पायपीट करणाऱ्या मजुरांची व्यथा
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
‘करोना हा भयंकर आजार आहेच. त्याने मृत्यू येत असेलच; पण आज आम्हाला करोनापेक्षाही जास्त भीती भुकेची वाटते. या दुसऱ्या राज्यात आम्ही करोनामुळे नाही पण भुकेने मरून जाऊ’, अशी व्यथा हजार कि.मी.च्या पायी प्रवासाला निघालेल्या तरुणांनी मांडली.
संघर्ष वाहिनीचे संघटक दीनानाथ वाघमारे व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी अलीकडेच पायी गावाकडे जाणाऱ्यांची मनोगते जाणून घेतली. त्यावेळी पुढे आलेले वास्तव करुणाजनक होते.
‘अनोळखी गावात मरण्यापेक्षा आपल्या गावी मरू, पण आम्हाला आमच्या घरी जायचे आहे’, असा विचार करून घराकडे निघालेले हे तरुण काही दिवसांपूर्वी नागपूर-जबलपूर महामार्गावर बेसाजवळ वाघमारे यांना दिसले. दुचाकीवर आलेल्या चौघांना पाहून आधी ते घाबरले. मात्र, त्यांना धीर देताच ते बोलू लागले. १९ वर्षांचा गुलाबराव म्हणाला, ‘आम्ही हैदराबादवरून निघालो. आम्हाला मध्य प्रदेशात रिवाला जायचे आहे. हैदराबादवरून आम्ही १५जण पायी निघालो. वाटेत एका ट्रकने आठजणांना घेतले व नागपूरजवळ आणून सोडले. नागपूरपासून रिवा ५०० कि.मी. आहे. या तरुणांचे गाव रिवापासून ५० कि.मी. पुढे आहे. दरम्यान, हैदराबादला एका चोरट्याने तरुणाजवळील ७ हजार रुपये व १० हजार रुपयांचा मोबाइल चोरला. त्यामुळे होते नव्हते तेही गमावले. अखिल भारतीय दुर्बल घटक विकास संस्थेचे धीरज भिशीकर यांनी त्यांच्यासाठी खाद्यपदार्थांची व्यवस्था केली.
असाच एक जत्था कामठीजवळ झाडाखाली होता. सगळे वाळलेल्या भाकरीला तिखट-मीठ लावून खात होते. हे तरुणही हैदराबादवरून निघाले होते व त्यांना उत्तर प्रदेशात भांडा जिल्ह्यात जायचे होते. कुठे ट्रकने तर कुठे पायी असा प्रवास करीत ते कामठीपर्यंत पोहोचले. आता पुढे २६० कि.मी. जबलपूर, तेथून १८० कि.मी. सतना व पुढे ९० कि.मी. चित्रकुट पार करून भांडा जिल्ह्यात त्यांना पोहोचायचे होते.
२२ वर्षांचा लवकुश यादव सांगत होता की, आम्ही १२पैकी चारजण उत्तर प्रदेशचे तर आठजण मध्य प्रदेशचे आहोत. आम्ही तेलंगणात टाइल्स फिटिंगचे काम करायचो. काम बंद झाल्याने आवक बंद झाली. तेलंगण सरकारने मजुरांना धान्य देण्याचा निर्णय घेतला. आम्ही रांगेत लागलो, पण तेथे ‘आधी आमच्या राज्यातील मजुरांना धान्य मिळेल, मग तुम्हाला’, असे सांगण्यात आले. अशा एकूण परिस्थितीत जगणे कठीण झाल्याने आम्ही पायीच गावाकडे निघालो. पोलिसांच्या भीतीने ट्रकवाले आम्हाला घेत नाहीत. रात्रीच्या वेळी ते ट्रकमध्ये बसू देतात. दिवसा मात्र आम्हाला पायीच प्रवास करावा लागतो. रस्त्यातील ढाबामालक आम्हाला जेवायला देतात. आम्हाला करोनापेक्षाही जास्त भीती भुकेची आहे, अशी व्यथा त्या तरुणाने मांडली.