Home संपादकीय Rahul Gandhi: काँग्रेस ही मोदींसाठी संजीवनीच! - prakash bal article on narendra...

Rahul Gandhi: काँग्रेस ही मोदींसाठी संजीवनीच! – prakash bal article on narendra modi and congress leadership


प्रकाश बाळ

नरेंद्र मोदी यांना ‘काँग्रेसमुक्त भारत’ खरोखरच हवा आहे, की त्यांना गलितगात्र झालेली सत्ताहीन व नेतृत्वहीन निष्प्रभ काँग्रेस तशीच कायमस्वरूपी टिकायला हवी आहे? …आणि मोदी यांच्या हातून सत्ता खेचून घेऊन, पुन्हा एकदा भारताचं नेतृत्व करण्याची राजकीय इच्छाशक्ती व उमेद, सोनिया व राहुल गांधी यांच्याकडं उरली आहे, की आता ‘अखेर मतदार मोदी यांना कंटाळून आपल्या पारड्यात मतं टाकतील, तोपर्यंत अधूनमधून ‘राजकारण’ करीत राहायचं, असं त्यांना वाटत आहे?

येथे मुद्दामच भाजप व काँग्रेस, या दोन्ही पक्षांचा उल्लेख करणं टाळलं आहे. याचं कारण म्हणजे, मोदी यांनी भाजपला आपल्या नुसतं वेठीलाच बांधलेलं नाही, तर पक्षात मोदी यांची मोठी दहशत आहे आणि सोनिया व राहुल या दोघांच्या दरबारात, कुर्निसात करणाऱ्यांपलीकडं काँग्रेसमध्ये इतरांना काडीचंही महत्त्व दिलं जात नाही. उलट आजवर त्यांचं खच्चीकरणच केलं जात आलं आहे. तेव्हा प्रश्न मोदी आणि सोनिया व राहुल यांचाच आहे… आणि बिहारच्या निवडणुकीनंतर हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मोदी यांच्या तुलनेत सोनिया व राहुल गांधी यांचे नेतृत्वगुण अगदीच फिके आहेत, यात दुमत असायचं कारणच नाही. मोदी यांची जनमानसावर पकड आहे, यातही वाद नाही. तरीही निवडणुका आल्या, की आपल्या सरकारनं ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी काय काय केलं, यावर भर देत मतदारांचं प्रबोधन करीत मतं मागण्याऐवजी, मोदी यांचा भर राहिला आहे, तो काँग्रेसवर शरसंधान साधण्यावर आणि जोडीला वेळ पडेल तेव्हा, पाकिस्तान व त्याच्या अनुषंगानं मुस्लिमांच्या अनुनयासाठी काँग्रेसला जबाबदार धरण्यावरच! निवडणुकांच्या वेळी जमातवादी ध्रुवीकरणाच्या राजकारणापलीकडं मोदी गेल्या सहा वर्षांत एकदाही गेलेले नाहीत… आणि हे करताना त्यांनी कायम काँग्रेसलाच जबाबदार धरलं आहे.

एक प्रकारे गलितगात्र झालेली सत्ताहीन व नेतृत्वहीन निप्ष्रभ काँग्रेस ही मोदींसाठी संजीवनी आहे. मात्र अशी ही काँग्रेस जेव्हा केव्हा थोडं ‘राजकारण’ करू पाहते, एखाद्या राज्यात ती आव्हान उभं करण्याची शक्यता दिसू लागते, तेव्हा प्राप्तिकर खातं, सक्तवसुली संचनालय, सीबीआय, एनआयए इत्यादी संघटनांचा बिनदिक्कतपणं गैरवापर करत, काँग्रेसच्या नेत्यांना व त्यांच्या निकटवर्तीयांना न्यायालयीन चक्रव्यूहात अडकवण्याचे डावपेच मोदी खेळत आले आहेत. मात्र जेव्हा काँग्रेस असं ‘राजकारण’ करत नाही, तेव्हा मोदी यांच्या हातातील या साऱ्या संघटना ‘शांत’ असतात. मग रॉबर्ट वाड्रा यांचं नाव प्रसार माध्यमांतून अचानक गायब होतं. ‘नॅशनल हेराल्ड’वरून उडवण्यात आलेला धुरळा खाली बसलेला दिसतो. साहजिकच हे असं का होतं आहे, याचा संबंध काँग्रेस कंबर कसून कामाला न लागण्याशी तर नाही ना, असा संभ्रम निर्माण होतो. त्यासाठी परत एकदा उदाहरण बिहारच्याच निवडणुकीचं घेता येईल.

काँग्रेसनं बिहारच्या निवडणुकीत ७० जागा लढवल्या आणि फक्त १९ जागी या पक्षाला विजय मिळाला. यापूर्वीच्या विधानसभेत काँग्रेसला २३ जागा होत्या. काही मोजक्या प्रचारसभा घेण्यापलीकडं राहुल गांधी बिहारकडं फिरकलेही नाहीत. त्या राज्यातील पक्ष संघटना सक्षम करण्याकडं निवडणुकीआधी लक्ष देण्याची गरज होती; पण तसं काहीच राहुल यांनी केलं नाही. उलट निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असताना, राहुल सिमल्याला निघून गेले. या वर्तनाला ‘राजकीय उनाडपणा’ म्हणायचं, की काही इतर ‘हिशेबा’पायी त्यांनी हे केलं, असं अनुमान काढायचं? या उलट ‘एमआयएम’ या मूळच्या हैदराबादच्या निव्वळ मुस्लिमांच्या असलेल्या पक्षानं जसा महाराष्ट्रात शिरकाव केला, तसाच या बिहारच्या निवडणुकीत राज्याच्या सीमांचल भागातील २० जागा त्या पक्षानं लढवल्या आणि पाच जिंकल्या. त्यासाठी या पक्षाचे नेते असरउद्दिन ओवेसी यांनी किमान २५ सभा घेतल्या. ‘एमआयएम’चा हा विजय ही घटना जेवढी उल्लेखनीय आहे, तेवढीच देशातील सामाजिक सलोख्यासाठी चिंताजनकही आहे. याचं कारण ‘एमआयएम’ हा पक्ष म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील मुस्लिम लीगची नवी आवृत्ती आहे. हा रझाकारांचा पक्ष आहे. केवळ मुस्लिमांचा पक्ष या देशात उभा राहणं, हे हिदुत्ववाद्यांच्या हाती दिलं जाणारं कोलीतच आहे; कारण राष्टीय स्वयंसेवक संघ व ‘एमआयएम’हे एकमेकांना पूरक आहेत. असं असूनही मुस्लिम मतदार या पक्षाकडं वळत असतील, तर इतर बिगर भाजप पक्षांच्या हिंदुत्वासंबंधीच्या धरसोडीच्या धोरणाचा तो अपरिहार्य परिणाम आहे. परंपरेनं मुस्लिम समाज हा काँग्रेसवर विश्वास असलेला मतदार आहे. हा समाजघटक काँग्रेस टप्याटप्यानं गमावत आला आहे. याची सोनिया वा राहुल यांना काही खंत आहे, असं दिसत नाही. राहुल यांची ‘पप्पू’ ही प्रतिमा संघ परिवारानं हेतुत: तयार केली असली, तरी ते ‘बिनडोक’ नाहीत. ते चाणाक्ष आहेत. त्यांना जगाची जाण आहे. आपला पाठीराखा समाजघटक कोणता, हे त्यांना नक्कीच कळतं. तरीही त्यांनी बिहारच्या निवडणुकीत असा ‘राजकीय उनाडपणा’ करावा, याची संगती कशी लावायची?

हाच प्रकार हाथरस हत्याकांडाचा. राहुल व प्रियंका यांनी तेथे जाण्यासाठी आटापिटा केला. शेवटी तेथे त्याना जाता आलं. पण पुढे काय? या निमित्तानं उत्तर प्रदेशातील पक्षाची संघटना सक्रीय झाली, असं काही घडलेलं नाही. प्रसार माध्यमांत एक-दोन दिवस राहुल व प्रियंका झळकले एवढंच. प्रसार माध्यमांच्या सध्याच्या कार्यपद्धतीनुसार हे प्रकरण आता मागं पडलं आहे आणि काँग्रेसही ते उचलून धरताना दिसत नाही. जनता पक्षाचं सरकार असताना सत्तरच्या दशकाच्या अखेरीला बेलच्छी हत्याकांड घडलं, तेव्हा इंदिरा गांधी यांनी ज्या प्रकारं ते हाताळलं, तो आपल्या आजीचा धडा राहुल व प्रियंका यांना घेता आला असता!

मोदी यांनी मार्चमध्ये अचानक ‘लॉकडाउन’ जाहीर केल्यावर मुंबईसह देशातील इतर महानगरांतून अक्षरश: लाखो स्थलांतरित मजूर बिहार व उत्तर प्रदेशात परत जायला पायी निघाले. जगातील सर्वात मोठं स्थलांतरण, असं जगभरातील प्रसार माध्यमांनी त्याचं वर्णन केलं. त्यात अनेक मजुरांचा मृत्यूही झाला. मोदी सरकारनं काही आठवडे उलटेपर्यत, या स्थलांतरणाची दखलही घेतली नाही. अशा वेळी हा मुद्दा उचलून या स्थलांतरितांबरोबर किमान १०० किलोमीटर चालत जाण्याचा आदेश देशातील सर्व काँग्रेसजनांना देतानाच, स्वत: राहुल यांना त्यात सहभागी होता आलं असतं. मोदी सरकारपुढं हे मोठं राजकीय आव्हान उभं करता आलं असतं. बिहारच्या निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या सभांना जी गर्दी उसळत होती, त्यात याच स्थलांतरितांचा मोठा समावेश होता. पण या स्थलांतरितांशी दिल्लीच्या सीमेवर पदपथावर बसून चर्चा करण्यापलीकडं राहुल गेले नाहीत. त्यामुळंच अशी अधूनमधून ‘राजकारण’ करणारी आणि ‘राजकीय उनाडपणा’ करणारी काँग्रेस ही मोदी यांची संजीवनी बनली आहे.

आता बिहार निवडणुकीतील अपयशानंतर काँग्रेसमध्ये विसंवादाचा तीव्र सूर उमटत असून आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा उडत आहे. समजा या घुसळणीतून काँग्रेसमध्ये जर दुफळी झाली (तशी शक्यता आजच्या घडीला अजिबातच राजकीय क्षितिजावर दिसत नाही), तर सोनिया व राहुल यांच्या विरोधातील नेत्यांवर मोदी सरकारची वक्रदृष्टी होण्याचीच शक्यता अधिक आहे. याचं कारण काँग्रेस अशीच वादविवादात खितपत पडणं, यातच मोदी यांना आपलं हित दिसत आहे.

मोदी यांना पुन्हा आव्हान देणारा पक्ष म्हणून कॉग्रेसला उभं करणं, सोनिया यांना शक्य होतं. राहुल हे पक्षाला सक्षम नेतृत्व देऊ शकत नाहीत, हे २०१४ च्या निवडणूक निकालांनंतर सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट झालं होतं. त्यावेळी पक्षात असलेल्या तरुण नेत्यांसह राहुल यांचं सामूहिक नेतृत्व प्रस्थापित करण्याचं पाऊल दूरदृष्टीनं सोनिया यांना उचलता आलं असतं. त्याचबरोबर आपल्या स्वत:सह पक्षातील इतर वरिष्ठ नेते, केवळ मार्गदर्शकाची भूमिका निभावतील, असंही सोनिया यांना जाहीर करता आलं असतं. राज्या-राज्यातील काँग्रेस शाखांतही हाच निर्णय अंमलात आणता आला असता. अशा निर्णयामुळं पक्षात एक नवं पर्व तर सुरू झालंच असतं, पण घराणेशाहीचा आरोपही निष्प्रभ ठरत गेला असता. तरुण नेत्यांच्या आकांक्षांना वाव मिळला असता. मोदी सरकारच्या कारभारातील गफलती, गोंधळ व गैरव्यवहार याबाबत राज्या-राज्यातील काँग्रेस शाखांसह पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला आक्रमक धोरण अवलंबता आलं असतं. मोदी यांनी सरकारी संस्थांच्यामार्फत कारवाई करण्याची पावलं टाकली असती, तरी तुरुंगात जाण्याची तयारीही काँग्रेस नेते व कार्यकर्ते यांना ठेवावी लागली असती. त्याचबरोबर विविध प्रादेशिक पक्षांशी सजग संवाद साधून, जेथे त्यांती राजकीय शक्ती आहे, तेथे एक पाऊल मागे राहून त्यांना पाठबळ देता आलं असतं. गेल्या सहा वर्षांतील अनुभव असं दर्शवतो, की राज्या-राज्यातील निवडणुकांत मोदी यांना समर्थ आव्हान उभं करता येऊ शकतं.

मात्र पुत्रप्रेमापायी, राहुलसह इतर तरुण नेत्यांचं सामूहिक नेतृत्व प्रस्थापित करण्याचं पाऊल न उचलून सोनिया यांनी मोठी घोडचूक केली आहे… आणि तीच आज काँग्रेसला भोवत आहे. बिहार निवडणुकीतील दारुण अपयश, हे त्याचं ताजं उदाहरण आहे!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

proposal to allow corporate house to set up banks: कॉर्पोरेट्सचा बँकिंग प्रवेश – rajiv madhav joshi article on proposal to allow corporate houses to...

राजीव माधव जोशी आपली बँकिंग सिस्टीम सक्षम व्हावी म्हणून अलीकडेच सादर केलेल्या अहवालानुसार पतसंस्था व बिगर बँकिंग कंपन्यांना नवीन बँक स्थापन करण्याची मुभा...

trp case: टीआरपीप्रकरणी मीडिया ट्रायल नको – bombay high court has directed news channel should not media trial in trp case

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलेले असताना, या खटल्यावर प्रभाव टाकणारे मीडिया ट्रायल वाहिन्यांकडून होऊ नये. त्यादृष्टीने...

Sourav Ganguly Announced 5 T 20 Match – करोना काळात हा संघ येणार भारत दौऱ्यावर; BCCIकडून घोषणा

नवी दिल्ली: भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी,वनडे आणि टी-२० मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने...

Recent Comments