Home संपादकीय samwad News : ‘हरवलेल्या पावसाळ्यांचा शोध ’ – चिंतनशील जीवनानुभव - 'finding...

samwad News : ‘हरवलेल्या पावसाळ्यांचा शोध ’ – चिंतनशील जीवनानुभव – ‘finding the lost rainfall’ – contemplative life experience


‘हरवलेल्या पावसाळ्यांचा शोध ‘ – चिंतनशील जीवनानुभव सर्जनशील साहित्य हे साहित्यिकाच्या भवतालाचे आणि त्याच्या भवताली घडणाऱ्या घटितांचे प्रतिबिंबच असते. काही साहित्यिक समाजाप्रती असलेल्या आत्मिक भावनेतून आपल्या परिसरात घडणाऱ्या अनर्थकारक घटनांनी अस्वस्थ होऊन त्यावर मार्मिकतेने व्यक्त होतात. प्रा.प्रवीण बांदेकर हे आजच्या घडीला असे मर्मभेदी, चिंतनशील आणि विचारप्रवर्तक लेखन करणारे निर्भीड साहित्यिक आहेत. कवितेकडून कादंबरीकडे वळल्यानंतरही आपले कविमन त्यानी अबाधित ठेवले आहे. एकीकडे कादंबरीचा साहित्यप्रकार गंभीरतेने हाताळताना बांदेकरांनी आपले ललित लेखनही चालू ठेवले. त्यांच्या या लेखनप्रपंचातून साकार झालेला ‘हरवलेल्या पावसाळ्यांचा शोध ‘ हा लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. सदर पुस्तकात त्यांनी गेल्या दशकात विविध नियतकालिकांतून वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेले लेख समाविष्ट आहेत. या लेखांतील बरेचसे लेख प्रासंगिक तर काही लेख व्यक्तिनिष्ठ असले तरीही सध्याच्या काळाने घेतलेल्या असहिष्णू वळणावर संभ्रमित झालेल्या वाचकांना एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखविणारे आहेत. या संग्रहातील लेखांतून बांदेकर यांनी स्थानिक पातळीवरच्या ब-याच विषयांना तर हात घातलाच आहे, पण ‘ व्हॉइसेस फ्रॉम चेर्नोबिल’ या लेखातून आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या गंभीर विषयालाही तोंड फोडले आहे. ‘विकास की पर्यावरण?’ या सध्या गाजत असलेल्या वादाच्या मुळाशी जाताना त्यांनी संतुलित विकासाची बाजू माणसांचे आणि निसर्गाचे हित लक्षांत ठेवून मांडली आहे. ‘आत्मा विकणाऱ्यांची गोष्ट’ या लेखांत अगोदर गाजलेला ‘एनरॉन’ आणि आता वादग्रस्त झालेल्या जैतापूर माडबन अणूउर्जा प्रकल्पाच्या निमित्ताने आपल्या बांधवांचा आणि आपल्या भूमीचा सर्वनाश करण्यास तत्पर असणाऱ्या विनाशक प्रवृत्तींचे बिंग फोडले आहे. सौर उर्जेचा पर्याय असताना परदेशात त्याज्य ठरविले गेलेले घातक प्रकल्प कोकणातील जनतेला आणि तेथील पर्यावरणाला उद्ध्वस्त करून त्यांच्यावर जबरदस्तीने लादले जात आहेत ही व्यथा या लेखातून मांडली गेली आहे. तळकोकणातील वन्यजीवन हा तेथील जनजीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. मात्र आज मायनिंग (खाणी)सारख्या घातक उद्योगामुळे भुमीपुत्रांना त्यांच्या मुळापासून उखडून टाकले जात आहे. यातून जमीनधारक शेतकरी, खाणमालकांचे दलाल आणि सरकार यांच्यातला संघर्ष आज टिपेला पोहोचला आहे. ‘आभासी जगातले संवेदनशील’ या लेखात या संघर्षामुळे त्रस्त झालेल्या जनतेचे हाल दाखविताना संवेदनाहीन असलेले सरकारी अधिकारी, बधिर झालेले मुर्दाड राज्यकर्ते आणि स्वार्थी नेते यांचे पितळ बांदेकरांनी उघडे पाडलेले आहे. जागतिकीकरणाचे वादळवारे जगाच्या पाठीवरून आता स्थानिक पातळीवरील कष्टकरी आणि श्रमजीवी लोकांच्या पोटावरच कसे पाय देत आहे याची जाणीव लेखकाने ‘निशाणवाल्या माशाचं धुमशान’ या लेखात करून दिली आहे. यासाठी त्यांनी ‘ निशाणवाला मासा’ हे प्रतीक वापरून भोळ्या जनतेला मोहात पाडून भक्ष्य बनविणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या राजकीय नेत्यांवर ‘ निशाणा’ साधला आहे. प्रत्येक कोकणी माणसाला आपला गाव आणि नदी ही जीवापाड प्रिय असते. याचे प्रत्यंतर वाचकांना ‘ हरवलेल्या पावसाळ्यांचा शोध ‘ या पुस्तकाच्या शीर्षकलेखाद्वारे येते. बांदेकर यांचे ‘बांदा’ हे गाव आणि त्या गावाभवती वाहणारी प्रसिद्ध ‘तेरेखोल’ नदी याविषयीच्या अनेक तरल अनुभवांचे ललितरम्य दर्शन या लेखांतून होते. या लेखाचे वैशिष्ट्य म्हणजे बांदेकरांनी बांदा आणि त्या परिसरातील इन्सुली,वाफोली इत्यादी गावांच्या नावांची ऐतिहासिक उत्पत्ती, पोर्तुगीज आणि आदिलशाही राजवटीच्या काळापासूनचा त्रोटक पण रंजक इतिहास, त्या परिसराचा काळानुरुप झालेला कायापालट, तेथला रम्य निसर्ग याचे वर्णन अतिशय तन्मयतेने केले आहे. काळाच्या गतीने बदललेल्या परिस्थितीमुळे गावाचा आणि नदीचा नूरच पालटून गेल्याने लेखकाची होणारी तगमग आणि अस्वस्थता बांदेकरांनी प्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर यांच्या कवितेच्या या ओळी उदधृत करून व्यक्त केली आहे. ह्या न्हैच्या पैलतडी हां माजो गाव रे… बेगीन उचल पावलां आता पाव्स इलो धाव रे.. कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या मच्छिमार बांधवांचा मासेमारी हा उपजीविकेचा व्यवसाय इतर राज्यातील धनदांडग्या ट्रॉलर्सवाल्यांनी आता त्यांच्या घशात घालायला सुरूवात केली आहे . या प्रश्नाला तोंड फोडणारा ‘ मत्स्यपुराण ‘ हा लेख सागरी जैवविविधतेची माहिती तर देतोच, पण कोकण किनारपट्टीवर मिळणाऱ्या ‘पापलेट’, ‘सुरमई’,’बांगडे’, ‘कर्ली,”कोळंबी’, ‘प्रॉन्स’ अशा विविध मत्स्य जाती- प्रजातींचे जैवसाखळीतील महत्वाचे स्थानही विशद करतो. ‘ मोठे मासे लहान माशांना खातात’या म्हणीची प्रचीती या लेखांतून येते. लेखकाचे पर्यावरणाविषयीचे भान प्रकट करणाऱ्या इतर लेखांत ‘त्यापेक्षा सरळ झाडच वाचावे’ आणि ‘ मु.पो. उजेडगाव’ या लेखांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. विनाशक वृक्षतोड आणि पर्यावरणाचा बिघडत जाणारा समतोल यासाठी संघर्ष करताना आलेल्या अनुभवांची विषण्ण करणारी कहाणी या लेखांतून लेखकाने मांडली आहे ती वाचकांना अंतर्मुख करते. बांदेकर यांनी लोकजीवन, पर्यावरण आणि निसर्गाच्या समस्यांचा वेध घेता घेता सामाजिक आणि साहित्यिक वर्तुळातील काही विषयांवर लिहिलेले लेखही अभ्यासण्याजोगे आहेत. ‘भले तरी देऊ’ या शीर्षकाच्या लेखात आजच्या सार्वत्रिक संभ्रमाच्या काळात लेखकाची भूमिका कशी असायला हवी, लेखकाने भवतालाचे भान ठेवून आपले लेखन करायला हवे याचे विवेचन करताना इस्तंबुलच्या ‘ओऱ्हान पामुक’ या नोबेल विजेत्या आणि आपली सामाजिक बांधिलकी सर्वोपरी मानणाऱ्या लेखकाचे समर्पक उदाहरण दिले आहे. ‘या -२ – आंधळ्यांचं काय करायचं?’ या लेखात कवी, लेखक आणि कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीबद्दल लेखकाने आपला संताप व्यक्त करताना लोकांच्या वैचारिक आंधळेपणावर कडाडून हल्ला चढविला आहे. ‘कोसला’ या कादंबरीद्वारे मराठी कादंबरीच्या परिघात एक मैलाच दगड रोवणा-या भालचंद्र नेमाडे सरांबद्द्लचा ‘ मिशीवाल्या बाबाचं गारुड ‘ हा लेख संदर्भमूल्य असलेला आहे. ‘शिक्षणाच्या नावानं’ या लेखात आजच्या दिशा हरवून बसलेल्या शिक्षणव्यवस्थेचे वाभाडे काढलेले आहे. ‘ भावल्यावाल्याचा मृत्यू ‘ या लेखातील परश्या ठाकर या चित्रकथी आणि कळसूत्री भावल्यांचा खेळ करणा-या मुलाचे जीवन आणि तथाकथित संस्कृतीरक्षकांकडून त्याच्यावर झालेले अत्याचार भावविव्हळ करणारे आहेत. अखेरच्या श्वासापर्यंत सामाजिक परिवर्तन आणि प्रबोधनासाठी आपले जीवन समर्पित करणा-या कॉ.गोविंद पानसरे यांच्यावरील लेखात सावंतवाडी येथे आयोजित अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनातील त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘ आवशीची बोली जित्ती ऱ्हवा दे’ हा लेख मालवणी बोली भाषेच्या गोडव्याची महती सांगणारा आहे. कविता महाजन यांच्या निधनानंतर लिहिलेल्या ‘ तरीही कविताच उरली आहे फक्त ‘ या लेखात कविता महाजन यांच्या कविता आणि कादंबरीलेखनाचा लक्षणीय आढावा घेतला गेला आहे. एकंदरीत या लेखसंग्रहातील विविध लेखांत प्रवीण बांदेकर यांनी आपल्या प्रदीर्घ चिंतनातून आणि अस्सल जीवनानुभवांतून साकारलेले विचार मांडले आहेत. या लेखांच्या विषयातील विविधता आणि त्यातील समृद्ध आशय पाहता बांदेकरांनी त्यातून आजच्या जीवनातल्या पर्यावरण, निसर्ग, लोकजीवन, साहित्य, भाषा, बोली, ग्रामसंस्कृती, शिक्षण व्यवस्था अशा अनेक पैलूचे चिंतनशील दर्शन घडविले आहे. वर्तमानकाळाच्या प्रश्नांबद्दल सजग असलेल्या वाचकांना हा लेखसंग्रह जितका वाचनीय वाटेल तितकाच तो संबंधित विषयांबद्दलचे संदर्भमूल्य असलेला देखील आहे. हरवलेल्या पावसाळ्यांचा शोध, लेखक- प्रा.प्रवीण बांदेकर, साकव प्रकाशन, सावंतवाडी मुखपृष्ठ – श्रीरंग मोरे पृष्ठे- १२८, मूल्य – दोनशे रुपये रमेश नागेश सावंत, मुंबई संपर्क – 98212 62767Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pm modi interacts with startups: नवीन स्टार्टअपसाठी १ हजार कोटींचा फंड; PM मोदी म्हणाले, ‘आमचा फोकस तरुणांवर’ – pm modi interacts with startups during...

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'प्रारंभः स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय समिट'ला संबोधित केले. वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन...

Coronavirus vaccination: PM मोदींच्या इशाऱ्यानंतर मंत्र्याचा यू-टर्न, नाही घेतली करोनावरील लस – coronavirus vaccination telangana health minister etela rajender

हैदराबाद: सर्व प्रथम करोनावरील लस ( coronavirus vaccination ) आपण घेणार, अशी घोषणा तेलंगणचे आरोग्य मंत्री एटाला राजेंद्र यांनी केली होती. पण पंतप्रधान...

Recent Comments