वाचा: करोना रुग्णांची होतेय फसवणूक?; मनसेचा आरोग्यमंत्री टोपेंवर गंभीर आरोप
कोरपावली गावात राहणाऱ्या एका ८१ वर्षीय वृद्धास श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना दि. २७ जून रोजी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यात करोनाची लक्षणे असल्याने करोना सदृष्य रुग्ण म्हणून त्यांचे नमुने घेण्यात आले होते. उपचार सुरू असताना या वृद्धाचा २९ जून रोजी मृत्यू झाला.
मृत वृद्धामध्ये करोना सदृष्य लक्षणे असल्याने अंत्यविधी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने योग्य त्या अटी व शर्तींसह त्यांचे मुलास मृतदेह प्लास्टिकमध्ये सुरक्षित बांधून ताब्यात दिला. मृतदेह घरी नेवून कुठलीही विधी न करता सरळ कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या होत्या.
वाचा: गणपती बसणार नाहीच; ‘लालबागचा राजा’चं मंडळ ठाम
मुलाचा निष्काळजीपणा
मुलासह नातेवाईकांनी मृतदेह नियमानुसार कब्रस्तानमध्ये न नेता घरी नेला. घरी गेल्यावर मृतदेहाचे बांधलेले प्लास्टिक सोडून मृतास आंघोळ घालण्यात आली. त्या वेळी या ठिकाणी जवळचे नातेवाईक व इतर जवळपास शंभरावर लोक जमले होते. त्यांनी लॉकडाऊन व संचारबंदीचा नियम मोडून मृत वृद्धाचा दफनविधी केला. दफनविधी झाल्यानतंर आता दोन दिवसांनी या वृद्धाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी पोलीस पाटील सलीम तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात मृत व्यक्तीच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात करोना संसर्गाची स्थिती गंभीर बनत चालली आहे. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या तीन दिवसांपूर्वीच साडेतीन हजारांचा टप्पा ओलांडून पुढे गेली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या तुलनेत मृतांचा आकडाही चिंता वाढवणार आहे.