म.टा. प्रतिनिधी, नागपूर
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातर्फे (सीआयएसएफ) बुधवारी ही मॉकड्रिल झाली. त्यावेळी विमानतळावर येणाऱ्या अज्ञात वाहनातून स्फोट घडविण्याचा प्रयत्न झाल्यास कुठली खबरदारी घ्यावी, याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. या मॉकड्रिलबद्दल काही मोजक्या लोकांनाच कल्पना असल्याने काही क्षण विमानतळावर भयपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सेफ्टीच्या (बीसीएएस) दिशानिर्देशांनुसार नियमितपणे मॉकड्रिल होत असते. यंदा करोनामुळे वेगळ्या प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ही मॉकड्रिल विशेषत्वाने करण्यात आली. यात सर्व एअरलाइन्सची सुरक्षा यंत्रणा, स्थानिक पोलिस व अन्य संबंधित विभाग सहभागी झाले होते. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही मॉकड्रिल एक तासभर चालली. मागील आठवड्याभरात झालेली दुसरी मॉकड्रिल एकूण ३७ जणांच्या सहकार्याने पार पडली.