Home संपादकीय Ram and Sita: उर्मिलेच्या कथा का नाही? - ramayan valmiki and urmila...

Ram and Sita: उर्मिलेच्या कथा का नाही? – ramayan valmiki and urmila story


मंजुश्री गोखले

संपूर्ण वाल्मीकी रामायणाचा बारकाईने अभ्यास केला तरी हे लक्षात येत नाही, की उर्मिलेला इतकं अलक्षित ठेवण्यामागे वाल्मीकींचा नेमका काय विचार होता? बरं गोष्ट अशी की, चौदा वर्षं लक्ष्मण रामासोबत वनवासात होता, केवळ चौदा तास किंवा चौदा दिवस नव्हे! देखण्या, पराक्रमी आणि राजपुत्र असलेल्या पतिसोबत आनंदाने जीवन व्यतीत करून, त्याच्या सहवासाची सुंदर स्वप्नं उर्मिलेनं पाहिली नसतील? नक्कीच पाहिली असतील.

रामायणामध्ये (विशेषत: वाल्मीकींच्या) शृंगाररसाला कुठेच वाव नसला तरी, सीतेच्या अंगोपांगांचं सौंदर्यपूर्ण वर्णन अनेक श्लोकांतून येतं. मग उर्मिलेच्या मनातली पतीबद्दलची प्रेमभावना वाल्मीकींच्या लक्षात आलीच नसेल असं म्हणणं धाडसाचं ठरेल. बरं केवळ रामचरित्राचीच प्रचंड मोहिनी त्यांच्या मनावर पडली असावी, असं मानलं तरी रामाला वनवासात पाठवण्याचा हट्ट करणाऱ्या कैकयीबद्दलचा लक्ष्मणाचा संताप अनेक कठोर शब्दांतून वाल्मीकी व्यक्त करतात.

सुमंत प्रधानाचंही कैकयीला फटकारणं ते विस्तारानं व्यक्त करतात. एवढंच नव्हे तर, अत्रि ऋषींच्या आश्रमात श्रीराम सीतेसह पोहोचल्यावर अत्रिपत्नी अनुसूयेनं सीतेला केलेला उपदेशही ते तपशीलासह देतात. अनेक ठिकाणी अनेक संवादांतून वाल्मीकी पतिसेवेचं महत्त्व विशद करतात. अगदी वनवासाला निघण्यापूर्वी श्रीराम आपल्या आईला, कौसल्याला भेटायला जातात, तिचा निरोप घ्यायला जातात; तेव्हा अतीव दु:खाने कौसल्या श्रीरामासोबत वनवासाला येण्याचा हट्ट करते. त्यावेळी कौसल्येनं इथंच आयोध्येत राहणं आणि दु:खी असलेल्या दशरथाची सेवा करणं, हाच तिचा पत्नी-धर्म आहे, हे सांगताना श्रीराम म्हणतात-

‘व्रतोपतासनिरता वा नारी परमोत्तमा।

भर्तारं नानुवर्तेत सा च पापगतिर्भवेत।।२५।।’ (अयोध्याकाण्ड २४ वा सर्ग)

याचा अर्थ असा की, सद्गुण, जात, संस्कार इ. मध्ये सर्वोत्तम आणि व्रत-वैकल्यातही तत्पर असूनही जी स्त्री पतीची सेवा करत नाही, तिला नरकवास प्राप्त होतो. ती पापी ठरते.

म्हणूनच पुन्हा पुन्हा मनामध्ये एक शंका उभी राहते, की समाजहिताचं किंवा स्त्री-पुरूष वर्तन संस्काराचं जे ज्ञान श्रीरामाला होतं, ते लक्ष्मणालाही माहित असलंच पाहिजे. (दोघेही एकाच गुरुकडे शिकले होते, म्हणून इथे हे गृहीत धरले आहे.) मग असं असताना आपल्या पत्नीला उर्मिलेला पतिसेवेची संधी न देता, पतिसेवेपासून तिला वंचित ठेवून लक्ष्मण आपल्या पत्नीला नरकाची गती देऊ इच्छित होता काय? की आपलं आदर्श बंधुत्वाचं ब्रीद पाळण्याच्या नादात लक्ष्मण आला पत्नी-धर्म विसरला?

दोन ओळींमधला मथितार्थ वाचायचा म्हटलं, तर आदर्शत्वाचा अतिरेकही कसा कोणाच्या तरी आणि स्वत:च्याही दु:खाला कारणीभूत ठरतो, हे ही वाल्मीकींनी एके ठिकाणी सूचित केलं आहे. अर्थात श्रीरामाच्या आदर्श राजा होण्याच्या तत्त्वाचा अतिरेकही पुढे वाल्मीकी दाखवायला विसरत नाही. आणि शिवाय पती विरहाचं दु:ख, नवपरिणीता असूनही संयमाच्या आणि सहनशीलतेच्या अतिरेकानं चौदा वर्षं सोसणारी उर्मिला स्वत:ही आदर्श पत्नी, आदर्श सून, आदर्श विरहिणी या आदर्शत्वाच्या वर्तनात चौदा वर्षं जळत राहते. इथंही वाल्मीकींना आदर्शत्वाच्या अतिरेकाचा असा परिणामही दाखवायचा असेल!

लक्ष्मण रामासोबत वनवासाला जाणार असल्याची बातमी समजताच जनक राजा उर्मिलेला माहेरी न्यायला येतो. पण ती नकार देते व सासू-सासऱ्यांची सेवा करत इथंच राहणार असल्याचं वडिलांना सांगून त्यांना परत पाठवते म्हणे. अर्थात हा उल्लेख वाल्मीकींच्या रामायणात नाहीच. पण नंतर कुणी तरी लोकजीवनाच्या अभ्यासकाने तो कथाभाग रचला असावा.

अर्थात श्रीराम या व्यतिरेखेचीच जबरदस्त मोहिनी वाल्मिकींना पडली आणि कदाचित त्यामुळंच काही मुद्दे, काही व्यतिरेखा त्यांच्या हातून अलक्षित राहिल्या. तशीच मोहिनी हजारो वर्षांपासून लोकमानसावर पडत आली आहे. याच रामाच्या व्यक्तिरेखेच्या मोहिनीतून मग अनेकांनी आपल्याला जसा हवा तसा राम रेखाटला. सीता रेखाटली. रावण रेखाटला. इतरही सगळी पात्रं रेखाटली आणि आपल्याला आवडेल असं रामायण तयार केलं. आपल्या मनाला वाटल्या तशा अनेक कथा रामचरित्रात घातल्या. या मोहातून भले भले सुटले नाहीत. सगळ्यांनी आपापल्या नजरेने आणि भक्तिभावातून राम पाहिला, लक्ष्मण पाहिला आणि सीताही पाहिली. पण बिचाऱ्या उर्मिलेकडे कोणाचंच लक्ष गेलं नाही.

उर्मिलेच्या बाबतीत एक-दोन उल्लेख सोडले, तर कुठेच काही संदर्भ सापडत नाही. दंतकथा किंवा लोककथाही अगदी मोजक्याच सापडतात. अगदी गोस्वामी तुलसीदासरचित, ‘रामचरित्र मानस’मध्येही उर्मिलेसंबंधी फारसा म्हणण्यापेक्षा, कुठेच उल्लेखही नाही. आता पुन्हा प्रश्न उभा राहतो की, अभिजात म्हणून वाल्मीकी रामायणचाच आधार घेतला, तर या अभिजाततेला छेद देत राम-सीतेच्या अनेक कथा अनेकांनी लिहल्या, पण मग उर्मिलेची का कुणी लिहिली नाही?Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

micromax in 1b first flash sale: Micromax In 1b चा पहिला सेल आज, ७ हजारांपेक्षा कमी किंमतीत जबरदस्त फीचर्सचा फोन – micromax in 1b...

नवी दिल्लीः भारतीय स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सने जोरदार पुनरागमन केले आहे. नवीन इन सीरीज कंपनीने लाँच केली आहे. या सीरीजमध्ये In Note 1 आणि...

Delhi Chalo Farmers Protest March Live News Updates Photos And Videos – अन्न-पाण्यासहीत शेतकरी आंदोलक दिल्लीच्या सीमेवर दाखल

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं विरोधकांचा विरोध झुगारत देशभरात लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे हजारो शेतकरी 'दिल्ली चलो' आंदोलनात सहभागी झाले...

Recent Comments