पनवेल / उरण : पनवेल महापालिका क्षेत्रात रविवारी १३ रुग्णांची भर पडली, तर तीन रुग्ण बरे होऊन घरी परतले. नवीन पनवेल येथील फळविक्रेत्याच्या एकाच घरातील चार जण, एकाच कुटुंबातील दोन, मुंबई विमानतळावर सीआयएसएफ जवानाच्या घरातील एक रुग्ण, चेंबूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले कामोठ्यातील पोलिस कर्मचारी, मुंबई महापालिकेतील सुरक्षारक्षक आदी खारघर, कामोठे, नवीन पनवेल कळंबोली येथील १३ रुग्णांना करोनाची बाधा झाली. पनवेल महापालिका क्षेत्रात रविवारपर्यंत २५९ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ११५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आठ रुग्णांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे, अशी माहिती पनवेल महापालिकेकडून देण्यात आली. उरण तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढताच असून रविवारी आणखी १६ रुग्णांची वाढ झाल्याने उरणमधील कोरोनाबाधितांचा संख्या १२६ झाली आहे.