Home संपादकीय samwad News: ग्रामीण भारताचे खुमासदार चित्रण - khumasdar depiction of rural india

samwad News: ग्रामीण भारताचे खुमासदार चित्रण – khumasdar depiction of rural india


स्लग- नेटगृहांच्या पडद्यावर

संतोष पाठारे

‘पंचायत’ ही वेब सीरिज आपल्याला हसवता हसवता, ग्रामीण जीवनाचं वास्तव चित्रण दाखवण्यात यशस्वी ठरते. द. मा. मिरासदार, शंकर पाटील यांच्या कथांमधील ग्रामीण बाज अनुभवण्यासाठी ‘पंचायत’ बघायला हरकत नाही!

एकोणीसशे नव्वदच्या दशकात खाजगी चित्रवाहिन्या सुरू झाल्या, तेव्हा उच्च मध्यमवर्गीय प्रेक्षकांना आवडेल असं कथानक असलेल्या ‘बोल्ड अँड ब्यूटिफुल’, ‘तारा’ या मालिकांचा सुळसुळाट झाला होता. विवाहबाह्य संबधांवर आधारित कथानक, शृंगारिक दृश्य यांची रेलचेल असणाऱ्या या मालिका, घरोघरी केबल टीव्ही आल्यानंतर लुप्त झाल्या आणि त्यांची जागा ‘सास भी कभी बहू थी’ सारख्या भावनांनी ओथंबलेल्या कौटुंबिक मालिकांनी घेतली. हा बदल कलात्मक दृष्टीने फार सुखावह नसला, तरी प्रेक्षकांची आवड-निवड आणि त्यांचं एकूण सांस्कृतिक भान लक्षात घेण्याची व्यावसायिक हुशारी त्यावेळी निर्मात्यांनी दाखवली होती. थोड्या फार फरकाने त्याचीच पुनरावृत्ती वेब सीरिजच्या दुनियेत आता होताना दिसते आहे. वेब सीरिजचा सुरुवातीचा टार्गेट प्रेक्षक शहरी तरुण वर्गापुरता मर्यादित होता, त्याची व्याप्ती आता वाढते आहे. ग्रामीण भागातील प्रेक्षक आता या नवीन माध्यमाला सरावला आहे. त्यामुळे या प्रेक्षकाची अभिरुची लक्षात घेऊन त्यांच्या जीवनशैलीचं प्रतिबिंब असणारी कथानकं वेब सीरिजमधून दिसू लागली आहेत. प्राइम व्हिडीओवर आलेली दीपक कुमार मिश्रा दिग्दर्शित ‘पंचायत’ हे त्याचं ताजं उदाहरण आहे.

ग्रामीण विभाग आणि ग्रामपंचायत हे शब्द ऐकले की धोतर नेसलेले, पिंपळाच्या पारावर बसून न्याय-निवाडा करणारे पंच आणि गावकरी हे सर्वसाधारण दृश्य आपल्या डोळ्यांसमोर येतं. अडाणी, नाडले गेलेले ग्रामस्थ आणि जुलमी सरपंच या प्रतिमा आपल्या डोक्यात घट्ट बसल्या आहेत. आधुनिक युगातील सगळ्या सोयी-सुविधा आता उपलब्ध असल्या, तरीही कालानुरूप गाव-खेड्यांमध्ये घडून आलेल्या भौतिक बदलांची गंधवार्ताही आपल्यापर्यंत पोहचत नाही. दीपक कुमार मिश्राची ‘पंचायत’ आपल्यासमोर ग्रामीण विभागातील पंचायत व्यवस्थेचं आणि गावात राहणाऱ्या लोकांच्या मानसिकतेचं खुमासदार चित्र उभं करते, ते सुद्धा एका शहरी सुशिक्षित तरुणाच्या नजरेतून!

अभिषेक त्रिपाठी हा दिल्लीमध्ये राहणारा मध्यमवर्गीय पदवीधर तरुण. एमबीए करून लाख-दीडलाखाची नोकरी करण्याचं त्याचं सर्वसामान्य स्वप्न आहे. पूर्वपरीक्षेची तो तयारी करतोय. या दरम्यान त्याला उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील फुलेरा पंचायतीचा सचिव म्हणून नोकरी लागते. अभ्यासाच्या दरम्यान थोडी कमाईसुद्धा होईल, या उद्देशाने तो ही नोकरी स्वीकारतो. अभिषेक म्हणजे ‘स्वदेस’मधला ग्रामीण भारताचं चित्र बदलून टाकण्याचं स्वप्न पाहणारा आदर्शवादी मोहन भार्गव नाही. त्याला स्वतःच्या मर्यादा माहिती आहेत. त्याचे फुलेराला येण्याचे उद्देश अतिशय स्पष्ट आहेत. या प्रदेशाशी त्याची कोणतीही भावनिक गुंतागुंत नाही. काहीशा अनिच्छेनेच तो फुलेरात येऊन पोहचतो. फुलेराची सरपंच आहे मंजुदेवी ही अशिक्षित महिला, जिने कधी पंचायतीच्या ऑफिसमध्ये पाऊलसुद्धा ठेवलेलं नाही. तिच्या वतीने तिचा नवरा ब्रिजभूषण दुबे, प्रधान बनून कारभार चालवतो आहे. ऑफिसमधील कर्मचारी विकास त्याला सहाय्य करतोय. अभिषेक या सर्व नमुनेदार माणसांबरोबर कसं जुळवून घेतो? सचिव म्हणून काम करताना त्याच्या समोर कोणती आव्हानं उभी ठाकतात आणि ती पेलताना तो स्वतःत कसे बदल घडवून आणतो, हे या आठ भागांच्या मालिकेत पाहायला मिळतं.

‘पंचायत’मधील तीस ते पस्तीस मिनिटांच्या भागांना ‘भूतापेड’, ‘चक्केवाली खुर्सी’, ‘हमारा नेता कैसा हो’, ‘बहोत हुआ सन्मान’, ‘लडका तेज है’, ‘जब जागो तब सवेरा’ अशी प्रसंगानुरूप शीर्षकं आहेत. या शीर्षकांतून त्या भागातील कथानकाचा रोख स्पष्ट होतो. ही कथानकं स्वतंत्रपणे पाहिल्यास मनोरंजक आहेतच, पण त्यांची मांडणी करताना अभिषेक त्रिपाठी या मुख्य व्यक्तिरेखेचा विकास आणि इतर पात्रांबरोबर त्याचे जुळून आलेले अनुबंध खुलत जातील याची काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. पंचायतमधील विनोद प्रसंगनिष्ठ आहे. अभिषेकच्या कार्यालयीन कामाला अनपेक्षित घटनांनी दिलेली कलाटणी, त्यात विकास आणि ब्रिजभूषण यांच्या अनाहूत सल्ल्यामुळे त्याची झालेली गोची, असे विविध प्रसंग आणि त्यांना नर्मविनोदी संवादांची जोड, यामुळे ‘पंचायत’ पाहताना मजा येते. गावातील लोकांच्या मनातील अंधश्रद्धा, भौतिक सुविधा असूनही जुनाट आचार-विचारांमध्ये अडकून पडण्याची प्रवृत्ती, सरकारी योजनांचा पंचायत समितीमधील सदस्यांनी उठवलेला गैरफायदा, महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभागामध्ये बायकोला निवडून आणून तिच्या जागी स्वतःच कारभार करण्याची पुरुषी वृत्ती, गावातील जातीपातीचं राजकारण, या सगळ्या ग्रामीण वास्तवाचा उपयोग चंदन कुमार यांनी ‘पंचायत’ची पटकथा लिहिताना केला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी कोणत्याही पात्राला खलनायकी रंग दिलेले नाहीत. सगळी पात्रं आपापले स्वभावधर्म घेऊन वावरतात आणि त्यातूनच खुसखुशीत प्रसंगांची निर्मिती होते.

जिल्हा कार्यालयातून कुटुंब नियोजनाचे घोषवाक्य लिहिण्याचा प्रसंग ‘पंचायत’मध्ये खास जमून आला आहे. गावातील भिंतीवर ‘दो बच्चे है मिठी खीर, उससे ज्यादा बवासीर’ हे घोषवाक्य लिहिल्यानंतर गावातील दोनहून अधिक अपत्य असलेल्या मतदारांचा रोष ओढवून घेण्याची पाळी प्रधानावर येते. या संकटातून बाहेर पडता पडता प्रशासनातील वरिष्ठांनी मारलेल्या कोलांट उडीचं आणि गावातील लोकांच्या धारणांचं अजब दर्शन अभिषेकला होतं. ऑफिसमधला मॉनिटर चोरीला गेल्यानंतर झालेली पोलीसचौकशी आणि त्या प्रकरणात ब्रिजभूषण, विकास आणि मंजुदेवीने अभिषेकवर दाखवलेला विश्वास, यामुळे त्याचा या लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. शहरात अभावानेच आढळणारा निरागसपणा या निरक्षर लोकांमध्ये पाहायला मिळतो. त्यांची मानसिकता जाणून घेण्याचा तो प्रयत्न करू लागतो. मंजुदेवीला स्वतःच्या अधिकाराबद्दल झालेली जाणीव ही अभिषेकच्या कामाची फलश्रुती असते. महिला सरपंच म्हणून ध्वजारोहण करण्याचा मिळालेला मान, तिला तिच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देतो आणि ब्रिजभूषण तिला तिचा अधिकार वापरू देतो हे विशेष!

अमिताभ सिंगने फुलेरा गावच्या पंचायतसमितीचं ऑफिस, सरपंचाचं घर, गावातील गल्ली-बोळ, शेत या स्थळाचं तपशीलवार चित्रण केलंय. अमित कुलकर्णीचं संकलन कथेची लय सांभाळणारं आहे. ‘पंचायत’ लक्षवेधी होण्यात सर्वात मोठा वाटा प्रमुख कलाकारांचा आहे. जितेंद्र कुमारला नुकतंच ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटात आपण पाहिलंय. अभिषेक त्रिपाठीची भूमिका त्याने खूप सहजतेने केली आहे. शहरातील सुखसोयीना दुरावलेला, नाईलाजाने पंचायत सचिवाची नोकरी स्वीकारलेला हा पदवीधर आदर्शवादी नाही, काम करता करता तो स्वतःचा स्वार्थसुद्धा साधतो, पण नेकीने नोकरी करून गावकऱ्याना आपलंसंसुद्धा करतो. सुरुवातीला या लोकांना समजून घेणं त्याला कठीण जातं, पण हळूहळू तो त्यांच्याशी जुळवून घेतो. त्यांच्या विकासाचा विचार करतो. व्यक्तिमत्त्वातील हा बदल जितेंद्रकुमारने छान दाखवला आहे. रघुवीर यादव आणि नीना गुप्ता हे कसलेले कलाकार आहेत. सरपंच पती-पत्नीमधील नोकझोक त्यांनी झकास सादर केलीय. भाषेच्या लहेजापासून ग्रामीण देहबोली व्यक्त करण्यातील त्यांची सहजता कमाल आहे. चंदन रायने केलेला विकास फारच लोभस आहे.

हसवता हसवता ही वेब सीरिज आपल्याला ग्रामीण जीवनाचं वास्तव चित्रण दाखवण्यात यशस्वी ठरते. द. मा. मिरासदार, शंकर पाटील यांच्या कथांमधील ग्रामीण बाज अनुभवण्यासाठी ‘पंचायत’ बघायला हरकत नाही!

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

health care tips in marathi : काढ्याचं अतिसेवन करताय? मग जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेली ही माहिती – excessive consumption of kadha can be dangerous...

रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या काढ्यांची माहिती देणारे व्हिडीओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ते बघून अनेक जण काढ्याचं सेवन करतात. कित्येकदा करोना...

Recent Comments