अजित पवार यांनी चाचण्यांची संख्या वाढविण्याचे महापालिका आयुक्तांना आदेश दिले होते. त्यानंतर पुणे भेटीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चाचण्यांची संख्या वाढविण्याची मागणी केली होती. त्यानुसार गेल्या आठवड्यापासून शहरात आरोग्य विभागाने चाचण्यांची संख्या वाढविण्यास सुरुवात केली. सुरुवातीला सहाशे चाचण्यांपासून सुरुवात झाली. त्यानंतर चाचण्यांनी प्रतिदिन दीड हजारांचा टप्पा गाठला. त्या पाठोपाठ आणखी रुग्ण आढळल्याने दोन हजार ते २२०० चाचण्या दररोज करण्यात आल्या. आता हळूहळू चाचण्यांची संख्या साडेतीन हजारपर्यंत वाढविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तीन हजारांहून अधिक चाचण्या करण्यात येत असून, सध्या चाचण्यांची ३४५०पर्यंत वाढविण्यात आली आहे.
गुरुवारी शहरात ३,४५३ एवढ्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यामुळे एकूण चाचण्यांची संख्या एक लाख ६७७वर पोहोचली आहे. यापुढील काळात चाचण्यांची संख्या वाढविण्यात येण्याची शक्यता आहे.
गुरुवारी पुण्यात ५६० जणांना लागण झाली. पिंपरी-चिंचवडमध्ये १०२, पुणे ग्रामीणमध्ये ३६ आणि पुणे कँटोन्मेंटमध्ये २७ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या १८ हजार २४०वर पोहोचली आहे. एकट्या पुण्यातील एकूण रुग्णसंख्या १४ हजार ३२०वर पोहोचली आहे. गंभीर रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होताना दिसत आहे. सध्या ३१६ रुग्ण गंभीर असून, त्यापैकी ६३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. गुरुवारी २०२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८,३०२वर पोहोचली आहे. आतापर्यंत शहरातील रुग्णालयांमधील ५,३२५ रुग्ण सक्रिय आहेत.
शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी १६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. त्यात सोलापूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये तिघांचा मृत्यू झाला असून, त्यात खडकी कँटोन्मेंटच्या हद्दीतील रुग्णाचा समावेश आहे. मृतांमध्ये पन्नाशीच्यावरील रुग्णांचा समावेश असून, सर्वाधिक रुग्ण ७० ते ९० या वयोगटातील आहेत. आतापर्यंत एकूण ६६१ जणांचा मृत्यू झाला आहे.
शहरातील गुरुवारची स्थिती
पुणे पालिका नवीन रुग्ण – ५६०
पिंपरी चिंचवड नवीन रुग्ण – १०२
पुणे कँन्टोन्मेंट नवीन रुग्ण – २७
पुणे ग्रामीण नवीन रुग्ण – ३६
गुरुवारी बरे झालेले रुग्ण – २०२
गुरुवारचे १६
एकूण पॉझिटिव्ह १८,२४० (पुणे शहर १४,३२०, पिंपरी-चिंचवड २,४२७, पुणे ग्रामीण ६३३ + पुणे कँटोन्मेंट आणि जिल्हा रुग्णालय ८६०)