करोनाची शक्यता व्यक्त करुन पालिकेच्या केईएम रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचारासाठी आलेल्या दोन वर्षाच्या बाळाचे कान-नाक-घसा विभागातील वैद्यकीय डॉक्टरांनी तत्काळ मदत केल्यामुळे प्राण वाचले. या बाळाच्या श्वसननलिकेमध्ये शेंगदाणा अडकला होता. त्यामुळे निर्माण झालेल्या संसर्गामुळे बाळाला श्वास घेण्यास त्रास होत होता. अस्वस्थता होती तसेच करोनामध्ये जी लक्षणे दिसतात, त्या प्रकारची लक्षणे असल्याचे समजून त्या बाळाचे पालक घाबरले. धुळे येथे राहणाऱ्या या बाळाच्या आईने बाळाला वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी खूप ठिकाणी धावपळ केली. पण मदत मिळाली नाही. अथक प्रयत्नांनी त्यांनी बाळाला मुंबईच्या केईएम रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचारासाठी आणले. तेव्हा शेंगादाणा अडकला असल्याचे निदान झाले. दुर्बिणीच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करुन (ब्रॉन्कोस्कोपी) हा शेंगादाणा बाहेर काढण्यात आला.
अवघड शस्त्रक्रिया
यासंदर्भात अधिक माहिती देताना केईएम रुग्णालयाच्या कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. हेतल मारफतिया यांनी सांगितले की, ‘संसर्गाच्या कालावधीमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यामध्ये जोखीम असते. पण बाळाचे वय लक्षात घेऊन बाहेरुन त्याच्या श्वसननलिकेमध्ये एखादा पदार्थ अडकल्याचे निदान झाले होते. त्यामुळे संसर्गही वाढला होता. लक्षणे करोनाची असली तरीही बाळाला करोना नव्हता. या संसर्गामुळे करोनासदृश्य लक्षणे दिसत होती. या पालकांना बाळाला घेऊन मुंबई गाठण्यासाठी खूप त्रास झाला होता. अशा अवस्थेत आमचे बालरोगतज्ज्ञ डॉ. ममता मुरांजन, भूलतज्ज्ञ डॉ. अंजना वाजेकर, नाक-कान-घसा विभागातील तज्ज्ञ डॉ. स्वप्ना पाटील, डॉ. अरुनिमा यांच्या सहकार्यामुळे ही अवघड शस्त्रक्रिया करणे शक्य झाले आणि बाळाच्या जीवावरचा धोका टळला.
लॉकडाउनच्या कालावधीमध्ये मुले घरी असल्यामुळे अजाणतेपणाने नाणी, इतर टोकेरी वस्तु, खेळणी तोंडामध्ये, कानामध्ये, नाकात घालतात. हे पदार्थ गिळल्याचे लक्षात न आल्यामुळे किंवा ते तसेच राहिल्यामुळे मुलांच्या जीवावर बेतू शकते. करोनाच्या संसर्गाच्या काळामध्येही या मुलांना तप्तरतेने वैद्यकीय उपचार दिले जातात. त्यामुळे त्यांचे प्राणही वाचतात. अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये वैद्यकीय उपचारांकडे दुर्लक्ष करू नये, असेही डॉ. हेतल यांनी सांगितले. तर डॉ. स्वप्ना पाटील यांनी ही श्वसननलिकेशी संबंधित असल्यामुळे या लहान बाळामध्ये ही शस्त्रक्रिया करणे आव्हानात्मक होते. अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या मुलांचे प्रमाण आता वाढते आहे त्यामुळे पालकांनीही अधिक डोळसपणे मुलांकडे लक्ष द्यायला हवे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.