हडपसरमध्ये आयटी इंजिनीअर असलेला आदित्य बिश्त आणि व्यवसायाने डॉक्टर असलेल्या नेहा कुशवाह यांचा विवाह अमनोरा क्लबमध्ये शनिवारी दुपारी साडेबारा वाजता पार पडला. मूळचा डेहराडून येथील तरुण मगरपट्टा येथे आयटी कंपनीत नोकरीला आहे. मुलगीदेखील मगरपट्टा येथेच राहते. डिसेंबर महिन्यामध्ये त्यांचा विवाह ठरला. लग्न गावाकडे होणार होते. मात्र, करोनामुळे देशभर करण्यात आलेल्या ‘लॉकडाउन’मुळे या दोघांनाही गावाला जाता आले नाही. दुसरीकडे लग्नाची तारीख जवळ आली तरी, वऱ्हाडी येणे शक्य झाले नाही. कन्यादान करायला मुलीच्या वडिलांनाही येता आले नाही. अशा प्रतिकूल स्थितीतही उभयतांनी ठरलेल्या तारखेलाच लग्न करण्याचे निश्चय केला.
हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे यांना लग्नसोहळ्याची माहिती देण्यात आली. शनिवारी दुपारी साडेबारा वाजता लग्नाचा मुहूर्त होता. सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर कन्यादान कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला. अखेर फोन वरून मुलीच्या वडिलांनी पोलिसांना कन्यादान करण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन पोलिसांनीही मुलीचे मोठ्या उत्साहात कन्यादान केले आणि हा आगळावेगळा लग्नसमारंभ पार पडला. पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील आणि त्यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांनी जबाबदारी स्वीकारून कन्यादान केले. लॉकडाउनच्या काळात सध्या पोलिसांना विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असून, शनिवारी त्यांनी कन्यादान करून असेही एक मंगल कर्तव्य पार पाडले.
या वेळी पोलिस उपायुक्त सुहास बावचे, हडपसर पोलिस स्टेशनचे निरीक्षक रमेश साठे, उपनिरीक्षक प्रसाद लोणारे, सहायक निरीक्षक मनोज पाटील यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी सुरक्षित वावर ठेवून लग्नाला हजर होते. हा सोहळा नागपूर आणि डेहराडूनहून नवरदेव आणि मुलीच्या वडिलांनी व्हिडिओ कॉलद्वारे पाहिला.
…..
लॉकडाउनमुळे नवरदेव व नवरीचे वडील दोघेही अत्यावश्यक सेवेत अडकले होते. दोन मे रोजी उभयतांचे लग्न ठरले होते. त्यामुळे डेहराडूनहून पोलिसांना मुलाच्या वडिलांनी फोन केला आणि लग्नाची तारीख ठरली आहे. मात्र, आम्हाला येणे शक्य नाही. कृपा करून तुम्ही लग्न लावून द्या, असे सांगितले. वरिष्ठांना माहिती देऊन आम्ही एक साडी, छोटे मंगळसूत्र, गुरुजी आणि काही पोलिस एकत्र येऊन लग्न लावले. करोनाविरोधातील मोहिमेमध्ये सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मुलांचे लग्न पार पाडण्याचे कर्तव्य केल्याचे आम्हाला समाधान आहे.
– प्रसाद लोणारे, सहायक पोलिस निरीक्षक