नाशिक येथील आयकर विभागाचे अतिरिक्त संचालक अमित सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली २०० अधिकाऱ्यांचे पथक दि. २७ फेब्रुवारी रोजी जळगावात आले होते. या पथकाने जैन उद्योग समूहाच्या सर्व प्रतिष्ठानांची चौकशी केली होती. त्यात समूहाचे चेअरमन अशोक जैन, डॉ. सुभाष चौधरी, राजा मयुर, महावीर बँक, सीए, कंत्राटदार, ज्वेलर्स यांच्याकडे देखील तपासणी केली होती. यावेळी जैन कुटुंबातील काही सदस्य शहरात नसल्यामुळे त्यांचे लॉकर तपासता आले नव्हते. यानंतर २४ मार्च पासून लॉकडाऊन लागू झाल्यामुळे पथकाची कार्यवाही अपूर्ण राहिली होती.
जैन कुटुंबातील हे सदस्य जळगावात आले आहेत. तसेच लॉकडाऊन देखील शिथील झाले असल्याने नाशिक येथून सुमारे २५ अधिकाऱ्यांचे पथक या कार्यवाहीसाठी गुरुवारी जळगावात आले होते. पथकाने जयनगर येथील जळगाव जनता सहकारी बँक लि. शाखेच्या कार्यालयात तपासणी केली.
जैन समूहाकडून तपासणीची विनंती
तपासणी पूर्ण झालेली नसल्यामुळे लॉकर्स तीन महिन्यांपासून बंद होते. त्यामुळे अनेक कामे ठप्प झाली होती. यासाठी जैन उद्योग समूहाकडूनच आयकर विभागाला लवकर तपासणी करून घ्यावी अशी विनंती करण्यात आली होती. त्यानुसार ही तपासणी करण्यात येत असल्याची माहिती जैन उद्योग समूहाकडून देण्यात आली.