनाला आमंत्रणच नव्हे का? अशा वेळी आहारावरदेखील नियंत्रण ठेवले पाहिजे. पूर्वी ज्या प्रकारे आहार घ्यायचे, तसाच आहार आता सेवन करावा. रात्रीही शतपावली करता आली तरी चांगले. निर्धारीत वेळेतच व्यायाम करा. जेवणाच्या वेळा निर्धारीत करायला हव्यात.
आता काही काळ तरी करोना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होणार आहे, असे म्हटले जाते. अशा वेळी मधुमेहग्रस्तांनी काही सवयी लावून घेतल्या पाहिजेत. आठवड्यातून एकदा उपाशीपोटी आणि जेवणानंतरची रक्तशर्करा चाचणी करावी. त्यानंतर त्यात वाढ दिसत असेल तर डॉक्टरांचा तातडीने सल्ला घ्यावा. लॉकडाउननंतरही सुरक्षित वावराचे नियम पाळावेत. बाहेरच्या व अनोळखी व्यक्तींना भेटणे टाळावे. घरातील व्यक्ती ज्यांना मधुमेह नाही, त्यांनी मधुमेहग्रस्त व्यक्तींची कामे करावी. लॉकडाउननंतर ऑफिसात जाणे सुरू होईल, बाहेर जावे लागेल, अशा वेळी मास्क घालणे अत्यावश्यक आहे. शिवाय प्रत्येक ऑफिसात सॅनिटायजरची व्यवस्था असली पाहिजे. अशी सगळी काळजी घेतली तर मधुमेहग्रस्त ‘कोव्हिड-१९’चा पराभव करू शकतील.