वाचा: करोनाने उडवला ‘थर’काप; दहीहंडी उत्सवाबाबत झाला मोठा निर्णय
राज्यात सलून सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला असला तरी ब्युटी पार्लर आणि स्पा सुरू करण्यास मात्र तूर्त परवानगी देण्यात आलेली नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत सलूनबाबत सांगोपांग चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात आला. सलूनसाठी नियमावली तयार करण्यात आली असून सोशल डिस्टन्सिंगचं पालन, मास्कचा वापर, सॅनिटाइझेशन बंधनकारक असेल, असे सांगण्यात आले.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘तूर्त सलूनमध्ये केस कापण्याचीच परवानगी देण्यात आलेली आहे. दाढीबाबत निर्णय नंतर घेण्यात येणार आहे. सलूनमध्ये केस कापण्यासाठी जाणाऱ्याने मास्क वापरणे बंधनकारक आहे. त्याचवेळी जो केस कापणारा आहे, त्यानेही मास्क वापरायचा आहे. सोशल डिस्टन्सिंगचे अन्य सर्व नियम पाळणेही सक्तीचे असणार आहे. पुढचे काही दिवस याचे बारीक निरीक्षण केले जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येतील.’
वाचा: करोनावरील औषधाची पहिली खेप महाराष्ट्रासह ५ राज्यांना रवाना
दरम्यान, करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात गेल्या तीन महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यानुसार मार्च महिन्याच्या २१ तारखेपासून राज्यातील सर्व सलून बंद आहेत. त्यानंतर १ जूनपासून राज्यात लॉकडाऊनचे नियम मोठ्या प्रमाणात शिथील करण्यात आले. ‘मिशन बिगिन अगेन’ची घोषणा करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक व्यापार-उद्योगांना दिलासा देणारे निर्णय घेतले. यात ग्रीन झोन वगळता अन्य भागात सलूनला मात्र वेटिंगवर ठेवण्यात आले. सलून बंद असल्याने या व्यवसायात असलेल्या हजारो कामगारांची आर्थिक कोंडी झाली. नैराश्येतून सलून व्यावसायिकाने जीवनयात्रा संपवल्याच्या घटनाही घडल्या. सलून सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी म्हणून राज्यभरात नाभिक समाजाने आंदोलन छेडले. अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर सलून व्यावसायिकांचा सहानुभूतीने विचार करत सलून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. अन्य दुकाने उघडण्यास ज्याप्रकारे परवानगी देण्यात आली त्याचप्रमाणे सलूनबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. प्रथम काही दिवस या निर्णयाची नेमकी कशी अंमलबावणी होत आहे. नियमांचे कशाप्रकारे पालन केले जात आहे, हे पाहिले जाणार आहे.
वाचा: लॉकडाऊनमध्ये मशिदीचं रुपांतर झालं कोविड उपचार केंद्रात!