अश्विनी असे या २५ वर्षीय महिलेचे नाव असून तिने ऑनलाइन फसवणुकीची तक्रार पश्चिम सीईएन पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. घडलेल्या प्रकाराबाबत महिलेने माहिती देताना सांगितले की, तिच्या घराशेजारी एक जखमी अवस्थेतील भटका कुत्रा तिला दिसला. तो कुत्रा अंध झाल्याचे जाणवत होते आणि त्याच्या तोंडातून रक्त गळत होते. काहीतरी केले पाहिजे आणि या कुत्र्याला वैद्यकीय मदत करायला पाहिजे असा विचार अश्विनीने केला. त्यानंतर कुत्र्याला मदत करावी म्हणून तिने हेल्पलाइन क्रमांकाचा शोध घेतला. त्यानंतर तिने डॉग अॅम्ब्यूलन्स मागवण्याचे ठरवले आणि ती कामाला लागली.
तिला सापडलेल्या एक मोबाइल नंबरवर तिने फोन केला. पलिकडून तिला मोफत अॅम्ब्यूलन्स सेवा मिळेल असे आश्वासन तिला मिळाले. मात्र, पलिकडून तिला एका लिंकवर क्लिक करून फक्त ५ रुपये भरावे लागतील असे सांगण्यात आले. ५ रुपये ही नगण्य रक्कम असल्याचा विचार तिने केला आणि पलिकडून तिला पाठवण्यात आलेल्या लिंकवर तिने क्लिक केले. त्यानंतर तिला धक्काच बसला. कारण, काही मिनिटांमध्येच तिच्या खात्यातून तब्बल १८ हजार ३८९ रुपये डेबिट झाले आहेत हे तिच्या लक्षात आले.
जखमी भटक्या कुत्र्याला मदत करण्यासाठी कोणतीही डॉग अॅब्ल्युलन्स येणार नाही हे तिच्या लक्षात आले. आपली ऑनलाइन फसवणूक झाली असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. पोलिसांचा सायबर विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे.