Home संपादकीय sewage water use for forest: सांडपाण्यावरचे जंगल - dr hemant bedekar article...

sewage water use for forest: सांडपाण्यावरचे जंगल – dr hemant bedekar article on sewage water and experiment of forest generation


डॉ. हेमंत बेडेकर

आज राज्यभर औद्योगिक वसाहती आहेत. बहुतांश वसाहतींमध्ये उद्योगांनी स्वतःची सांडपाणी पाणी प्रक्रिया यंत्रणा बसवली आहे. लहान उद्योगांसाठी एकत्रित सांडपाणी व्यवस्थापन यंत्रणा आहेत. या खासगी व सामायिक व्यवस्थांमधून जवळची नदी, ओढे किंवा धरणात सांडपाणी जाते. समुद्र जवळ असल्यास समुद्रात. रासायनिक कारखाने असलेल्या वसाहतींमधील पाणी जेव्हा असे सोडले जाते, तेव्हा जलस्रोतांचे व त्यातील वनस्पती, प्राणी यांचे स्वास्थ्य बिघडते. संपूर्ण जीवन साखळी धोक्यात येते. जैवविविधता नष्ट होते. मग अवेळी पाऊस, दुष्काळ, असंतुलित तापमान हे बदल घडतात.

मध्यम व मोठ्या शहरांतही सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा कार्यान्वित आहे. आपल्या सर्व खेड्यांमध्ये पूर्वी गटारातून वाहणारे पाणी हे नदी व नाल्यात जात होते. आजही जाते. जेव्हा सिमेंटची गटारे नव्हती, तेव्हा हे पाणी ओढ्याला मिळेपर्यंत जमिनीत बऱ्याच अंशी मुरून, मग जलस्रोतांत जायचे. आता ते जमिनीत न मुरता जसेच्या तसे ओढे, नाले, नद्यांमध्ये जाते. आज कपडे धुण्याच्या साबण व रसायनांमधील काही घटक त्वचाविकारक, कर्करोगकारक असू शकतात. नव्या यंत्रणेमुळे पाणी प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढले आहे. यंत्रणांचा हेतू जलप्रदूषण कमी होऊन प्रवाह वाहते व्हावेत हा होता; पण घडले उलटेच. दुसरीकडे, पाण्याचा वापर दरडोई वाढतो आहे. माणशी सरासरी १०० लिटर पाणी वापरले गेले, तर त्यातील ७० लिटर सांडपाणी म्हणून निसर्गात जाते. जलस्रोत प्रदूषित करते. दुष्काळी व पर्जन्यछायेच्या प्रदेशात अनियमित, कमी-जास्त पडणारा पाऊस, नष्टप्राय जंगले, जमिनीतील सुकणारा ओलावा, वाऱ्याने व पावसाने वाहणारी सुपीक माती आणि दुष्काळ हे आपण अनुभवतो आहोत.

यावर काय करता येईल? जगात काय करतात? इस्राईलकडून काही शिकता येईल का? कमी पावसाची कारणे काय? असे अनेक प्रश्न आहेत. इतर देशांनी काय केले? आपण यावर काय करू शकतो? प्रश्न आपणच निर्माण केले; मग उत्तरे शोधू या. इतरांची उत्तरे समजावून घेऊ. जिथे जिथे एकत्रित सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहेत व जी नदी, नाले, धरणांमध्ये पाणी सोडतात, त्यांच्यालगत मोठे तीन-चार एकरांचे किंवा ठरावीक अंतरावर एक एक एकराचे कृत्रिम तलाव बांधून, त्यातील पाण्याचा वापर पुन्हा शेतीसाठीचे फिल्टर वापरून किंवा प्रवाहाने नजीकच्या माळांवर नेऊन त्यावर जंगल तयार करता येईल. विशेषतः अवर्षणप्रवण भाग उदा. कुरकुंभ, शिरवळ/खंडाळा, औरंगाबाद, नाशिक इत्यादी ठिकाणी कृत्रिम तलाव बांधून, हे सांडपाणी वापरून आपण माळ हिरवे करू शकतो. हा प्रश्न दुहेरी मार्गाने सुटेल. एक तर, जंगलांचे क्षेत्र वाढेल. हे सांडपाणी प्रक्रिया केलेले असले, तरी ते पिण्याच्या पाण्यात जाणे धोकादायक आहे. ते असे वापरले, तर त्यावर झाडे वाढतील. त्यातील काही पाण्याचे बाष्पीभवन होईल. हजारो एकरावरील पाण्याचे बाष्प झाल्यास वातावरणात, तापमानात व आर्द्रतेत बदल होईल. पाऊस पडण्यासाठी हे पोषक आहे. हे पाणी जमिनीतील वृक्षांच्या आणि गवतांच्या मुळांच्या चाळणीतून गाळले जाऊन, आपोआप शुद्ध होईल व डोंगरउताराच्या जमिनीसाठी आवश्यक असा विहिरीतील जलसाठा वाढेल. काही हजार एकर जमिनी अशा ओलिताखाली येतील.

याशिवाय, मोठी सांडपाणी प्रक्रिया केंद्रे असणाऱ्या उद्योगांचे पाणी असेच साठवून जंगल निर्मितीसाठी वापरता येईल. हे उद्योग सामाजिक व स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन जंगल निर्मिती प्रकल्प राबवू शकतील. त्याचबरोबर त्यांना सरकारी जमिनी लीजवर देता येतील. असा प्रयोग झाला आहे. ठाणे-बेलापूर भागातील नोसिल कंपनीला असा डोंगर हिरवा करण्यास परवानगी दिली होती. ‘बायफ’च्या सहकार्याने हा प्रकल्प राबवला गेला होता. असे इतरही कंपन्या करू शकतील.

या सर्व जंगलवाढ प्रकल्पात बांबू या बहुवार्षिक गवताचा आणि देशी झाडांचा योग्य वापर करणे, हे वरदान ठरेल. बांबूची मुळे सांडपाण्यातील दूषित पदार्थ धरून ठेवतात आणि पाणी आणखी शुद्ध करतात. शिवाय, बांबू हे औद्योगिक पीक आहे. त्याचे उत्पादन वाढले, की बांबू आधारित कारखाने काढता येतील. रोजगार निर्माण होतील. राष्ट्रीय उत्पन्न वाढेल. याशिवाय, देशी झाडांवर अनेक पक्षी आणि प्राणी पोसले जातील. पक्ष्यांच्या विष्ठेतून बिया रुजून पुन्हा हे जंगल वाढत राहील. जंगल वाढल्याने हवामान बदलावर मात करता येईल. या जोडीने या पडीक जमिनीवर सुप्तावस्थेत असलेले गवत पुन्हा उगवेल व दूध व्यवसायाला चालना देता येईल.

आपल्या देशात पंचक्रोशी ही संकल्पना आहे. याच धर्तीवर पाच-सहा गावांमधील सांडपाणी एकत्रित करून जी गायराने आहेत आणि ज्या खासगी पडीक जमिनी आहेत, त्यावर हे पाणी साठवून व फिल्टर करून जंगल निर्मितीसाठी वापरले जाऊ शकेल. आज हे पाणी नदी, नाले, ओढ्यांमध्ये जाऊन ते प्रदूषित होत आहेत. हे थांबेल. सिमेंटची गटारे नव्हती तेव्हा हे पाणी जमिनीत मुरून, नैसर्गिकरित्या फिल्टर होऊन नदीत जात असे. तेव्हा नद्या इतक्या प्रदूषित होत नसत. हे गावोगावचे पाणी बांबू व इतर देशी झाडांद्वारे उत्पन्नाचे साधनही ठरू शकेल. गावे हवामानावर नियंत्रण आणू शकतील. पाऊस नियमित होईल. दुष्काळ हटेल. हे सरकारविना होऊ शकेल.

यात काही पथ्ये मात्र पाळावी लागतील. पहिले म्हणजे, भरभर वाढणारी म्हणून विदेशी झाडे लावायची नाहीत. फक्त देशी झाडे लावायची. कुऱ्हाड, चराई व बांधकामबंदी करायची. किमान दहा वर्षे सलग हा प्रकल्प राबवायचा. या प्रकल्पातील खासगी जमिनी विकण्यावर वीस वर्षे बंदी घालायची. सांडपाणी आपल्याच परिसरात मुरवायचे; तसेच जलस्रोतात न सोडण्याचे बंधन पाळायचे.

आज बांबूशिवाय इतर देशी झाडे व देशी फळझाडे या जमिनीवर लावायला, वाढवायला हवीत. लुप्त होणारे देशी गवतांचे प्रकार जोपासायला हवेत. नष्टप्राय प्रजातींच्या रोपवाटिका करायला हव्यात. यातून कालांतराने पशुधन वाढेल व वाढीव शेणखतही मिळेल. यातून जमिनीचा ओलावा वाढला, की जमिनी पावसाचा ताण सहन करतील. चारा छावण्यांची गरज भासणार नाही. अर्थव्यवस्थेवरचा ताण कमी होईल.

या सांडपाण्याचा फेरवापर सुरू झाला, तर आपोआप विहिरींना पाणी वाढेल. दर वर्षी प्रत्येक गावाने अर्धा टक्का जंगलवाढीचे जरी ध्येय ठेवले, तरी हजारो एकर माळ हिरवेगार होतील. या माळावर जे नैसर्गिक गवत उगवेल, त्यातील गुरांसाठी उपयुक्त गवत पुढे आणखी राखता येईल. आपण अशी संवर्धित जंगले वाढवली, तर आपोआप पिण्याचे पाणी, जंगल निर्मितीमुळे हवामान बदल आणि पावसात बदल घडतील. राज्यातल्या एखाद्या दुष्काळी प्रदेशात हा प्रयोग करायला हवा. त्याचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्था आणि देशी जाणकार यांच्याकडून नियोजन व संगोपन करावे. ‘नीरी’सारख्या संस्था यात चांगला सहभाग देऊ शकतात. बांबू सोसायटी आपले योगदान देईल. सर्व समाज सहभागी झाला, तर यातून चिरंतन काम उभे राहील.

(लेखक बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरचे कार्यकारी संचालक आहेत.)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

raj thackeray: तर माझा पक्ष संपूर्ण सहकार्य करायला तयार; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र – raj thackeray open letter to cm uddhav thackeray over nanar...

हायलाइट्स:राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना पत्रनाणार रिफायनरी प्रकल्पावरुन राज ठाकरेंनी लिहलं पत्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली मागणीमुंबईः रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात नाणार येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी...

nashik sahitya sammelan postponed: nashik sahitya sammelan : नाशिकच्या साहित्य संमेलनाला स्थगिती, मे अखेर होणार संमेलन – nashik akhil bhartiya sahitya sammelan postponed

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकः नाशिकमध्ये २६ ते २८ मार्च दरम्यान होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोविडच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय अखिल...

'करोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर'

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद शहरात संसर्गाची स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे, अशी कबुली महापालिकेचे प्रशासक यांनी दिली आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे लॉकडाउनशिवाय...

Recent Comments