Home शहरं नागपूर Nagpur News : विदर्भ हॉकीला राज्यात प्रतिनिधित्व करता येईल काय? - can...

Nagpur News : विदर्भ हॉकीला राज्यात प्रतिनिधित्व करता येईल काय? – can vidarbha hockey be represented in the state?


म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

‘महाराष्ट्र हॉकी असोसिएशनद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये विदर्भ हॉकी असोसिएशनच्या चमूला प्रतिनिधित्व करता येईल काय,’ अशी विचारणा मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हॉकी इंडियाला केली असून, त्यावर निवेदन सादर करण्याचा आदेश दिला आहे.

न्या. आर. एम. लोढा यांनी मैदानी खेळांकरिता प्रत्येक राज्यात एकच प्रमुख संघटना राहील, अशी शिफारस केली होती. त्या शिफारशीमुळे विदर्भ हॉकी असोसिएशनचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे किमान खेळाडूंना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करणारी याचिका विदर्भ हॉकी नागपूर खंडपीठासमोर सादर केली. त्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने हॉकी इंडियाला नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचा आदेश दिला होता.

असोसिएशनच्या वतीने बाजू मांडताना अॅड. आनंद परचुरे म्हणाले, नागपुरात १९५६ मध्ये विदर्भ हॉकी असोसिएशनची स्थापना करण्यात आली. या असोसिएशनच्या अधिकारक्षेत्रात राज्यातील २२ जिल्हे आहेत. त्याशिवाय मुंबई व महाराष्ट्र हॉकी असोसिएशन अशा दोन अन्य संघटनादेखील आहेत. त्या संघटनांमधूनही राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळाडू पाठवण्यात येतात. या तीनही संघटनांना हॉकी इंडियाने मान्यता दिलेली आहे. परंतु, न्या. लोढा समितीने मैदानी खेळाच्या संघटनांबाबत दिलेल्या शिफारशीमुळे विदर्भ हॉकी असोसिएशनची मान्यता धोक्यात आली आहे. राज्यात केवळ एकच शिखर संघटना राहील, त्यांनाच राष्ट्रीय संघटनेतील पदाधिकारी निवडणुकीत मतदानाचा अधिकार राहील तसेच एकाच संघटनेला अनुदानही मिळेल, असे नमूद केले आहे. त्यामुळे येत्या जुलै महिन्यात विदर्भ हॉकी असोसिएशनचे हॉकी इंडियासोबत असणारे संलग्नीकरण संपुष्टात येणार आहे. त्यामुळे संलग्नीकरण कायम ठेवण्यात यावे, अशी विनंती याचिकेत करण्यात आली.

दरम्यान, हॉकी इंडियाच्या वतीने बाजू मांडताना अॅड. श्रीरंग भांडारकर म्हणाले, राज्यात केवळ महाराष्ट्र हॉकी असोसिएशनलाच राष्ट्रीयपातळीवर प्रतिनिधित्व करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याबाबत इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचेदेखील नियम आहेत. परंतु, राज्यातील स्पर्धांमध्ये विदर्भ हॉकी असोसिएशनला त्यांचे खेळाडू पाठवता येतील. तेव्हा हायकोर्टाने त्याबाबत स्पष्ट निवेदन सादर करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. आनंद परचुरे यांनी बाजू मांडली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments