Home शहरं नागपूर Nagpur News : तुकाराम मुंढेंच्या विरुद्ध भाजप आक्रमक, काँग्रेस सौम्य - bjp...

Nagpur News : तुकाराम मुंढेंच्या विरुद्ध भाजप आक्रमक, काँग्रेस सौम्य – bjp aggressive, congress benign


म. टा. प्रतिनिधी, नागपूर

महापालिकेच्या महासभेत गुरुवारी चौथ्या दिवशी भाजपने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. भाजपच्या दयाशंकर तिवारी यांनी कागदपत्रांचा आधार घेत, चार तास प्रशासनाच्या अपयशावर घणाघाती आरोप केले. काँग्रेसचा आयुक्तविरोध सौम्य झाल्याचे जाणवले. नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी आयुक्तांवर टीका करताना भाजपलाही हुकुमशहा ठरविले. ‘विश्वासात घ्या, संवाद वाढवा’, असाच सूर सगळ्यांनी लावला. आज, शुक्रवारी मुंढे काय उत्तर देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहात सुरू असलेल्या महासभेच्या तिसऱ्या दिवशीही मुंढेवर नगरसेवकांकडून जोरदार शाब्दिक वार करण्यात आले. प्रवीण दटके म्हणाले, ‘मुंढेच्या छत्रछायेत वावरणाऱ्या अधिकाऱ्यांची बोलण्याची, वागण्याची पद्धतच अलिकडे बदलली आहे. जनतेचे प्रतिनिधी असलेले नगरसेवक कुठल्याही कामासाठी जातात त्यावेळी त्यांना चांगली वागणूक देण्यात येत नाही. नगरसेवक म्हणजे अशिक्षित, चोर, दुष्ट व्यक्ती, आणि मी म्हणजे नियमांप्रमाणे चालणारी व्यक्ती अशी छबी जनतेत निर्माण करण्याचा प्रयत्न आयुक्त करीत आहेत. कार्यादेश न काढताच अनेक कामे सुरू आहेत.’

भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी कागदपत्रांचा आधार घेत तब्बल चार तास भाषण करीत मुंढेवर टीकास्त्र सोडले. ‘मुंढे म्हणजे स्वर्गातून आलेले देवदूत असल्याचे चित्रच गेल्या काही महिन्यांत उभे करण्यात आले आहे. जे काही करेल ते मी एकटाच करेल, असे चित्र उभे करून मुंढे यांनी लोकप्रतिनिधींच्या हक्काचे हनन करण्याचा प्रयत्न चालवला आहे. शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमध्ये लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात येत नाही. नगरसेवकांच्या प्रभागात नेमके काय सुरू आहे, हेसुद्धा कळत नाही, असे सध्या चित्र आहे’, असे ते म्हणाले. वैद्यकीय अधिकारी डॉ. गंटावार यांच्याकडून सुरू असलेल्या मनमानी कारभाराला मुंढे यांचे अभय असल्याचा आरोपही केला.

दरम्यान, मुंढेंच्या कामकाजाच्या पद्धतीवर स्थगन प्रस्ताव आणणाऱ्या काँग्रेसची भूमिका तिसऱ्या दिवशी अगदी मवाळ दिसून आली. प्रफुल्ल गुडधे यांनी स्थगन प्रस्तावावर बोलण्याऐवजी सत्ताधारी पक्षाच्या कामकाजाच्या पद्धतीवर टीका केली. इतके वर्ष सत्तेत असणाऱ्या भाजपने सध्या महापालिकेत हुकुमशाही सुरू आहे, असा कांगावा करू नये. सत्ताधाऱ्यांची कामकाजाची पद्धत हुकुमशाहीपेक्षा कमी नव्हती. मात्र, आता सत्ताधाऱ्यांना आयुक्तांच्या कार्यपद्धतीमुळे हुकुमशाही असल्याचे जाणवत आहे, हे एका दृष्टीने चांगलेच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. ‘महापौरांनी प्रशासनाकडून समन्वयातून कसे काम करता येईल यासाठी प्रयत्न करावे’, असे गुडधे म्हणाले. दरम्यान, काही दिवसांपर्यंत मुंढेच्या कामकाजावर टीका करणाऱ्या काँग्रेसमध्ये तीन गट पडल्याचे दिसून आले. यात मुंढे यांच्या कार्यपद्धतीचे समर्थन करणारा नगरसेवक बंटी शेळके व कमलेश चौधरी यांचा गट, तर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेले नगरसेवक नितीन साठवणे यांच्या समर्थकांचा गट तर विरोधी पक्षनेते व प्रफुल्ल गुडधे यांची तटस्थ भूमिका असलेला गट असे तीन गट असल्याचे दिसून आले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments