शहरातील करोनाबळींचा आकडा ९१ पर्यंत पोहोचला असून, करोनाबाधितांचा आकडा एक हजार ६९६ पर्यंत पोहोचला आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या दहा दिवसांतच शहरात करोनामुळे ५० बळी नोंदविले गेल्याने नागरिकांसह प्रशासकीय यंत्रणाही हादरली आहे. नाशिक शहरात करोनाबाधितांच्या संख्येसोबतच आता करोनाबळीचा आकडादेखील दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरात गेल्या २५ दिवसांत तब्बल दीड हजार रुग्ण वाढल्याने शहरात आता समूह संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरातील करोनाबाधितांचा आकडा आता शंभरी पार करीत आहेत. गुरुवारी दिवसभरात १३१ रुग्ण वाढले असतानाच शुक्रवारी दिवसभरात ९१ रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे शहरातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा एक हजार ६९६ पर्यंत पोहोचला आहे. धक्कादायक म्हणजे शुक्रवारी शहरात दहा जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोकणी दरबारजवळ, नाशिक येथील ८० वर्षीय वृद्ध, काझीची गढी, कुंभारवाडा येथील ४० वर्षीय महिला, नाशिकरोड येथील म्हसोबानगर, गिते मळा येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष, शिंगाडा तलाव येथील माहेश्वरी अपार्टमेंट, जैन मंदिराजवळील ५६ वर्षीय वृद्ध पुरुष, गंजमाळ येथील ४४ वर्षीय पुरुष, आडगाव येथील ८५ वर्षीय वृद्ध, मखमलाबादरोड येथील जाधव कॉलनीतील ६६ वर्षीय वृद्ध पुरुष, दूध बाजार येथील ७५ वर्षीय वृद्ध, सारडा सर्कल येथील ५२ वर्षीय महिला, रविवार कारंजा येथील ३० वर्षीय पुरुष अशा दहा व्यक्तींचा मृत्यू झाला. १६ जून रोजी शहरात अवघे ४० करोनाबळी होते. परंतु, गेल्या दहा दिवसांत तब्बल ५१ करोनाबळींची नोंद झाल्याने शहरातील धोका अधिकच वाढला आहे.