Home संपादकीय learning on screen: स्क्रीनवर शिकताना - while learning on screen

learning on screen: स्क्रीनवर शिकताना – while learning on screen


मेघना जोशी

‘इतके दिवस मुलांना स्क्रीन ॲडिक्शन नको, त्यांना स्क्रीनपासून दूर ठेवा असं तुम्हीच, म्हणजे शाळा सांगत होती आणि आता काय हे नवीन, सगळं ऑनलाइन? काही सुसंगती तरी असावी,’ एक करवादणारे त्रस्त पालक विचारत होते. ‘नाही बुवा आपल्याला जमत, पोरगं समोर कसं रिॲक्ट होतं ते समजल्यावाचून शिकवणं अशक्य आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव नकोत का दिसायला, तर समजणार ना माझं शिकवणं पोहोचतंय का नाही ते,’ शिक्षकी पेशा तळमळीनं करणारे एक शिक्षकमित्र वैतागत म्हणाले. ‘आता करा म्हणावं काय ते आपल्या पोरांचं. शाळेत काही झालं, की येतात लगेच असं करा नि तसं करा सांगत. आता आम्ही इथून सांगणार ऑन स्क्रीन, हे हे आणि असं असं करा म्हणून. पुढचं काय ते तुम्ही बघा आणि तुम्हीच ठरवा, उगाच आमच्यावर खापर नको फोडायला, माझं मूल मागे का, नि असंच का, तसंच का वगैरे,’ एक तरुण शिक्षिका.

हे सगळं ऐकलं आणि लक्षात आलं, की या एका विषयाला अनेक आयाम आहेत. असंही लक्षात आलं, की याबाबत आज कोणाशी बोललं पाहिजे, तर ते पालकांशी. आजपर्यंत आम्हा लोकांमध्ये तरी अशी प्रवृत्ती आहे, की पालक म्हणजे पोषणकर्ता. चांगलं खाणंपिणं, चांगल्या वस्तू, उत्तम शाळा ही पोषणकर्ता म्हणून पालकानं करायच्या कामांपैकी महत्त्वाची कामं; पण शिक्षण ही गोष्ट आपण शाळेवर सोडतो किंवा शाळेवर ती सोडून देण्याची आपली नैसर्गिक प्रवृत्ती आहे. म्हणूनच जेव्हा शाळा आपल्या शिक्षणाच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, तेव्हा आपसूक क्लासचे पर्याय येतात. आता सुरक्षित वावर ठेवण्याची गरज, मुलांच्या आरोग्याची चिंता आणि इतर गोष्टी पुढे आल्यावर प्रश्न पडला, जे आपण आजवर इतरांवर सोपवून किंवा ज्यासाठी आजवर आपली मुलं इतर ठिकाणी पाठवून, निश्चिंत झालो होतो, ते आता आपण कसं काय सांभाळायचं आणि यासाठी धावून आला तो स्क्रीन. मग सुरू झालं ऑनलाइन शिक्षणाचं युग. ऑनलाइन शिक्षण देणं, हे पालक आणि शिक्षक दोघांनाही सोयीचं. पालकांना घरात बसलेलं मूल सांभाळणं अवघड म्हणून आणि शिक्षकांना शिक्षण बंदची धास्ती नको म्हणून; पण हे पूर्ण शिक्षण नाहीच, तो शिक्षण देण्यातला एक भाग असू शकतो. महात्मा गांधीच्या व्याख्येनुसार शिक्षण म्हणजे मानवाच्या शरीर, मन, आत्मा यांच्यातील सुप्त गुणांचा उत्कृष्ट आविष्कार. या व्याख्येनुसार फक्त असं एका बाजूनं काही तरी सांगून, म्हणजे माहिती देऊन फक्त अध्ययन-अध्यापनाचं चक्र पूर्ण होऊ शकत नाही. शिकताना माहिती घेतल्यानंतरच्या क्रिया म्हणजे, माहितीचं आकलन झालं आहे का व्यवस्थित, मिळालेली माहिती मुलं वापरू शकतायत की नाही, याबाबत थोडं लक्ष देणं. हे काम आता पालकांवर येऊन पडलं आहे. यावर पालकांनी, आम्हाला काय समजतंय हो त्यातलं, वगैरे म्हणू नये. आता तर सरकार पाठ्यपुस्तकं मुलांपर्यंत घेऊन येतंय. आज जे पालक आहेत, त्यांना सहज आठवत असेल, की आपली आई चुलीपाशी स्वयंपाक करायची आणि आपण तिला मोठमोठ्यानं धडे, कविता वाचून दाखवायचो. किती सुंदर पद्धत होती ती. अल्पशिक्षित आई असा अभ्यास करून घेऊ शकत होती, तर आपण त्यापुढे एक पाऊल टाकायला काय हरकत आहे? वाचनाबरोबर थोडंसं लेखन, पाठ्यपुस्तकातील जमतील तसे प्रकल्प, असं करून घ्यायला काय हरकत आहे? कारण इयत्ता पहिली, वय वर्षं सहा आणि ऑनलाइन शिक्षण चार ते पाच तास, ऐकूनही झटका बसावा अशी अवस्था.

यानंतर दुसरी गोष्ट येते, ती पाल्याला जबाबदारी शिकवण्याची. आपलं मूल हे मानसशास्त्रीयदृष्ट्या एक स्वतंत्र व्यक्ती आहे; त्यामुळे या ऑनलाइन शिक्षणाच्या वेळी जेवढा वेळ ते काही पाहत असेल स्क्रीनवर, तेवढा वेळ मी त्याच्याबरोबर बसेन आणि पाहीन ते काय करतंय, असं असेल तर नकोच किंवा माझा मोबाइल नसतोच बाई माझ्यापाशी. ते काय ते ऑनलाइन का काय ते सुरू झालंय, ना तेव्हा आमचा/आमची मनूच घेऊन बसतो/बसते, एवढा ढिसाळपणाही कामाचा नाही. यातला सुवर्णमध्य काढत पाल्याला त्यात मदत करणं, हे आपलं काम आहे. बाल्यावस्थेत असतील, तर पलीकडचं शिकवणं संपलं, की कोणतंही कार्टून किंवा व्हिडिओ पाहत नाही ना आपलं मूल, याची वेळीच दक्षता घेणं आणि कुमारावस्थेत किंवा पौगंडावस्थेत असेल, तर इन्कॉग्निटो वापरत क्रोमवरून त्याचं अजून काही चाललं नाही ना, याची काळजी घेणं हे पालक म्हणून काम उरतंच.

माझा मुलगा आठवीत होता. तो माझ्यासमोर आला म्हणजे मी म्हणायचे, ‘ए, अभ्यास कर.’ काही काळानं आम्ही त्यात बदल घडवला. आता जर मुलं चोवीस तास घरात राहणार असतील, तर मी केलेली ही चूक तुम्ही करणार नाही. शाळेतही जे वेळापत्रक असतं, त्यालाही शैक्षणिक, मानसिक वगैरे बैठक असते; त्यामुळे तासिकांचा कालावधी, त्यांचा क्रम, सुट्या यांची पद्धत असते. घरात राहताना या सर्वांचा अगदी शाळेसारखा विचार झाला नाही, तरी किती तास अभ्यास, किती तास विरंगुळा, किती तास छंद, व्यायाम, खेळ यांचा विचार करणं महत्त्वाचं ठरेल. या काळात मुलांना थोडं तरी वेगळं वाचू दे. हे का, याचं कारण परवा एका चर्चेतून लक्षात आलं. कोणतेही संदर्भ आपण जेव्हा इंटरनेटवर शोधतो, तेव्हा अगदी ते आणि तेच समोर येतं. उदाहरण द्यायचं, तर समजा शांता शेळकेंची ‘पैठणी’ ही कविता वाचायची असेल, तर नेटवर अगदी नेटकेपणानं तीच समोर येईल; पण तीच जर का कविता संग्रहात वाचायला गेले, तर आपसूक अनुक्रमणिकेतील बाकीच्या कवितांची शीर्षकं नजरेखालून जातीलच. बरोबर चाळता चाळता एक-दोन कविताही डोळ्यांखालून जातील. हे असं नकळतचं शिक्षण वाचन देत असतं.

करोनापासून वाचण्यासाठी आपल्या पाल्यांनी शैक्षणिक आजारपण पांघरलेलं आहे. त्यांना आपण विलग ठेवणार आहोत. या काळात त्यांना योग्य टॉनिक देणं आणि त्यांची सर्व तऱ्हेची शक्ती वाढवणं, ही पालक म्हणून आपली कामगिरी आहे. म्हणजे मग, जेव्हा करोनाचं हे ग्रहण सुटेल, तेव्हा पाल्य उत्साही विद्यार्थ्याच्या रूपात शिक्षणाचा आनंद लुटण्यास सक्षम असेल.

(लेखिका मुख्याध्यापिका आहेत.)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sangli: Sangli: तरुणीने व्हिडिओ कॉल करून तरुणाला नग्न होण्यास सांगितले, अन् – sangli unidentified woman blackmailing 20 year old man and extorting

म. टा. प्रतिनिधी, सांगली: अनोळखी तरुणीने व्हिडिओ कॉल करून तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. विश्वास संपादन करून व्हिडिओ कॉलद्वारे त्याचे नग्न अवस्थेतील फोटो आणि...

Raosaheb Danve: खडसे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच; दानवेंची नवी माहिती – eknath khadse originally belongs to ncp, says raosaheb danve

मुंबई: एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून त्यांच्यावर चौफेर हल्ले सुरू आहेत. खडसे यांच्या बाबतीत...

Recent Comments