Home संपादकीय samwad News: दिसण्यात फार ते साधे, पण... - very simple in appearance,...

samwad News: दिसण्यात फार ते साधे, पण… – very simple in appearance, but …


प्रतिभा कणेकर

‘टिपंवणी’ हे डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांचे आत्मकथन होय. आधुनिक मराठीतील स्त्रीआत्मकथनांच्या ११० वर्षांच्या इतिहासात, ह्या आत्मकथनातून प्रथमच आजवर वाङ्मयाच्या परिघाबाहेर राहिलेला रोमन कॅथलिक समाजाचा सांस्कृतिक अवकाश स्त्रीकेंद्री परिप्रेक्ष्यातून वाचकासमोर आला आहे. त्यातून अगदी नजिकच्या भूतकाळाचे, म्हणजे पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वीचे ख्रिस्ती समाजाच्या स्थिती-गतीचे व रोमन कॅथलिक धर्मसत्तेचे चित्र दृश्यमान झाले आहे. शिवाय इतरही अनेक दृष्टींनी हे आत्मकथन निराळे व वैशिष्ट्यपूर्ण ठरते. मुंबईपासून जवळ असलेल्या वसईतील माणिकपूर-बरामपूर मध्ये जन्मलेल्या, तिथेच वाढलेल्या व अजूनही तिथेच वास्तव्यास असलेल्या सिसिलियाच्या आत्मकथनातील स्थलावकाश तेवढा एकच असला तरी विकसनक्षम व्यक्तिमत्त्वाच्या सिसिलियाच्या आत्मविकासाचा पैस खूपच विस्तारत जाणारा आहे.

सिसिलियाचा जन्म बरामपूर या दुष्काळी प्रदेशातला. “घरात दारिद्र्याने आपले पाय भक्कम रोवले होते” अशा ख्रिस्ती वाडवळी कुटुंबातली, सहा भावंडातली ही मधली मुलगी. गोठ्यात असलेले आपले कुडाचे घर, रेल्वेत नोकरी करणारे पाय (वडील) व घरात कोंबड्या मांडून, अंडी विकून पायच्या कमाईत ‘शिमटीभर’ मिठाची भर घालणारी आय (आई), चर्चमध्ये जाऊन छोटी-छोटी कामे करून व धर्मग्रामचे तळे साफ करण्याच्या कामी माती उपसून हागिणदारीत टाकण्याची मजूरी करून थोडे पैसे मिळवणारी लहानगी सिसिलिया व तिची भावंडे, शेजारी राहणारे चुलत कुटुंब आणि केळीची बाग, आंबे, नारळ चिंचेची झाडे, इतस्तत: फुललेली कागडा-मोगरा-अबोलीची फुले, मिरची-कोथिंबिर, दुधी-पडवळ, वांगी असा कितीतरी प्रकारचा भाजीपाला असलेले, ‘हिरवी ओल’ भरून राहिलेले मुळगावचे मामार (आजोळ) यांच्या अनेक आठवणी लेखिकेने ख्रिस्ती-वाडवळी वळणाच्या मराठी बोलीतून कथन केल्या आहेत. त्यांतून लेखिकेच्या भावविश्वासह, तिच्या समाजाचे कौटुंबिक व सांस्कृतिक जीवनचित्रण साकारले आहे.

‘टिपंवणी’ ही इतर अनेक स्त्रीआत्मकथांसारखी रूढ अर्थाने संसारकथा नाही. सासर-माहेर, नवरा-मुले, मित्र-मैत्रिणी ह्या नात्यांच्या पलीकडची नाती सिसिलियाने डोळसपणे व समर्थपणे जपली व पेलली हे तिच्या आत्मकथेतून लक्षात येते. सिसिलियाचे घर दारिद्र्याशी मुकाबला करत जगत असले, तरी ते उच्च मानवी मूल्ये जपणारे व मुलांवर त्या मूल्यांचा संस्कार करणारे आहे. सिसिलियाच्या पायना इंग्रजी पाचवीत शाळा सोडून अर्थार्जन करावे लागले. रेल्वेत क्लार्कची नोकरी करणार्‍या पायविषयी सिसिलिया लिहिते की, त्यांचे अक्षर वळणदार होते. हिंदी, मराठी, इंग्रजी, गुजराथी अशा भाषांतले त्यांचे विविध विषयांवरचे वाचन होते. बायबलच्या जुन्या करारातील आदम-इव्हच्या गोष्टीचा नवा अर्थ त्यांनीच सिसिलियाला सांगितला. त्यांची ज्ञानाची तहान जाणून सिसिलियाने नोकरीला लागल्यावर प्रथम त्यांच्यासाठी एनसायक्लोपिडिया ब्रिटानिकाचे सगळे खंड आणून दिले. बालवयात सिसिलियाला पोलिओ झाला होता. औपचारिक शिक्षण घेता न आलेल्या आपल्या आयने ‘माझ्या पोलिओच्या पायांना भक्कम केले’; अशी तिची आईविषयीची कृतज्ञतेची भावना आहे. ख्रिस्ती समाजात एकतर मुलीचे लग्न लावायचे किंवा तिला ‘नन’ होण्यासाठी पाठवायचे असे दोनच पर्याय कुटुंबासमोर असताना सिसिलियाच्या आय-पायने तिच्या लग्नाचा विचार केला नाही. काही काळ ती स्वत: विवाह करावा, अविवाहित राहावे की नन व्हावे अशा मानसिक संघर्षात असताना त्यांनी तिचा निर्णय तिला घेऊ दिला व आपल्या दोन्ही भावांमध्ये कुटुंब सावरण्याची क्षमता नाही, हे लक्षात आल्यावर एम.ए. झालेल्या सिसिलियाने कुटुंबाचे कर्तेपण स्वीकारले.

सिसिलियाचे शिक्षण चर्चच्या शाळेतच झाले. धार्मिक असणार्‍या मुलींना सिस्टर सुटीच्या दिवशी कॉन्व्हेंटमध्ये बोलावत व त्यांच्याकडून चर्च वा चॅपेलसाठीची छोटी-मोठी कामे करवून घेत. सिसिलिया शाळेत असताना अशी कामे करायला जात असे व ह्या कामांतून थोडे पैसे मिळवत असे. ती लिहिते, “बायबलमधील पुराणकथांचा माझ्या मनावर पगडा होता… संध्याकाळी चर्चच्या आवारातून येताना मला ती एदेनाची बाग वाटत असे. तेथील वडाचे झाड हा ज्ञानवृक्ष वाटत असे व त्याचे फळ खाल्ले तर ‘पाप’ होईल असे भय वाटत असे.” सिस्टरांनी मुलींना अभ्यासासाठी जागा पाहिजे म्हणून काही वर्ग रात्री आठपर्यंत खुले करून दिले होते. रात्री घरी परततांना ती चॅपेलसमोर जाऊन प्रार्थना करीत असे की, “माझे शिक्षण संपले की तुझ्या मळ्यात काम करण्याची मला संधी दे.” सुरुवातीला दररोज मिस्सासाठी चर्चमध्ये जाणारी सिसिलिया कॉलेजचा अभ्यास वाढू लागला तशी रविवारी व फक्त सणाच्या दिवशी मिस्साला जाऊ लागली. ‘नंतर ख्रिसमस व इस्टर हेच मिस्साचे दिवस उरले.’ आणि एम.ए.च्या वर्गांसाठी मुंबईत जाऊ लागल्यावर तिचे विचारविश्व बदलू लागले. ती लिहिते, “साहित्याच्या अभ्यासामुळे विचार प्रगल्भ झाले. ‘आपला धर्म’ व ‘आपला समाज’ यापलीकडे खूप मोठं विश्व आहे. त्या विश्वात प्राध्यापकांनी आम्हाला नेलं.”

परंतु ह्याच काळात सिसिलिया फादर बर्नार्ड मसाटो यांच्यामुळे धर्मग्रामाच्या वार्तापत्रात लिहू लागली. काही काळ तिने नाशिकला जाऊन जेज्विट मिशनर्‍यांना मराठी शिकवण्याचे काम केले. पापडी, गिरीज येथील धर्मग्रामांच्या मुखपत्रांतही ती लिहू लागली. माणिकपूरच्या धर्मग्रामातील तत्कालीन फादर प्रशांत ओलालेकर यांनी सुरू केलेल्या ‘माणिक’ मुखपत्राचे कामही ती पाहू लागली. गिरीजच्या जीवनदर्शन केंद्रातले तिचे काम पाहून फादर फ्रान्सिस दिब्रिटोंनी तिला ‘सुवार्ता’च्या संपादक मंडळावर घेतले.

एव्हाना ती वसईच्या वर्तक महाविद्यालयात ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक झाली होती. १९७५ नंतर स्त्रियांबाबत परिवर्तनाचे वारे वाहू लागले होते. संवेदनशील सिसिलियाने माणिकपूर धर्मग्रामात फादर ओलालेकर यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या हुंडाविरोधी संघटनेशी स्वत:ला जोडून घेतले. ख्रिस्ती समाजातील प्रौढ, विधवा, परित्यक्ता यांच्यासाठी ती काम करू लागली. विशेषत: नन होण्यासाठी गेलेल्या मुली कॉन्व्हेंट सोडून पुन्हा घरी आल्या तर त्यांना कुटुंबाकडून मोकळेपणाने स्वीकारले जात नाही; हे लक्षात आल्यावर तिने त्यांचे प्रश्न हाती घेतले.

तिची विचारांमधील स्पष्टता तिच्या आयुष्यात ती घेत राहिलेल्या अनेक निर्णयांमधून सतत दिसते. ती चर्चच्या हुंडाविरोधी संघटनेत काम करत असतानाचा एक प्रसंग तिने कथन केला आहे. एक तरूण तिला आवडला होता, त्याच्याकडून तिला लग्नाचा प्रस्तावही आला होता. तिने त्याला स्पष्ट विचारले, “आईवडिलांना कर्जबाजारी करून मला लग्न करायचे नाही, साधेपणाने लग्न करणे तुला जमेल का?” यावर त्याने आपल्या आई-वडिलांना ते मानवणार नाही म्हटल्यावर “मग आपण इथेच थांबलेले बरे” असा निर्णय तिने घेतला. नन व्हावे की नाही, असा तिच्या मनात संघर्ष चालू असण्याच्या काळात तिच्या काही नन झालेल्या मैत्रिणींबरोबर ती भारतात अनेक कॉन्व्हेंट्समध्ये फिरली व राहिली आणि तिला जाणीव झाली की, कॉन्व्हेंट्सच्या भिंतींचा आणि दगडी कुंपणाचा करडा रंग आपलं स्वत्व आणि सत्त्व चिणून टाकतो आहे. एव्हाना ती कविता करू लागली होती. आपल्या संवेदना कुटुंबातच अधिक फुलू शकतील, असे जाणवल्यावर नन होण्याच्या विचाराला तिने पूर्णविराम दिला.

‘टिपंवणी’तून सिसिलियाचे जे व्यक्तिमत्त्व उमटले आहे, त्यातील एक अतिशय महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कौटुंबिक, चर्चविषयक व सामाजिक जबाबदार्‍या पेलतांना तिने ‘स्व’वर अन्याय होऊ दिला नाही. एकतर ती अर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर होती. त्यातून स्वत:साठी स्वत: निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य तिने मिळवले होते. ती हळूहळू स्वत:चा शोध घेत राहिली. एकदा ती ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभी राहून जिंकूनही आली, परंतु दोन वर्षे काम केल्यावर, हे क्षेत्र आपल्या वृत्तीला मानवणारे नाही असे तिच्या लक्षात आल्यावर राजीनामा देऊन ती तेथून बाहेर पडली. ‘सुवार्ता’च्या कामात तिने स्वत:ला झोकून दिले होते, मात्र तिथे आपल्यावर अन्याय होतो आहे, हे पाहिल्यावर तिने त्या विश्वाचाही निरोप घेतला.

सिसिलियाने स्वत: मराठी साहित्यात पीएच.डी.ची पदवी मिळवली आणि तिच्या मार्गदर्शनाखाली अनेकजणांनी पीएच.डी.ची पदवी प्राप्त केली. कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक म्हणून तिची शैक्षणिक कारकीर्द सुरू झाली व वसईच्या गार्सिया महाविद्यालयाची प्राचार्य म्हणून ती निवृत्त झाली. साहित्याच्या क्षेत्रातल्या अनेक पुरस्कारांची ती मानकरी ठरली.

आपल्या गत आयुष्याकडे वळून बघतांना, आत्मगौरव व आत्मलीनता टाळत, प्रांजलपणा व परखडपणा यांत तोल सांभाळत, आपल्या ‘सुफलित’ झालेल्या जगण्याचा मनोमन आनंदानुभव घेत सिसिलियाने तिच्या जगण्याला ‘टिपंवणी’तून शब्दरूप दिले आहे.

टिपंवणी (आत्मकथन)

लेखिका : डॉ. सिसिलिया कार्व्हालो

मुखपृष्ठ : सतीश भावसार

प्रकाशक : ग्रंथाली

पृष्ठं : ३००

किंमत : ४०० रु.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

gujarat high court: बॉसच्या पत्नीने केला FIR; मसाज पार्लरमधील रशियन गर्लफ्रेंड हायकोर्टात – russian massage therapist moves gujarat high court over fir by boss...

अहमदाबाद: मसाज पार्लरच्या बॉसच्या पत्नीने केलेल्या एफआयआरविरोधात पार्लरमध्ये काम करणाऱ्या रशियन मसाज थेरपिस्टने गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बॉसच्या पत्नीने या रशियन...

lvb merger with dbs: LVB Merge With DBS लक्ष्मी विलास बँकेची ओळख मिटणार; उद्यापासून डीबीएस बँकेत होणार विलीन – lvb merge with dbs india...

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी झालेल्या बैठकीत लक्ष्मी विलास बँकेचे डीबीएस इंडिया बँकेत विलीन करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होणार...

double cord stem cell transplant surgery: देशातील पहिली डबल कॉर्ड स्टेम सेल प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी – india’s first double cord stem cell transplant surgery...

देशातील पहिली डबल कॉर्ड स्टेम सेल प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (नाळेचे प्रत्यारोपण) नाशिकच्या लोटस इन्स्टिट्यूट ऑफ हेमॅटोलॉजी, ऑन्कोलॉजी आणि अस्थिमज्जा सेंटर येथे यशस्वी रित्या करण्यात...

Recent Comments