Home संपादकीय samwad News : चिंतनशील जीवनानुभव - contemplative life experiences

samwad News : चिंतनशील जीवनानुभव – contemplative life experiences


रमेश नागेश सावंत

एकीकडे कादंबरीचा साहित्यप्रकार गंभीरपणे हाताळताना बांदेकरांनी आपले ललितलेखनही चालू ठेवले आहे. त्यांच्या या लेखनप्रपंचातून साकार झालेला ‘हरवलेल्या पावसाळ्यांचा शोध’ हा लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. सदर पुस्तकात त्यांनी गेल्या दशकात विविध नियतकालिकांतून वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेले लेख संग्रहित केलेले आहेत. या लेखांतील बरेचसे लेख प्रासंगिक आणि काही व्यक्तिनिष्ठ असले, तरीही सध्याच्या काळाने घेतलेल्या असहिष्णू वळणावर संभ्रमित झालेल्या वाचकांना एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखविणारे आहेत.

या संग्रहातील लेखांतून बांदेकर यांनी स्थानिक पातळीवरच्या बऱ्याच विषयांना तर हात घातलाच आहे, पण ‘व्हॉइसेस फ्रॉम चेर्नोबिल’ या लेखातून आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या गंभीर विषयालाही तोंड फोडले आहे. ‘विकास की पर्यावरण?’ या सध्या गाजत असलेल्या वादाच्या मुळाशी जाताना त्यांनी संतुलित विकासाची बाजू माणसांचे आणि निसर्गाचे हित लक्षात ठेवून मांडली आहे. ‘आत्मा विकणाऱ्यांची गोष्ट’ या लेखांत अगोदर गाजलेला ‘एन्रॉन’ आणि आता वादग्रस्त झालेल्या जैतापूर माडबन अणुऊर्जा प्रकल्पाच्या निमित्ताने आपल्या बांधवांचा आणि आपल्या भूमीचा सर्वनाश करण्यास तत्पर असणाऱ्या विनाशक प्रवृत्तींचे बिंग फोडले आहे. सौर उर्जेचा पर्याय असताना परदेशात त्याज्य ठरविले गेलेले घातक प्रकल्प कोकणातील जनतेला आणि तेथील पर्यावरणाला उद्ध्वस्त करून त्यांच्यावर जबरदस्तीने लादले जात आहेत ही व्यथा या लेखातून मांडली गेली आहे.

तळकोकणातील वन्यजीवन हा तेथील जनजीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. मात्र आज मायनिंग (खाणी)सारख्या घातक उद्योगामुळे भूमिपुत्रांना त्यांच्या मुळापासून उखडून टाकले जात आहे. यातून जमीनधारक शेतकरी, खाणमालकांचे दलाल आणि सरकार यांच्यातला संघर्ष आज टिपेला पोहोचला आहे. ‘आभासी जगातले संवेदनशील’ या लेखात या संघर्षामुळे त्रस्त झालेल्या जनतेचे हाल दाखविताना संवेदनाहीन असलेले सरकारी अधिकारी, बधिर झालेले मुर्दाड राज्यकर्ते आणि स्वार्थी नेते यांचे पितळ बांदेकरांनी उघडे पाडलेले आहे.

प्रत्येक कोकणी माणसाला आपला गाव आणि नदी ही जीवापाड प्रिय असते. याचे प्रत्यंतर वाचकांना ‘हरवलेल्या पावसाळ्यांचा शोध’ या पुस्तकाच्या शीर्षकलेखाद्वारे येते. बांदेकर यांचे ‘बांदा’ हे गाव आणि त्या गावाभवती वाहणारी प्रसिद्ध ‘तेरेखोल’ नदी याविषयीच्या अनेक तरल अनुभवांचे ललितरम्य दर्शन या लेखांतून होते. या लेखाचे वैशिष्ट्य म्हणजे बांदेकरांनी बांदा आणि त्या परिसरातील इन्सुली, वाफोली इत्यादी गावांच्या नावांची ऐतिहासिक उत्पत्ती, पोर्तुगीज आणि आदिलशाही राजवटीच्या काळापासूनचा त्रोटक पण रंजक इतिहास, त्या परिसराचा काळानुरूप झालेला कायापालट, तेथला रम्य निसर्ग याचे वर्णन अतिशय तन्मयतेने केले आहे.

बांदेकर यांनी लोकजीवन, पर्यावरण आणि निसर्गाच्या समस्यांचा वेध घेता घेता सामाजिक आणि साहित्यिक वर्तुळातील काही विषयांवर लिहिलेले लेखही अभ्यासण्याजोगे आहेत. ‘भले तरी देऊ’ या शीर्षकाच्या लेखात आजच्या सार्वत्रिक संभ्रमाच्या काळात लेखकाची भूमिका कशी असायला हवी, लेखकाने भवतालाचे भान ठेवून आपले लेखन कसे करायला हवे, याचे विवेचन करताना इस्तंबुलच्या ‘ओऱ्हान पामुक’ या नोबेल विजेत्या आणि आपली सामाजिक बांधिलकी सर्वोपरी मानणाऱ्या लेखकाचे समर्पक उदाहरण दिले आहे.

‘या आंधळ्यांचं काय करायचं?’ या लेखात कवी, लेखक आणि कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीबद्दल लेखकाने आपला संताप व्यक्त करताना लोकांच्या वैचारिक आंधळेपणावर कडाडून हल्ला चढविला आहे. तर ‘कोसला’ या कादंबरीद्वारे मराठी कादंबरीच्या परिघात मैलाचा दगड रोवणाऱ्या भालचंद्र नेमाडेंबद्दलचा ‘मिशीवाल्या बाबाचं गारुड’ हा लेख संदर्भमूल्य असलेला आहे. ‘भावल्यावाल्याचा मृत्यू’ लेखातील परश्या ठाकर या चित्रकथी आणि कळसूत्री भावल्यांचा खेळ करणाऱ्या मुलाचे जीवन आणि तथाकथित संस्कृतिरक्षकांकडून त्याच्यावर झालेले अत्याचार भावविव्हळ करणारे आहेत.

एकंदरीत या लेखसंग्रहातील विविध लेखांत प्रवीण बांदेकर यांनी आपल्या प्रदीर्घ चिंतनातून आणि अस्सल जीवनानुभवांतून साकारलेले विचार मांडले आहेत. या लेखांच्या विषयातील विविधता आणि त्यातील समृद्ध आशय पाहता बांदेकरांनी त्यातून आजच्या जीवनातल्या पर्यावरण, निसर्ग, लोकजीवन, साहित्य, भाषा, बोली, ग्रामसंस्कृती, शिक्षण व्यवस्था अशा अनेक पैलूचे चिंतनशील दर्शन घडविले आहे.

हरवलेल्या पावसाळ्यांचा शोध

लेखक : प्रवीण बांदेकर

मुखपृष्ठ :

प्रकाशक : साकव प्रकाशन, सावंतवाडी

पृष्ठं : १२८

किंमत : २०० रु.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pune Crime: अमोल कोल्हेंच्या नावाने बिल्डरकडे मागितले पैसे; पुढे काय घडले पाहा – money demanded from builder in the name of amol kolhe

पुणे:लॉकडाऊन काळात एका बिल्डरला खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याची बतावणी करून फसविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्या विरोधात वानवडी...

Recent Comments