लॉकडाऊनच्या काळात जर काही उपचार घ्यायचे असतील, तर नेमके कुठे जायचे हा प्रश्न एका क्रिकेटपटूला पडलेला आहे. त्यामुळे उपचारांसाठी तो मदत मागत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता हा खेळाडू नेमका कोण, याची उत्सुकता तुम्हाला लागलेली असेल. तर हा खेळाडू आहे मुंबई इंडियन्सकडून खेळणार सूर्यकुमार यादव…
सूर्यकुमारने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये सूर्यकुमारने म्हटले आहे की, ” माझ्या पाळीव श्वानाची अवस्था फार बिकट आहे. त्याला वैद्यकीय उपचारांची गरज आहे. त्याला अॅटॅक येत आहेत. त्यामुळे त्याची एमआरआय चाचणी करायची आहे. पण ही चाचणी कुठे करता येईल, यासाठी मला मदत करा.”
काही दिवसांपूर्वी सूर्यकुमारने आपल्या या पाळीव श्वानासाठी औषध मिळेल का, अशी विचारणा केली होती. सूर्यकुमारला नेमके कोणते औषध हवे होते, हे त्याने ट्विटरवर पोस्ट केले होते आणि आपल्याला कोणीतरी मदत करावी, अशी विनवणीही केली होती.
सूर्यकुमार हा मुंबई इंडियन्सचा एक खेळाडू आहे आणि संघासाठी त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. पण सध्याच्या घडीला आयपीएल कधी होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. यंदा आयपीएल २९ मार्चला सुरु होणार होती. पण त्यानंतर याबाबत पहिल्या लॉकडाऊननंतर म्हणजेच १५ एप्रिलला निर्णय होईल, असे म्हटले गेले. १५ एप्रिलला आयपीएल अनिश्चित कालासाठी पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आता आयपीएल कधी होणार, हे कोणालाही माहिती नाही. त्यामुळेच धोनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार की नाही, याबाबतही संभ्रमाचे वातावरण आहे.