डॉ. अलंकार अंबादास रामटेके,
अस्थिरोग शल्यचिकित्सक, नागपूर
आपल्या शरीराच्या हालचालींसाठी ‘मस्क्युलो स्केलेटल सिस्टिम’ म्हणजे हाडे व स्नायुंना एकत्रित कार्य करण्याची प्रणाली कारणीभूत ठरते. हाडे शरीराला आकार देतात व स्नायू हे एखाद्या मोटारसारखे कार्य करून त्या हाडांना गती मिळवून देतात. त्यामुळे आपण सुरळीत कार्य करू शकतो. हाडे टनक असतात. मग हालचाल कशी होते…! तर दोन हाडांना जोडणारा सांधा असतो. दोन अथवा त्याहून अधिक हाडांचा जोड, जेथून हाडांची हालचाल होते. त्यामुळे हात-पाय-कंबर यासारख्या अवयवांना हालविता येणे शक्य होते.
हाडांची हालचाल होत असल्याने घर्षण तर क्रमप्राप्त आहेच. अशा वेळी तेथे दोन हाडांच्या पृष्ठभागाचे संरक्षण करण्यासाठी एक गादी आणि वंगणाची (लुब्रिकंट/ग्रीस) व्यवस्था असते. येथे असलेल्या गादीला ‘कार्टिलेज’ असे म्हणतात. त्यास ‘हायलाइन कार्टिलेज’ अथवा ‘आर्टिक्यूलर कार्टिलेज’ म्हणतात. सांध्यांचे रक्षण करणे, हालचाल सुरळीत व्हावी म्हणून गुळगुळीतपणा प्रदान करणे वगैरे असे त्याचे कार्य असते. आपण या लेखातून गुडघ्यांच्या सांध्यांची झीज हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. गुडघ्याचे कार्टिलेज म्हणजे तेथील गादी, याशिवाय शरीराचा भार सम प्रमाणात वितरित करण्याचा प्रयत्न करीत असते. याशिवाय तेथे ‘सायनोव्हियल फ्ल्युइड’ हे बेअरिंगमधील ग्रीससारखे कार्य करीत असते. ऑस्टिओआर्थरायटिस या विकारात ही गुडघ्याची गादी झिजते आणि त्याचे कार्यान्वयन बिघडते.
आता एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, शरीरातील विविध अवयवातील पेशींचे गुणधर्म वेगवेगळे असतात. जसे हाड मोडले तर ते पुन्हा जुळू शकते. कारण त्याची पुनर्निमिती क्षमता (रिजनरेशन कपॅसिटी) आहे. मात्र, काही अवयवांच्या पेशी या विशेष पेशी अथवा उती असतात. त्यामुळे त्यांच्यात पुनर्निमिती क्षमता नसते. अशा अवयवांची हानी झाली की, मग ते नेहमीसाठी कमकुवत होतात. उदाहरण घ्यायचे झाले तर प्रौढांचे दात पडले की पुन्हा काही येत नाहीत. हृदय, मेंदूंच्या, डोळ्यांच्या पेशी यांची पुनर्निर्मितीची क्षमता नसते. अगदी त्याच प्रकारे गुडघ्याच्या गादीच्या पेशींची देखील पुनर्निमितीची क्षमता नसते. त्यामुळे एकदा ती झिजली अथवा त्याची हानी झाली की, त्याची पूर्ववत निर्मिती होत नाही. त्यामुळे या कार्टिलेजला हानी पोहोचली की, ऑस्टिओआर्थरायटिस होतो, असे म्हणतात. हे कुठल्याही सांध्यात होऊ शकते.
लक्षणे
– दुखणे : वजन उलचताना, पायऱ्या चढताना आणि कालांतराने चालताना देखील त्रास होतो. मग मांडी घालून बसताना व भारतीय पद्धतीच्या टॉयलेटमध्ये बसताना वेदना होतात.
– सूज : ऑस्टिओआर्थरायटिसमुळे सांध्यांमध्ये सूज येते.
– सांध्यांमध्ये अकडणे : सांध्यांमध्ये कडकपणा आल्याने तेथील लवचिकता कमी होऊन मोड कमी होते. एरवी मांडी आणि पोटरी एकमेकांना स्पर्श करू शकतात. मात्र, सूज आल्याने व सांध्यांची झीज झाल्याने कडकपणा येतो तसेच अशी हालाचाल होत नाही.
– व्यंग येणे : ज्यांना ऑस्टिओआर्थरायटिससारखे विकार जडतात त्यांना ‘बो नीज’ म्हणजे पाय धनुष्यासारखे बाहेर निघू लागतात; ज्यांना र्हुमटॉइड आर्थरायटिससारखे विकार जडतात त्यांना ‘नॉक नी’ म्हणजे पाय जाणे असे व्यंग निर्माण होते.
– विकलांगता: समवयीन जेवढ्या तत्परतेने कार्य करू शकतो, धावपळ करू शकतो, तेवढ्या तत्परतेने ऑस्टिओआर्थरायटिसग्रस्त व्यक्ती कार्य करू शकत नाही. त्यास विकलांगता येते. व्यक्तीचे नियमित कार्यान्वयन बिघडते व परिणामस्वरुप त्यांची आत्मनिर्भरता संपते आणि ते परावलंबी होतात आणि शेवटी नैराश्य देखील येऊ शकते.