भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातली वनडे सीरिज 27 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे.
सिडनी, 25 नोव्हेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातली वनडे सीरिज 27 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. भारताविरुद्धच्या या वनडे सीरिजआधी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना एकत्र सराव करता येणार नाही. कोरोना (Corona Virus) मुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू वेगवेगळ्या समुहामध्ये सराव करत आहेत. खेळाडू वेगवेगळा सराव करत असले, तरी याचं कारण देता येणार नाही, अशी प्रतिक्रिया मॅथ्यू वेड याने दिली आहे.
ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सध्या दोन ठिकाणी सराव करत आहेत. खेळाडूंचा एक समूह मुख्य प्रशिक्षक जस्टिन लॅन्गर यांच्यासोबत सिडनीमध्ये आहेत. तर स्मिथ, वॉर्नर आणि पॅट कमिन्स यांच्यासारखे आयपीएल खेळून युएईवरून आलेले खेळाडू 14 दिवसांच्या अनिवार्य क्वारंटाईन कालावधीत आहेत. हे खेळाडू सहायक प्रशिक्षक ऍन्ड्रयू मॅकडोनाल्ड यांच्यासोबत सराव करत आहेत.
ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मॅथ्यू वेड (Mathew Wade) क्रिकेट.कॉम.एयू सोबत बोलताना म्हणाला, ‘आम्ही अशा परिस्थितीचा आधीही सामना केला आहे, पण ही परिस्थिती वेगळी आहे. बऱ्याच काळापासून आम्ही एकत्र खेळलो आहोत. त्यामुळे शुक्रवारी मैदानात उतरू तेव्हा सगळ्यांना स्वत:ची भूमिका माहिती असेल. आम्ही कोणतंही कारण सांगणार नाही.’
गुरुवारी ऑस्ट्रेलियाचे सगळे खेळाडू एकत्र येतील आणि शुक्रवारी पहिली वनडे मॅच खेळतील, त्यामुळे खेळाडूंना टीम म्हणून एकत्र सराव करता येणार नाही. दुसरीकडे भारतीय टीमही युएईमधून आल्यानंतर क्वारंटाईन कालावधीमधून गेली. भारताची मर्यादित ओव्हरची टीम आणि टेस्ट टीम एकत्र सराव करत आहे.
‘भारताला क्वारंटाईन असूनही एकत्र सराव करता आला, आमच्यापेक्षा त्यांची स्थिती वेगळी आहे,’ अशी प्रतिक्रिया वेडने दिली. कर्णधार एरॉन फिंच, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाची बॅटिंग मजबूत आहे, तर एलेक्स कॅरी विकेट कीपर म्हणून खेळेल, त्यामुळे ऑक्टोबर 2017 साली शेवटची वनडे खेळलेला मॅथ्यू वेड 4 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या टी-20 सीरिजसाठी उत्सूक आहे.
Tags: