करोनाचा शिरकाव नाही
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह हे कडेकोट सुरक्षाव्यवस्था असलेले आणि सुरक्षित कारागृह आहे. अद्याप करोनाचाही शिरकाव झालेला नाही. मुंबईसह राज्यभरातील कैदी येथे ठेवले जातात. मुंबई बॉम्बस्फोट, तसेच अन्य प्रकरणातील वीस ते पंचवीस दहशतवादी येथे शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र विभाग आहे. तेथे कायम कडेकोट बंदोबस्त असतो. त्यात युसूफ मेमन आणि इसाक मेमन यांची भर पडली. त्यापैकी युसूफचे शुक्रवारी निधन झाले.
लॉकडाउन सुरू
मुंबईच्या आर्थर जेलमध्ये करोनाचे दीडशे रुग्ण झाले आहेत. इतर जेलमध्येही करोनाचा फैलाव होऊ लागल्याने राज्य सरकारने महत्त्वाची कारागृहे दीड महिन्यांपासून लॉकडाउन केली आहेत. त्यात नाशिकरोड कारागृहदेखील आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वेगळता अन्य कारणांसाठी जेल उघडले जात नाही. नवीन कैद्यांना देखील प्रवेश दिला जात नाही. त्यांना शेजारील के. एन. केला शाळेत ठेवले जात असून तेथे दीडशे कैदी झाले आहेत. कैद्यांच्या नातेवाइकांच्या मुलाखतीही बंद आहेत. कर्मचारी व अधिकाऱ्यांची शंभर जणांची तुकडी ड्युटीसाठी एकदा कारागृहात गेल्यावर २४ दिवसांनीच बाहेर येते. कर्मचारी व कैद्यांची रोज वैद्यकीय तपासणी होते. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केल्यानेच नाशिकरोड कारागृहात करोनाचा शिरकाव झालेला नाही.